
>> विवेक दिगंबर वैद्य
शिर्डी येथील साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या द्वारकामाई मशिदीमध्ये पहिला श्रीरामजन्मोत्सव साजरा झाला. आजदेखील शिर्डीतील श्रीरामजन्मोत्सव व श्रीरामनवमी यात्रा या दोन्ही उत्सवांची लोकप्रियता अबाधित आहे. शिर्डीमधील द्वारकामाई मशिदीच्या ‘स्थान’माहात्म्यामुळेच जणू धर्म आणि जातिभेदाच्या पलीकडे पाहण्याचा नवा विचार येथे श्रीरामजन्मोत्सवाच्या रूपाने रुजला.
साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याची परंपरा कशी सुरू झाली हे जाणून घेणे विलक्षण रंजक आहे. नित्यनेमाने साईदर्शनार्थ येणाऱया गोपाळराव गुंड यांना बऱयाच काळाने अपत्यप्राप्ती झाली. त्याप्रीत्यर्थ गोपाळरावांनी शिर्डी येथे दरवर्षी एखादा उत्सव, यात्रा किंवा उरूस भरवावा अशी कल्पना गावातील जाणत्या भक्त मंडळींसमोर मांडली व त्यातूनच श्रीरामनवमी यात्रोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली. तेव्हा यात्रा-उत्सवादी उरूस करण्यासाठी तत्कालीन सरकारची परवानगी घेणे गरजेचे असे. या यात्रेस काहींनी आक्षेप घेतला, विरोध केला. मात्र साईकृपेने सर्वकाही सुरळीत होऊन श्रीरामनवमी यात्रोत्सव साजरा करण्याचे निश्चित झाले.
शिर्डीमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. बाबांच्या संमतीने श्रीरामनवमीस यात्रा काढण्याचेही नक्की झाले. शके 1819 अर्थात सन 1897च्या श्रीरामनवमीस साईंच्या समक्ष यात्रेचा शुभारंभ झाला. तात्या कोते पाटील यांच्याकडे व्यवस्था सोपविण्यात आली. श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर ताशे-चौघडे वाजंत्र्यासह भजन-पूजन समारंभाकरिता चोहीकडून यात्रा दाखल झाल्या. दामूअण्णा व नानासाहेब निमोणकर यांच्याकडून आलेली दोन निशाणे समारंभपूर्वक मिरवून मशिदीच्या कळसाला बांधली गेली. ही प्रथा अजूनही चालू आहे. गोपाळराव गुंड यांची संकल्पना शिर्डीमध्ये उत्तम प्रकारे रुजली. पहिल्या वर्षी यात्रेस लाभलेला साईभक्तांचा अलोट प्रतिसाद पाहून यात्रेचे आयोजन दरवर्षी करण्याचे ठरले. पुढे श्रीरामनवमीच्या यात्रेसोबतच श्रीरामजन्मोत्सवही कसा साजरा करण्यात येऊ लागला त्याची कथा पुढीलप्रमाणे.
श्रीरामनवमी यात्रेनिमित्त शिर्डीस आलेल्या कृष्णराव भीष्म यांनी श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्याची संकल्पना प्रथम काका महाजनी यांच्याकडे मांडली. श्रीरामनवमी यात्रेचा थाट पाहून त्यांच्या मनात ही इच्छा जागृत झाली. त्यांची संकल्पना काकांनाही पसंत पडली. मात्र ते म्हणाले, ‘‘बाबांचा होकार घ्या. त्यांच्या इच्छेवर सर्व अवलंबून आहे. त्यांचा होकार आला की, कार्य सुरू होण्यास उशीर लागत नाही.’’
काका महाजनी आणि कृष्णराव नंतर साईबाबांकडे गेले. काका पूजेची तयारी करू लागले तेव्हा बाबांनी त्यांना अडवले अन् विचारले, ‘‘वाडय़ात काय चालले होते?’’ साईंनी विचारलेल्या प्रश्नावर काय बोलावे हे काकांना कळेना. तेव्हा साईंनी त्यांना थेट विचारले, ‘‘का हो!… बुवा काय म्हणत होते?’’ त्यासरशी काकांना काही वेळापूर्वीचे संभाषण आठवले. त्यांनी लगेच भीष्म यांच्या मनातील श्रीरामजन्मोत्सवाचा हेतू साईंच्या कानावर घातला आणि बाबांनीही मोठय़ा आनंदाने त्यांना श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली.
दुसऱया दिवशी बाबा लेंडीबागेत गेल्याचे पाहून भक्त मंडळींनी श्रीरामजन्मोत्सवाच्या तयारीस मशिदीमध्ये उत्साहाने प्रारंभ केला. प्रथम पाळणा बांधण्यात आला. कीर्तनाचा थाट मांडला. उत्सवासाठी श्रोते व दर्शनार्थींची गर्दी झाली. तेवढय़ात बाबांचे आगमन झाले. पाठोपाठ काका आले आणि कीर्तनसाथ करण्यासाठी पेटी घेऊन बसले. तोच त्यांना बाबांकडून बोलावणे आले. काकांच्या मनात भय दाटून आले. साईबाबांनी परवानगी दिली, पण आज अचानक नकार दिला तर या विचाराने भयभीत झालेले काका धडधडत्या अंतःकरणाने बाबांपाशी पोचले. तेव्हा बाबांनी त्यांना विचारले, ‘‘हा पाळणा येथे कशासाठी बांधला?’’ त्यावर काकांनी श्रीरामजन्मोत्सव व आख्यान यांचा वृत्तांत सादर केला. काकांचे बोलणे ऐकून बाबांच्या चेहऱयावर आनंद पसरला. त्यांनी लगेच जवळच असलेला सुंदरसा हार काकांच्या गळ्यात घातला आणि दुसरा हार भीष्म यांना दिला. पुढे साईंच्या मंगलमय उपस्थितीत कृष्णराव भीष्म यांनी श्रीरामजन्माचे कीर्तन सादर केले. भीष्म बहुश्रुत होते. त्यामुळे कीर्तनाच्या सादरीकरणात त्यांनी रंगत भरली. साईंच्या चेहऱयावर अतिशय प्रसन्नता दिसून येत होती. भीष्म यांच्या कल्पनेतील श्रीरामजन्मोत्सव प्रत्यक्षात मात्र साईंच्या कृपाशीर्वादाने अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला.
श्रीरामजन्मोत्सवाचे कौतुक सरले. मात्र त्याच वेळी एक अप्रिय घटना घडली. हा आनंदोत्सव साजरा होत असताना कुणीतरी मध्येच उधळलेल्या गुलालाचा कण साईंच्या डोळ्यात गेला आणि एकाएकी त्यांनी रौद्ररूप धारण केले. निमित्त श्रीरामजन्माचे असले तरी बाबांनी मात्र श्रीनृसिंहरूप धारण केले. शिव्याशापांची उधळण केली. रामाचा पाळणा सोडण्याकरिता काका गेले असता बाबा त्यांच्या अंगावरच धावून गेले. त्यांनी काकांना पाळणा सोडू दिला नाही. तिथल्या एका जुन्याजाणत्या भक्ताने पाळणा सोडण्याची विनंती केली असता बाबा म्हणाले, ‘‘पाळणा सोडण्याची आताच गरज नाही.’’ बाबांना जणू सुचवायचे होते की, दुसऱया दिवशी उत्सवाची सांगता केल्याशिवाय पाळणा सोडू नये आणि त्यानुसारच घडले. दुसऱया दिवशी गोपाळकाला आणि प्रसाद झाल्यानंतर साईंनी पाळणा सोडण्यास परवानगी दिली.
शिर्डी येथील साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या द्वारकामाई मशिदीमध्ये पहिला श्रीरामजन्मोत्सव साजरा झाला त्याविषयीचा हा वृत्तांत आहे. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव उत्साहाने व चढत्या श्रेणीने रंगत गेला. पुढील वर्षी काका महाजनी यांनी ‘अर्वाचीन तुका’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या बाळाबुवा यांना उत्सवातील कीर्तनासाठी बोलावले. तिसऱया वर्षी कीर्तनकार बाळाबुवा सातारकर उत्सवाकरिता आले. मात्र त्यानंतर दीक्षितांची विनंती आणि बाबांच्या सूचनेनुसार श्रीरामजन्मोत्सवाच्या कीर्तनाची धुरा श्रीदासगणू महाराजांकडे आली. श्रीदासगणू महाराजांनी ही परंपरा अखेरपर्यंत उत्तम प्रकारे निभावली. श्रीरामजन्मोत्सव व श्रीरामनवमीची यात्रा या दोन्ही उत्सवांनी पाहता पाहता बाळसे धरले आणि दरवर्षी चढत्या श्रेणीने व साईभक्तांच्या उत्स्फूर्त, भरघोस प्रतिसादाने हे दोन्ही कार्यक्रम साजरे होऊ लागले. आजदेखील शिर्डीतील श्रीरामजन्मोत्सव व श्रीरामनवमी यात्रा या दोन्ही उत्सवांची लोकप्रियता अबाधित आहे. शिर्डीमधील द्वारकामाई मशिदीच्या ‘स्थान’माहात्म्यामुळेच जणू धर्म आणि जातिभेदाच्या पलीकडे पाहण्याचा नवा विचार येथे श्रीरामजन्मोत्सवाच्या रूपाने रुजला.


























































