
> प्रा. सचिन बादल जाधव
जगात अनेक विकसित देशांनी ईव्हीएम मशीनचे दोष ओळखून सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला व करत आहेत. या मशीनचा वापर केल्याने फायदा हा फक्त आणि फक्त मतदान, मतमोजणी व निवडणूक प्रक्रिया ही जलद होण्यासाठी होतो. ईव्हीएम मशीन हॅक कशी व कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते हे अनेक जागतिक राजकीय विश्लेषकांनी उदाहरणासहित जगासमोर मांडले. तरी पण हिंदुस्थानी लोकांचा आणि महत्त्वाचे म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचा विश्वास या ईव्हीएम मशीनवर आहे व तो हटण्यास काही तयार नाही. त्याचबरोबर आपल्या देशात अजून तरी काही लोकांना ईव्हीएम मशीनचे दोष व तिचा गैरफायदा कोण व कशा पद्धतीने घेत आहेत, हे समजले नाही आणि काहींना समजले, पण समजूनसुद्धा न समजल्यासारखी वर्तणूक ते देत आहेत. यामध्ये अनेक लोकांचा समावेश आहे. जसे, उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते मंडळी व इतर काही मोठमोठे उद्योगपती आदी.देशातील अनेक विरोधी पक्षांनी सर्वच निवडणुका या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून न घेता त्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात असा सूर अनेक वर्षांपासून लावला आहे, पण आपल्या निवडणूक आयोगाने न जुमानता सर्वच लहानमोठय़ा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर केला आहे.
संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन आणि निवडणूक आयोग ही भारतीय संविधानातील महत्त्वाची अंगे आहेत. त्यांचा आदर हा प्रत्येक हिंदुस्थानीला आहे, पण त्यांचा कारभार पारदर्शक, निरपेक्ष व संविधानानुसार होत नसेल तर जनतेला संविधानाने दिलेल्या हक्कांचा व स्वातंत्र्याचा वापर नक्कीच करावा लागेल. म्हणून सर्वच हिंदुस्थानींना माझे सांगणे आहे की, या ईव्हीएम मशीनला दुसरा पर्यायी मार्ग वापरू शकतो, तो म्हणजे निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मोठय़ा प्रमाणात दाखल करणे. कारण एका ईव्हीएम मशीनची उमेदवारी मर्यादा ही 16 आहे आणि एका कंट्रोल युनिटला फक्त चारच बॅलेटिंग युनिटस् जोडता येतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, एखाद्या वॉर्डामध्ये 64 उमेदवार उभे असतील तरच ही मशीन वापरता येते आणि जर 64 पेक्षा जास्त उमेदवार उभे असतील तर ही मशीन वापरता येत नाही. ईव्हीएम मशीनची मर्यादा लक्षात घेता निवडणूक आयोगाला ती निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याशिवाय गत्यंतर नसते. म्हणून आपल्याला लोकशाहीची होणारी गळचेपी, ईव्हीएम मशीनची असणारी वस्तुस्थिती, गौडबंगाल व भारतीय संविधान वाचवायचे असेल तर निवडणुकांमध्ये वॉर्डनिहाय 64 पेक्षा जास्त उमेदवार उभे करणे गरजेचे आहे आणि सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर नक्कीच आपली लोकशाही मजबूत होईल हे मात्र नक्की.




























































