
>> स्वप्नील साळसकर, [email protected]
कुटुंबातील कमी मनुष्यबळ, मजुरांचा अभाव आणि पशुधन घटल्यामुळे शेतकऱयांनी झटपट उपाय म्हणून शेत बांधाबरोबरच आंबा, काजू बागायतीत तृणनाशकाचा (रान मारणे) पर्याय निवडल्याचे दिसून येत असून यामुळे सिंधुदुर्गातील मातीचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. जैवविविधता हळूहळू संपुष्टात येणार असून अन्नसाखळीतील अतिसूक्ष्म, दुर्मिळ कीटक नष्ट होत असल्याने भविष्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे.
कुटुंबातील कमी मनुष्यबळ, मजुरांचा अभाव आणि पशुधन घटल्यामुळे शेतकऱयांनी झटपट उपाय म्हणून शेत बांधाबरोबरच आंबा, काजू बागायतीत तृणनाशकाचा (रान मारणे) पर्याय निवडल्याचे दिसून येत असून यामुळे सिंधुदुर्गातील मातीचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. जैवविविधता हळूहळू संपुष्टात येणार असून अन्नसाखळीतील अतिसूक्ष्म, दुर्मिळ कीटक नष्ट होत असल्याने भविष्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे.
शेत बागायतीत काही वेळेस ग्रास कटरचा पर्याय निवडला गेला. काही ठिकाणी त्याचा वापरही होतो. मात्र कापलेले गवत पुन्हा उचलण्यासाठी मदतीची गरज असल्यामुळे रान मारण्यासारखा सोपा पर्याय निवडला जातो. जिह्यातील बीकॉम, बीएससी झालेल्या उच्चशिक्षित झालेल्या तरुणांकडूनही ‘रान शाप मारून टाक’ हा शब्द कानावर पडल्यावर पुढच्या पिढीसाठी मातीचे अस्तित्व टिकेल की नाही याबाबत शंका निर्माण होते. बागायतीत आंबा, काजू कलमांच्या शेजारी असलेल्या तृणांवर औषध मारून बागेची साफसफाई व्यवस्थित दिसत असली तरी या औषधाचे अंश दरवर्षी सातत्याने केलेल्या फवारणीमुळे जमिनीत उतरत असून भविष्यात ही माती कृषी उत्पादनासाठी योग्य राहील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. परराज्यात, देशाबाहेर जाणाऱ्या सिलिका, मायनिंग, वाळू, चिरा यांसारख्या सिंधुदुर्गातील समृद्ध संपत्तीला व्यावसायिक रूप आल्यामुळे ओरबाडणूक सुरू आहे. उत्पन्न वाढवण्याच्या स्पर्धेमुळे जिल्हा धोक्यात आला असतानाच आता तर येथील अनावश्यक म्हटल्या जाणाऱ्या तृणांवर मारा केला जाणाऱ्या स्लो आणि फास्ट या औषध फवारणीमुळे माती, निसर्गाच्या ऱहासाला कारणीभूत ठरणार आहे.
1997 साली सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. पर्यटनाच्या बाबतीत जिह्याने आपली कूस बदलली. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. वाहतूक व्यवस्था, दळणवळण सुविधेत बदल झाल्यामुळे तयार झालेल्या मालाला जवळच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, कर्नाटकसारख्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या. शेतकऱयांनी उत्पादन वाढीसाठी कृषी लागवडीवर भर दिला. नवनवीन बागायती तयार झाल्या खऱ्या मात्र सध्याच्या घडीला मजुरांचा अभाव असल्यामुळे अनावश्यक तृण हटवण्यासाठी तृणनाशकांच्या पद्धतीचा वापर वाढला. यासंदर्भात वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील कीटक शास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. ते म्हणाले शेतकऱयांकडील पशुधन कमी झाल्यामुळे चारा कापला जात नाही. यामुळे शेतकरी सहसकट तृणनाशकांचा वापर करतात. जे जमिनीसाठी घातक ठरू शकते, अशी भीती डॉ. मुंज यांनी व्यक्त केली.
घर परिसरात परसबागेत पावसाळ्यात कायम दिसणारे गांडूळ आता मात्र दुर्मिळ झाल्याचे पाहावयास मिळते. गांडुळांच्या अस्तित्वासाठी मातीची योग्यताच हळूहळू नष्ट होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतीत पूर्वीप्रमाणे शेण, गांडूळ खत, सेंद्रिय खताची मात्रा लागू पडताना दिसत नसल्यामुळे रासायनिक खतांचा मारा करण्याशिवाय शेतकऱयांकडे पर्याय उरलेला नाही.
गुरे चरावयाच्या जागांवर परिणाम
तृणनाशकाच्या सरसकट फवारणीमुळे गणेश चतुर्थीसह सण-उत्सव काळात दुर्वा, रानफुले मिळवण्यासाठी स्थानिकांची धडपड सुरू झाली आहे. गुरे चरावयाच्या जागाही धोक्यात आल्या असून गाई, गुरे, शेळ्या चरत असताना रानावर मारलेल्या तृणनाशकाचा वाईट परिणामही त्यांच्या शरीरावर होण्याचा प्रसंग नाकारता येऊ शकणार नाही.
मधमाशांची अस्तित्वाची धडपड
मधमाशांचे अस्तित्व पृथ्वीतलावरील मानव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. देवरायांमध्ये दिसून येणारी मोठमोठी मधाची पोळी आता दिसेनासी होऊ लागली आहेत. मधमाशा वनस्पतींच्या परागीभवनामध्ये शेतकरी, बागायदारांना मोठी मदत करतात. मात्र हवामानातील बदल, कीटकनाशकांचा होणारा मोठय़ा प्रमाणातील वापर यामुळे सजीवांच्या अस्तित्वासाठी जगणाऱ्या या इवल्याशा जिवाला वाचवण्यासाठी प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.



























































