आपला वारसा आपणच जपूया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विशाल देवकर

आपल्या गडांचे पावित्र्य, स्वच्छता आपणच राखली तर बऱयाच गोष्टी विनासायास साध्य होतील.

रिश्चंद्रगडावरील अत्यंत अवघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचे देखील कौतुक करायचा मोह आवरत नाही. अतिशय सुबक व दुर्मिळ स्वरूपाची ही मूर्ती व नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण 16 मीटर उंची असलेले, काळय़ा कातळात असलेले हे मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत. त्यावरून जाणवते की, तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱयांच्या माहितीनुसार गडावर 500-550 शंकराच्या पिंडी होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून 30-40 शिवपिंड आहेत. लहान लहान मंदिरांवर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठय़ा प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पेही गडावर आहेत. शिवाय शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. एकंदरीत हा गड देवदेवतांच्या वास्तव्याने संपन्न व पुनित झालेलाच आहे.

‘गडकिल्ल्यांचे खरे किल्लेदार हे त्या गडाच्या परिसरात राहणारे लोकच आहेत’ असा मागील लेखात मी जाणीवपूर्वक या शब्दाचा उल्लेख केला होता. त्याचा पुनःउच्चार येथे परत करू वाटतो. कारण हे वाक्य किती वास्तवास धरून आहे त्याचे जिवंत उदाहरण हरिश्चंद्रगडाच्या किल्लेदारांनी पटवून दिले आहे. आजघडीला महाराष्ट्रातील गडावर दारूबंदी कायदा झाला असला तरी गेली कित्येक वर्षे हरिश्चंद्रगडावर दारूबंदीसाठी अनेक ठोस पावले उचलली गेली आहेत. दिवसाला शेकडो पोती कचरा काही दुर्गप्रेमींनी गोळा केला आहे. गडावर दारूबंदी, स्वच्छता, अनिर्बंध गोष्टींना आळा घालण्यासाठी कायद्याच्या बाजूने तर कधी मनाविरुद्ध व शेवटचा पर्याय म्हणून कायदादेखील हातात घेऊन अनेक उत्तम कार्य काही शिवप्रेमींनी केले आहे. त्यातच पायथ्याशी असलेल्या पाचनई गावाने तर एक नवा आदर्श घालून दिलाय. गडावर येणाऱयांची कायम गर्दी असते. त्यामुळे होणाऱया कचऱयाचे थैमान, पाण्याच्या बाटल्यांचे खच ही सगळय़ात मोठी चिंतेची बाब लक्षात घेता याच गावातील लोकांनी असा धाडसी निर्णय घेतला की, दोन पैसे कमी मिळालेत तरी चालतील, पण पाण्याच्या बाटल्या विकायच्या नाहीत व विकू द्यायच्या नाहीत. गडावर मुबलक प्रमाणात पाणी आहे. या पाण्यातून सर्वांची सोय भागू शकते. शिवाय पर्याय नसल्याने आलेल्यांना गडावरील पाणीच प्यावे लागेल. त्यामुळे पाण्याचे व जलस्रोत जपण्यासाठी काळजी घेण्यास हीच मंडळी भाग पाडतील. एकदा का या जलस्रोतांचे महत्त्व कळले की, त्याची काळजी घेणे हा पायंडा सगळय़ाच किल्ल्यांच्या बाबतीत राबवतील. या क्रांतिकारी निर्णयामुळे आमूलाग्र बदल आज हरिश्चंद्रगडावर घडतोय. स्थानिक लोकांना इथल्या गडाचे आणि त्यावर आधारित आर्थिक, सर्वांगीण विकासासोबतच परिसराच्या विकासाचे सूत्र गवसले आहे. 31 डिसेंबर, सुट्टीच्या दिवशी स्वयम पुढाकाराने विषय पथके नेमून अनिर्बंध गोष्टींना आळा घालण्यासाठी कौतुकास्पद काम येथे होतंय. येणाऱया काळात पाचनई पॅटर्न महाराष्ट्रातील इतरत्रदेखील लागू होईल असा माझा विश्वास आहे, मात्र असे असले तरी आपलीदेखील या गडकिल्ल्यांच्या प्रति काही जबाबदारी आहे ती आपण पार पाडायलाच हवी. व्यावसायिक लोकांनीही एक तर सह्याद्रीवरचे प्रेम म्हणून किंवा काहीच नसेल तर आपल्याच धंद्याच्या भविष्याचा विचार म्हणून हे करणे योग्यच राहील आणि त्यायोगे, सोबत आलेल्या नवख्या मंडळींनासुद्धा ही जाणीव राहील निदान एवढे तरी अपेक्षित आहे. आपल्या कर्तृत्वाने सिद्ब झालेल्या कर्तृत्ववानांचे पराक्रम विसरले जातात, काळाच्या ओघात कुठेतरी मागे पडत जातात, पण जुन्या वाटांची हेरगिरी करणारा एखादा जरी मस्तफकीर आशिक या वाटेवर स्वार झाला की, या साऱया गोष्टी पुन्हा एकदा डोळय़ांसमोर आल्यावाचून राहत नाही. सह्याद्रीतील कर्तृत्वाचे पुरावे देणारे पाषाणपुरुष म्हणजे आपल्या गडकोटांचे वास्तवदेखील काहीसे असेच म्हणावे लागेल. म्हणूनच म्हणतात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ ते उगाच नाही. ज्या प्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो काहीसा तसेच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे ते महाराजांच्या गडकिल्ल्यांमुळेच, ही बाब विसरून चालणार नाही.

– [email protected]