एकमेकां सहाय्य करू…

>> किशोरी शहाणे-वीज (अभिनेत्री)

कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टींबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. सामाजिक अंतर सांभाळूनही आपण एकमेकांच्या मदतीला दुरुनच उभे राहतो. सद्भावना पोहोचवतो.

खरंतर सुरुवातीला शूट करायचे, नाही करायचे यामध्ये गोंधळलेले होते. पण सहा महिन्यांच्या गॅपनंतर कामाची विचारपूस सुरू झाली आणि मी कामाला सुरुवात केली. किती दिवस घरी बसणार आणि किती दिवस वाट बघणार. आतापर्यंत आपण अनेक समस्यांना सामोरे गेलो आहोत त्यामुळे आताही तसेच सामोरे गेलेच पाहिजे हे ठरवले आणि शूटिंगला जायला सुरुवात केली. यावेळी जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेणं, आसपासच्या वातावरणात जनजागृती ठेवणं हे ध्यानात ठेवले. सध्या मी मालिका आणि एक जाहिरात करतेय.

आतापर्यंत अशा प्रकारची सक्तीची सुट्टी कधी मिळालीच नव्हती. त्यामुळे या सुट्टीने बरेच नवीन अनुभव दिले. आपण बॅक टू रूट गेलो. आपण घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावत होतो. सगळे एकशेवीसच्या स्पीडने धावत होते. त्या स्पीडला ब्रेक लागला आणि परत साठच्या स्पीडने आयुष्य सुरू केलं. आपआपली कामं करणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं, सगळ्यांची फोन करून विचारपूस करणं या गोष्टींना प्राधान्य दिलं. एरव्ही कामाच्या गडबडीत नातेवाईक, मित्रमंडळींना फोन करून त्यांची विचारपूस करताही येत नव्हती. पण या सक्तीच्या सुट्टीत माझ्याकडे वेळ होता. त्यात सगळ्यांना आवर्जून फोन करून त्यांच्याशी गप्पा मारायचे. दरम्यान, मुळशी तालुक्यात पंचाहत्तर दिवस आमच्या फार्महाऊसमध्ये अडकले होते. त्याचा फायदा घेत तिथे राहून बागकाम केलं. कुठे मेथी, पालक, वांगी लावणं असे छोटय़ा प्रमाणात किचन गार्डन केले होते. त्यामुळे जे लावलं होतं त्याचा आनंद घेता येत होता. कारण आतापर्यंत आपण हे सगळं विकतच घेत होतो पण आपण लावलेल्या भाज्या, त्यांची रोपं हे सगळं फार मनाला ताजेतवाने करत होते. एवढेच नाहीतर गावामध्ये जिथे आम्ही होतो तिथे आम्ही गरजूंनाही शक्य तेवढी मदत करत होतो. किराणा मालाचं दुकान उघडलं की थोडसं जास्त सामान घेऊन गरजूंना वाटलं, मास्क वाटले अशा नकळतरीत्या सहज गोष्टी होतील त्या केल्या. या काळात सामाजिक मेसेजेस खूप दिले. सोशल मेसेज देणारी दहा, बारा गाणी शूट होत होती. तर रोज घरातील कामं आटपली की अर्धा दिवस शूटिंगमध्ये जायचा. डिबेटमध्ये सपोर्ट करणं, कुठे मुलाखत देणं अशा कोरोनासंबंधित बरेच उपक्रम केले. कुटुंबासोबत वेळ घालवतच होते पण त्याच बरोबर सोशल ऍक्टिव्हिटीजही करत होते.

शूटिंगला घरातून निघतानाही मी काळजी घेते. नुकतेच माझे मढआयलॅण्डला शूटिंग होते. एरव्ही मी ओला-उबेर कॅब करून वर्सोवा जेटीला जाते, तिथून पलीकडे जाते, तिथून कंपनीची गाडी येते आणि मग शूटिंगला जाते, या सगळय़ात माझा एक ते दीड तास वाचतो. शिवाय पेट्रोल -डिझेल वाचते. हे नॉर्मल कंडिशनमध्ये मी करते पण कोरोनामुळे मी फार सतर्क झालेय. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणे टाळते. जेटी म्हटल्यावर पुन्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट झाला. पलीकडे गेल्यावर कंपनीची गाडी येणार म्हणजे त्यातही बरीचशी माणसे आली गेली असणार. त्यातूनच आपण प्रवास करणार. त्यामुळे हे सगळं टाळून स्वतःची गाडी काढली आणि स्वतःच ड्राइव्ह करत मी शूटिंगला गेले. शूटिंगला पोहोचल्यावर मी सेटवरही तेवढीच काळजी घेते. शूटिंगला जाताना घरातूनच खाणं-पिणं घेऊन जाते. प्रत्येक गोष्ट निर्जंतुक करणं, मेकअप रूममध्ये गेले तरी ज्या खुर्चीवर बसणार ती निर्जंतुक करून मगच त्यावर बसते. मेकअप तर मी स्वतः करते त्यामुळे तो टच मी टाळते. सेटवरही आमची आवश्यक ती काळजी घेतली जाते. सोशल डिस्टंसिंग पाळून बसणे, एकमेकांची क्रिप्ट हातात घेतल्यावर लगेच हात सॅनिटाइज करणे, कारण सतत सेटवर हात धुणं शक्य नसतं. कॅमेऱयासमोर निश्चितच मास्क काढावा लागतो. पण ते कॅमेऱयापुरतचं. पण रिअर्सल करतानाही मास्क घालून रिअर्सल करतो, टेकला मास्क काढतो. सॅनिटायझर माझ्या पाऊचमध्ये ठेवलेलेच असते, त्यामुळे कुठेही शक्य तेव्हा हात सॅनिटाइज करते. सेटवर गेल्यावर प्रवेशद्वाराजवळच ऑक्सिमीटर, टेम्परेचर तपासून आम्हाला आत सोडले जाते, तसेच प्रत्येक रूममध्ये सॅनिटायझर ठेवलेले असतात. शेवटी निर्मात्यांनाही काळजी आहे की शूटिंग सुरू राहिले पाहिजे. मला वाटतं प्रत्येक सेटच्या प्रवेशाजवळ ऑटो सॅनिटाइज बॉडी स्प्रे मशीन लावले पाहिजे. कारण हात कितीही स्वच्छ केले तरी कपडय़ांवरून हा विषाणू पोहोचू शकतो. त्यामुळे ही मशीन सगळ्या शूटिंगच्या सेटवर असावी असे मला वाटते.

कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं. त्यात महत्त्वाचे म्हणजे कमी गरजांमध्ये आपल्याला जगायला शिकवले. आपल्या गरजा आपण कमी केल्या की आपलं आयुष्य मॅनेज होऊ शकतं. तसेच एकमेकांना सहाय्य करणं फार गरजेचं आहे. कारण एक मानवी साखळी कोरोनामुळे होतेय. ही साखळी सोशल ऍक्टिव्हिटिजमध्येही असली पाहिजे. कारण अशा काळात मदत करायची गरज असते ती सगळ्यांनाच जाणवली. कारण प्रत्येकजण मदतीला उभे राहत होते. कितीही वाईट काळ आला तरी आपण एकमेकांना मदत केली तर त्यातून नक्कीच एकमेकांना उभारी मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या