
>> विनायक
वळवाचा पहिला पाऊस तापल्या मातीवर बरसला की, आसमंतात दरवळतो तो मातीचा गंध. जगातल्या कोणत्याही परफ्युम-अत्तरापेक्षा मनमोहक वाटणारा. मात्र त्यासाठी मातीचं विशाल अंगण किंवा आसपास एखादे पटांगण असायला हवं. पन्नास-साठ वर्षांपूर्वी पावसाची सांगावा देणारा हा सुगंध आता जगातच, शहरी भागात कमी होतोय. अर्थात त्याची अनुभूती उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात असलेल्या भूभागात अधिक येते. आमच्या आजी त्याला ‘मातीच्या फुला’चा सुगंध म्हणायची. ते गमतीचं वाटायचं, पण नंतर सुपीक मातीच्या वरच्या मुलायम थराला ‘मातीचं फूल’ म्हटलेलं एका खेडय़ातल्या माणसाशी बोलताना ऐकले आणि सुगंध देते ते फूलच याची खात्री पटली.
असं हे मातीचं फूल किंवा ‘मातीचा वरचा थर’ कसा तयार होतो त्यामागे आपल्या नकळत घडणारी नैसर्गिक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्याला भूशास्त्र्ााrय भाषेत ‘पेडोजेनेसिस’ म्हणतात. ही प्रक्रिया शेकडो, हजारो वर्षांची असते. असं म्हणतात की, गंगाकिनारी साधी काठी रोवली तरी तिला पालवी फुटेल! याचा अर्थ तिथली जमीन सुपीक आहे. अशी सुपीकता एका दिवसात निर्माण होत नसते. मोठय़ा, खळाळत वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाह जिथे संथ होतात, तिथे त्यांनी वेगाने वाहून आणलेला ‘गाळ’ दोन्ही किनाऱ्यांवर पसरत जातो. काय असतं त्यात?
पर्वतातून येणारी पाण्याच्या घर्षणामुळे झालेली काही खनिजांची मऊ पूड (टाल्कम पावडरसारखी) पालापाचोळा कुजून आणि इतर जैविक अवशेषांमधून निर्माण होणारीसुद्धा पावडर मृदुल मातीचे थरावर थर बनवत असते. खडकांसारख्या भक्कम वाटणाऱ्या गोष्टींच्या पृष्ठभागांचीही वारा आणि पाण्याने सूक्ष्म झीज होत असते. ही झीज होताना वरचा जो भाग निघून जातो त्याची पूड हे ‘माती’ तयार होण्याचं महत्त्वाचं कारण. साहजिकच कोणत्या खडकांची किती खनिज पावडर सभोवताली पसरते, ते तिथल्या प्रस्तरांवर अवलंबून असते. खडकाळ प्रदेश उष्ण कटिबंधात म्हणजे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला साडेतेवीस अक्षांशापर्यंत, दिवसाचं वाढतं तापमान आणि रात्रीची थंडी अशा विषम उष्ण-शीत (फ्रीज थॉ) सायकल किंवा मालिकेमुळे खडकांची झीज अधिक होते.
फ्रीज-थॉ प्रक्रियेत मोठमोठे खडक फुटून त्यांचे छोटय़ा दगडात आणि नंतर वाऱ्या-पाण्याच्या घर्षणाने पूड किंवा पावडरमध्ये रूपांतर होत होत मातीचा थर साकारतो. याशिवाय खडकांवर विविध वातावरणीय वायू आणि आम्लता अशा रासायनिक क्रियांचाही परिणाम होतो.
पृथ्वीवर आतापर्यंत अब्जावधी जीव जन्मले आणि कालवश झाले. त्यात मोठमोठी झाडं आणि सूक्ष्म कीटकांपासून शैवाल-वेली आणि महाकाय प्राण्यांचाही समावेश होतो. ‘अंतिमतः सारं मातीला मिळतं’ हे शब्दशः खरं आहे. अशा जैविक अवशेषांचेही सूक्ष्म कण होऊन ते ‘माती’च्या निर्मितीला मदत करतात. हे ऑरगॅनिक मॅटर ‘ह्युमस’सुद्धा मातीच्या थरांची रचना करण्यात महत्त्वाचे ठरतात.
अशा सर्व प्रकारांतून तयार झालेल्या मातीचा पोत किती सुपीक ते ठरवणारे अनेक निकष असतात. कृषी अभ्यासातून ते समजतात. मातीच्या थरात कोणती खनिजे आणि जैविक अवशेषांचे मिश्रण आहे याची अनेक प्रकारे चाचणी करून तो भाग कोणत्या पिकासाठी अनुकूल अथवा प्रतिकूल आहे ते ठरवलं जातं. कृत्रिम खतांद्वारे मातीच्या गुणधर्मात बदलही करता येतो, परंतु तसे न करता मातीचा मूळ पोत जाणूनच पिके घेण्याला ‘ऑरगॅनिक फार्ंमग’ म्हणतात.
माती घडवण्यात गांडुळासारखे (अर्थवर्म) जी भूजीव, बुरशी, सूक्ष्म जीवाणू (बॅक्टेरिया) यांचीही भर पडते. अनेक ठिकाणी माती भुसभुशीत ठेवण्यासाठी ‘अर्थवर्म फार्ंमग’ करण्यात येते.
वर्षानुवर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेला मातीचा थर (किंवा फूल) खूप तापल्यानंतर पाणी पडल्यावर संमिश्र रसायनांचा गंध वातावरणात सोडतो. तोच मन प्रसन्न करणारा मृद्गंध! माती आपल्याला अन्न देते. त्यामुळे शेतकरी मातीच्या शेतीला ‘काळी आई’ म्हणतो ते अगदी समर्पक, परंतु वर्षानुवर्षांच्या निसर्गचक्रातून तयार झालेली माती काही वेळा जोरदार पाऊस, वादळ, महापूर, अतिवेगवान वारे यामुळे वाहून जाते. काही वर्षांपूर्वी आपल्याकडे आलेल्या महावादळ आणि त्यातून उसळलेल्या पुराने काही शेतकऱ्यांचे शेतच वाहून नेले. जिथे पीक घ्यायचे तो जमिनीचा थर उडून गेल्यावर तिथे फक्त तळाचा खडक उरला.
अशी मातीची धूप नदी-सागराच्या किनारपट्टीवर होते. दरवर्षी जगभर सुमारे 75 अब्ज टन मातीची धूप (इरोजन) अनेक कारणांनी होत असते. आपल्या देशातही वर्षाकाठी सुमारे 53 कोटी टन माती वाहून जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण पुरांमुळे अधिक 7 कोटी टनांच्या आसपास आहे. यात बदलही झाला असण्याची शक्यता आहे. मातीचा गंध मन प्रसन्न करतो तेव्हा मातीची कहाणीसुद्धा थोडी ठाउैक असावी.