खारीचा वाटा – मदतीतून आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनोद गायकर (अभिनेता)

रक्तदानासारखी मदत केलीच पण लेकीसाठी आणि आता लहान मुलांसाठी पुस्तक लिहून खूप आत्मिक समाधान मिळवले.

लॉकडाऊन काळात अनेकांचे प्रचंड हाल झाले. या काळात अनेक संस्था काम करत होत्या. मीही वेगवेगळ्या प्रकारे माझ्या परीने मदत करत होतो. या काळात आम्ही रक्तदान शिबीर घेतलं, आमच्या येथे दरवर्षी गोपुळाष्टमी मोठय़ा उत्साहात साजरी होते, पण यंदा हा उत्सव साजरा न करता आम्ही आमच्या परिसरात मोठं रक्तदान शिबीर घेतलं होतं. याच्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं केलं. गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येकाला ठरावीक वेळ दिली होती. या वेळेत खाली यायला सांगितले होते. असं योग्य नियोजन करून रक्तदान शिबीर भरवलं होतं. इतरांसाठी तर मी मदतीचा हात पुढे करत होतोच, पण या काळात मी एक चांगले काम केले ते म्हणजे माझ्या मुलीसाठी मी शंभर गोष्टींचं लहान पुस्तक लिहिलं. लहान मुलांचं पुस्तक त्यांचे मनोरंजन करत असतं. तसं ते तुमच्यावर संस्कारही करत असतं. लहानपणी आपण ससा-कासवाची गोष्ट ऐकली. त्यातून आपण आळस केल्यावर कसे मागे राहतो, बुडबुड घागरीची गोष्ट वाचल्यावर कळलं की आपण खोटं बोलायच नाही, तशा गोष्टी लहानपणापासून लक्षात राहतात आणि त्या आपण नकळतपणे अनुकरण करत असतो. त्यामुळे मी आधीपासूनच विचार केला होता की, मुलीला पुस्तकांसोबत कनेक्ट राहणं महत्त्वाचं आहे. हे पुस्तक तुम्हाला खूप काही सांगून जातं. त्या पुस्तकातून तिला काय काय देता येईल हा विचार करून ते पुस्तक लिहिलं. त्यात संस्कार आहेत, मनोरंजन आहे. खरं तर मुलीला सरप्राईज देण्यासाठी तिच्या वाढदिवसासाठी हे पुस्तक लिहिले होते, पण गेल्या तीन-चार दिवसांत खूप लोकांचा पह्न येतोय की जर तू इतक्या शंभर गोष्टी लिहिल्या आहेस आणि मुळात तू लिहितोस तर ते पुस्तक सगळ्यांसाठीच उपलब्ध कर. त्यामुळे आता ते मी सगळ्यांचा विचार करता प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा लाभ बाकीच्या मुलांनाही आता घेता येणार आहे.

आता ते प्रकाशित करायचे असेल तर त्यावर थोडा वेगळा हात मारावा लागेल. कारण मी माझ्या मुलीप्रमाणे काही गोष्टी लिहिल्या आहेत. काही गोष्टींत तिचे नाव आहे. वेणू वेणूचे आई, बाबा हे मुद्दामहून केले. कारण तिला ती गोष्ट तिची वाटली पाहिजे. असं करून ते पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे लॉक डाऊनमध्ये केलेले हे सगळ्यात चांगले आणि समाधान देणारे माझ्यासाठी काम होते. आता ते अन्य मुलांनाही वाचता यावे यासाठी प्रयत्न करणार आहे.