कवडसे – झुळूक वाऱ्याची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

पाऊस आला की, येताना खूप काही घेऊन येतो. ढगांचे ताफे, सरीवर सरी, मनाला भिडणारा गारवा, हिरवं रान, जुन्या आठवणी आणि असंख्य वारे. काही सोसाटय़ाचे, काही बेभान तर काही हळुवार. काही वारे ओळखीचे तर काही अनोळखी, पण मनाला मात्र गारवा देऊन जातात. तरीसुद्धा मनाला ओढ असते ओळखीची चाहूल असणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकीची… कधी येईल आणि मनाला गारवा देऊन जाईल.

पावसातल्या एका संध्याकाळी असंच शांतपणे रिमझिम कोसळणाऱ्या सरी डोळ्यात साठवत मन कुणाची तरी वाट पाहत होतं. वाट पाहणं हे मनाच्या पाचवीला पुजलेलंच असतं. कधी बघावं तेव्हा मन कसली तरी वाट पाहत असतं. एकीकडे कोसळणारा पाऊस हळूहळू शांत झाला आणि मनाची ओढ अजून वाढत गेली. संध्याकाळ ढगांच्या गर्दीत हरवलेली. मन आठवणींच्या वादळातून सावरलेलं होतं आणि आता सावलीच्या शोधात होतं. तोच एक वाऱ्याची झुळूक अचानक आली आणि मनाला सावलीचा गारवा देऊन गेली. तिच्याशी मन बोलू लागलं आणि मनातील गुज सांगता सांगता संध्याकाळ ढळून गेली.

आता रात्रीच्या प्रहरी पुन्हा नवे वारे येतील आणि पुन्हा नव्या सरी येतील. माझं मन त्यांची वाट पाहील, पण ती वाऱ्याची झुळूक मात्र तेव्हा पुन्हा सापडणार नाही. कारण एखादी झुळूक अशीच आपल्या सोबत एक संध्याकाळ मजेत घालवते आणि पुढच्या प्रवासाला निघून जाते. तेव्हा ती इकडे तिकडे जात नाही. ती अशाच ठिकाणी जाते, जिथे एक असंच वेडं मन काही अनामिक क्षणांची वाट पाहत असतं. कळत नकळतपणे ती झुळूक त्या मनाला स्पर्श करून जाते तेव्हा त्या मनातले काही ताण, काही भावना सैल होतात. दोन मनातला दुवा म्हणून ती वाऱ्याची झुळूक काम करते. कारण काही क्षण असे असतात की, जेव्हा शब्दांचं काम थांबतं तेव्हा अबोल भावनांना काहीतरी बोलावंसं वाटतं. तेव्हा या लहरी वाऱ्याच्या मदतीने एकमेकांच्या मनाचा थांग घेऊ पाहतात. त्यांचं हे गुज मनातल्या मनात सुरु असतं. खूपदा आपण आपल्याला हवी असणारी झुळूक ओळखू शकत नाही. तर कधीकधी त्या वाऱ्याला स्वतःहून आपली ओळख करून द्यावी लागते. जेव्हा आपण त्या लहरी ओळखू शकत नाही तेव्हा नाराज झालेल्या भावना वादळाचं रूप घेऊन आपल्या खिडकीवर येऊन आदळतात. वादळ आलं या भीतीने खिडकीची कडी लावून बसतो आणि त्या भावना अजून नाराज होऊन परतून जातात. त्यांची भाषा आपल्याला कळत नाही.

काही भावना लाजत बुजत, अलगदपणे येतात आणि एक शांत वाऱ्याची झुळूक होऊन आपल्या मनाला हळुवार स्पर्श करून जातात. आपण त्यांना ओळखलं तरी त्या शांत असतात, पण मनाला आनंद देऊन जातात आणि नाही ओळखलं तरी शांतपणे मनातल्या मनात लपून बसतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मनातल्या भावना ओळखायलासुद्धा तसं मन लागतं आणि त्या नाही ओळखता आल्या तर त्यांची घुसमट कधी वादळाला जन्म देईल सांगता येत नाही.

काही अव्यक्त भावना मनात कोंडी करून बसतात आणि याच भावना पुन्हा नव्या सरी, नवे वारे यांची वाट पाहतात. कारण जिथून आलो तिथेच त्यांना परतायचं असतं. तो नवा ऋतू पुन्हा घेऊन जाण्याआधी जर त्या मनाने त्यांना ओळखलं तर ठीक, नाहीतर त्यांना कायमचं गमावून बसतो आपण. अशाच काही मनाच्या लहरी एका मनातून दुसऱ्या मनाला भेटायला नेहमी जात-येत असतात. हा आगळावेगळा निरोप ओळखणारी मनं घेतात आणि सुखी होतात. ज्यांना हे ओळखताच येत नाही अशी मनं बाहेर पाऊस कोसळू लागला की, खिडकीजवळ येऊन बसतात आणि वाट पाहू लागतात.

आजच्या संध्याकाळी येऊन गेलेली वाऱ्याची झुळूक कोणत्या दिशेला जाईल आणि तिच्या सोबत गेलेल्या बेधुंद मनाच्या लहरी कुणाला भेटून येतील किंवा कुणाच्या मनात राहतील हे नवा ऋतू आल्यावरच समजेल. तोवर तुझ्या मनातली प्रत्येक चाहूल तपासून पहा. कदाचित तुझ्या मनाच्या आसपास कुठेतरी ती झुळूक वाट पाहत बसलेली असेल…

तुझ्या मनाचीच झुळूक वाऱ्याची

यायची आणि जायची

मंजूळ मधूर गाणं ती गायची

काहूरलेल्या माझ्या मनाला

कधी ती दूर घेऊन जायची

मी शोधायचो नाही तिला

कारण मला ठाऊक होतं

ती तुझ्याच मनात लपायची

झुळूक वाऱ्याची यायची आणि जायची…

[email protected]