वाहे गुरु दी फत्तेह!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

हिंदुस्थानी तत्त्वज्ञानात परमात्म्याचे चिंतन, मनन हा सर्वच संत-महंतांचा जिव्हाळय़ाचा विषय असून निर्गुण, निराकार, परब्रह्मात गुरू हा ईश्वराइतकाच वंदनीय मानणे ही आमची संस्कृती आहे, संस्कार आहे. ‘गुरू गोविंद दोऊ खडे। काके लागू पाय?’ या दोह्यात संत कबीर म्हणतात, विचारतोस काय, आधी गुरूच्या पाया पड. तोच तुला गोविंदाप्रत नेणारा मार्गदर्शक आहे. म्हणूनच तो श्रेष्ठ आहे. मावळय़ांनी हातात धरलेला भगवा, जरीपटका यांना गुरुस्थानी मानणारे आहेत, तर वारकरी माऊली ज्ञानदेव, जगद्गुरू तुकाराम यांना भजतात. हे त्याचेच द्योतक नव्हे काय? आम्ही ‘गुरू साक्षात परब्रह्म’ म्हणतो. कारण तोच कच्च्या मडक्याला आकार देतो.

1430 पानांचा पवित्र गुरू गंथ साहिब हासुद्धा असाच आमच्या संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. ज्याचे पठण, चिंतन सदा सर्वकाळ गुरुद्वारात चालू असते. हे विश्वबंधुत्व, आर्थिक समानता, राजनीतिक अधिकारी इत्यादी पैलूंवर प्रकाश टाकते. म्हणूनच गीता, वेद, ज्ञानेश्वरीप्रमाणे हा ग्रंथ पवित्र व वाचनीय असून हा गुरुमुखी भाषेत लिहिला गेला आहे. इसवी सन 1604 मध्ये 1 सप्टेंबर रोजी या ग्रंथाची प्रतिष्ठापना करण्यात आली. हरिमंदर साहिब अमृतसर या स्वर्णमंदिरात याची स्थापना करण्यात येऊन बाबा बुढ्ढाजी यांची आद्य ग्रंथी म्हणून नेमणूक करण्यात आली. हा ग्रंथ शिखांचे पातशाही पाचवे गुरू आरजन देवजी यांनी भाई गुरुदास यांना लिहिण्यास सांगून संपादित केला. नानकशाही पंचांगाप्रमाणे (जंत्री) हा ग्रंथ 30 ऑगस्ट 1604 रोजी पूर्ण होऊन त्याची अमृतसर या स्वर्णमंदिरात विधिवत स्थापना 1 सप्टेंबर 1604 रोजी करण्यात आली.

या पवित्र परमेश्वराचे गुणगान करणारे अनेकजण असून संत नामदेव या महाराष्ट्रीय संतांचे 50 पेक्षा जास्त अभंगांना गुरू ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्यात आले आहे. सहा शीख नानक शाही गुरू, संत नामदेव यांच्यासारख्या 15 संत महान व अकरा भाट आणि श्रेष्ठ कुलातील छत्तीय महापुरुषांच्या रचना या ग्रंथात समाविष्ट करण्यात आल्या आहेत आणि म्हणूनच या ग्रंथांचे स्वरूप हे अखिल भारतीय झाले आहे. बहुविविध हिंदुस्थानी भाषांमधील उत्कृष्ट गुरुगान करणाऱया पदांची, कवनांची या ग्रंथात रेलचेल आहे. ज्यांचा जीवनकाळ इसवी सन 173 ते 1266 असून सर्वात अंतिम रचना गुरू तेगबहादूर यांच्या आहेत. त्यांचा जीवनकाळ इसवी सन 1621 ते 1675 असा आहे. म्हणजेच सतराव्या शतकापर्यंतच्या पाचशे वर्षांच्या ईश्वर गुणगान रचना या पवित्र ग्रंथात आहेत. या रचना विविध रागांत गुंफल्या असल्यामुळे श्रवणीय आहेत. त्या ‘सब्द कीर्तन’मध्ये ग्रंथी गातात. एकतीस विविध रागांत त्या रचना रचल्या गेल्या आहेत. प्रत्येक गुरूच्या वरिष्ठतेनुसार त्यांच्या रचना वर्गित करण्यात आल्या आहेत. ज्याला ‘महला पटला, महला इजा, महला तिजा’ या क्रमाने सम्मिलित केले आहे. उदाहरणार्थ गुरू अर्जुनदेव यांच्या रचना महल पंचवा तर गुरू तेगबहादूर यांच्या महला नौवा या अध्यायात दिसतात. शिखांप्रमाणे अनेक हिंदू, मुस्लिम भक्तजन यांच्यासमोर नतमस्तक होतात. या ग्रंथाला 1 सप्टेंबर रोजी चारशे दहा वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच म्हणतो, सत श्री अकाल । वाहे गुरु दी फत्तेह ।

(लेख निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)