
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
चीनच्या ‘प्रपोगंडा वॉर’चा मुख्य उद्देश मानसिक दबाव टाकून हिंदुस्थानला चीनच्या वेगवेगळ्या मागण्यांना होकार द्यायला लावणे हा आहे. चीन त्यात यशस्वी झाला का? चीन हिंदुस्थानविरुद्ध ‘प्रपोगंडा वॉर’ कशा प्रकारे लढतो आहे? हिंदुस्थान आपला बचाव कसा करत आहे? या युद्धामध्ये एक सर्वसामान्य देशभक्त नागरिक देशाची कशी मदत करू शकतो? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.
चीनने एक महिन्यापूर्वी लडाखला पाच ठिकाणी आणि सिक्कीममध्ये एक ठिकाणी अतिक्रमण करून हिंदुस्थानवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला. नंतर हिंदुस्थानच्या मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रपोगंडा किंवा अफवांचे पीक उगवले. हिंदुस्थानतल्या काही लेखकांनी, लष्करी अधिकाऱ्यांनी, राजकीय पक्षांनी, काही तथाकथित तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे चीनचे समर्थन करणारे लेख लिहायला सुरुवात केली. चीन हा अत्यंत बलवान आणि ताकदवान देश आहे. तुम्ही चीनचे ऐकायला पाहिजे नाहीतर तुमचा लष्करी पराभव आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. वेगवेगळ्या विषयावर प्रपोगंडा अविरत सुरू आहे.
काही उदाहरणे
- काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिले की, चीनने लडाखमध्ये खोलवर घुसखोरी केली आहे. अशी घुसखोरी कारगीलमध्ये झाली होती. हिंदुस्थानी सैन्य आणि सरकार हे पूर्णपणे गाफील होते. याकरता नॉर्दर्न कमांडचे मुख्य अधिकारी आणि 14 कोरचे मुख्य अधिकारी लेफ्टनंट जनरल हिंरदर सिंग यांना काढून टाकले पाहिजे.
- हिंदुस्थानी सैन्याने न लढताच आपली भूमी चीनला देऊन टाकली. या शिवाय जिथे घुसखोरी केली तिथे काठ्यांचा वापर करून हिंदुस्थानी सैन्याला मारहाण केली गेली. यामध्ये शेकडो हिंदुस्थानी सैनिक जखमी झाले.
- चीनने प्रचंड प्रमाणामध्ये आपले लष्कर लडाखमध्ये आणले. ज्यामध्ये रणगाडे, तोफा आणि इतर मोठी शस्त्रे आहेत. हिंदुस्थानी सैन्याची संख्या कमी पडत आहे.
- एक बातमी व्हायरल झाली की, चीनच्या मुख्य भूमीतून चीनने वेगाने आपले सैन्य तिबेटमधून हिंदुस्थानी सीमेवर आणले. त्यांचे रस्ते रेल्वे आणि विमानतळाचे जाळे अतिशय मजबूत असल्यामुळे काही तासांमध्येच मोठ्या संख्येने त्यांनी आपले लष्कर चीनच्या मुख्य भूमीतून तिबेटमध्ये हलवले. यामुळे हिंदुस्थान अतिशय घाबरला आहे.
- मीडियामध्ये चीनकडे असलेले रणगाडे व तोफा क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक शस्त्रे यांची आकडेवारी व्हायरल करून हिंदुस्थानी नागरिकांत घबराट पसरविण्याचा प्रयत्न झाला.
- दहा जूनला एक बातमी व्हायरल झाली की, दिल्लीस्थित आर्मी हेडक्वार्टरच्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आर्मी हेडक्वार्टर बंद करण्यात आले आणि सैन्याची दिल्लीमधली सगळी मोठी हॉस्पिटल बंद पडली आहेत. ही बातमी अर्थातच पूर्णपणे चुकीची होती.
सत्य काय आहे?
आपण कुठलीही भूमी गमावलेली नाही आणि चिनी अतिक्रमणाला आपण लगेच प्रत्युत्तर दिले आहे. चीनच्या पेक्षा जास्त सैनिक आपण तैनात केले आहेत. ज्यामध्ये रणगाडे, पोलादी गाड्या, तोफा सामील आहेत. ज्यामुळे चीनला अजून जास्त घुसखोरी करणे शक्य झाले नाही. आपणसुद्धा चिनी सैन्याच्या मारहाणीला आक्रमक उत्तर दिले आहे. चिनी लष्कराला जरी तिबेटमध्ये किंवा हिंदुस्थान-चीन सीमेवर आणले तरी त्यांना त्या भागांमध्ये प्राणवायू कमी असल्यामुळे 22 दिवस नऊ हजार फूट, 11 हजार फूट आणि १३ हजार फुटांवर युद्ध अभ्यास केल्याशिवाय लढाईकरता तयार होता येत नाही. अत्याधुनिक शस्त्रे ही हिमालयामधील डोंगराळ भागांमध्ये आणि 14 हजारहून जास्त उंचीवर सक्षमपणे वापरता येत नाहीत. रणगाडे काही प्रमाणामध्ये फक्त लडाखमध्ये वापरता येतात. त्यांना प्रत्युत्तर देण्यास हिंदुस्थानकडे तिथे आधीच रणगाडे आणि इतर मोठी शस्त्रे तैनात करण्यात आलेली आहेत. दुसऱ्या बाजूला चीनने सुरू केलेल्या प्रपोगंडा वॉरचा मुख्य उद्देश आहे की हिंदुस्थानातील तीन वेगवेगळ्या घटकांच्या मनावर दबाव आणायचा. पहिल्या स्तरावर हिंदुस्थानी सरकारने गुडघे टेकवून चीनचे ऐकायचे. दुसऱ्या स्तरावर हिंदुस्थानी सैन्य दलाचे मनोधैर्य खच्चीकरण करून त्यांना न लढताच मागे जायला भाग पाडायचे. तिसऱ्या स्तरावर हिंदुस्थानमधल्या चिनीप्रेमी तज्ज्ञांचा वापर करून हिंदुस्थानी नागरिकांचे मनोबल खच्ची करायचे की, हिंदुस्थानी सैन्य देशाचे रक्षण करू शकत नाही.
हिंदुस्थानी सैन्याचे मनोबल उच्च दर्जाचे आहे. हिंदुस्थानी सैन्य समर्थपणे चीनचा मुकाबला करत आहे आणि करायला तयार आहे. त्यामुळे चीनचा मारलेला हा बाण वाया गेला आहे. सरकारच्या स्तरावर हिंदुस्थान सरकारने कुठल्याही वाटाघाटींसाठी विनंती केलेली नाही. उलट चीनशी वाटाघाटी करण्याचे काम फक्त हिंदुस्थानी लष्कराला देण्यात आले आहे. त्यामुळे येथेही चीनला अपयश मिळाले आहे.
सामान्य नागरिकांच्या स्तरावर मात्र परिणाम झाल्याचा जाणवतो. 60 ते 70 टक्के हिंदुस्थान सोशल मीडिया वापरत असल्यामुळे अनेक देशप्रेमी नागरिकांना चीनविषयी भीती वाटायला लागली आहे. चिनीप्रेमी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीमुळे परिाqस्थती गंभीर आहे असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे सगळ्यांना आश्वस्त करणे गरजेचे आहे की आपण चीनला अतिक्रमण केलेल्या भागामधून परत जाण्याकरता नक्कीच भाग पाडले जाईल. जसे डोकलाममध्ये झाले होते.
प्रपोगंडा वॉर दोन प्रकारचे
प्रपोगंडा वॉरविरुद्ध चालवलेली कारवाई दोन प्रकारची आहे. एक म्हणजे डिपेâाqन्सव्ह किंवा रक्षात्मक. यामध्ये आपण आपले सरकार, सैन्य आणि नागरिकांच्या मनोबलाचे बरोबर माहिती देऊन रक्षण करतो. दुसरी आक्रमक म्हणजे ज्यामध्ये आपणसुद्धा चिनी सरकार, सैन्य आणि चिनी जनता यांच्याविरुद्ध प्रपोगंडा वॉर सुरू करू शकतो.
हिंदुस्थानी नागरिकांनी दाखवून दिले पाहिजे की चीनच्या मानसिक युद्धाला बळी न पडता आपण हिंदुस्थानी सैन्याच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. चिनी मालाचा बहिष्कार केला पाहिजे. ज्या वेळेस चीनला कळेल की हिंदुस्थानचे सगळे राजकीय पक्ष, जनता खंबीरपणे हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी सैन्याच्या मागे उभे आहे, त्यावेळेला चीन आपली आक्रमक कारवाई थांबवेल.



























































