लेख – मुद्दा – अनुभवी जोकोविच आणि आक्रमक अल्कराझ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनिल दत्तात्रेय साखरे

विम्बल्डन ही तशी मानाची टेनिस स्पर्धा. जगभरातील स्पर्धांची क्रीडांगणे बदलली, त्यांचे नियम बदलले, पण बदलले नाही ते विम्बल्डन! आज इतक्या वर्षांनंतरही विम्बल्डनवरील हिरवळीची स्पर्धा तशेच चालू आहे. या स्पर्धा बघायला येणारे इंग्लंडमधील वेगवेगळ्या परगण्यांतील आणि शहरांमधील गौरगुलाबी रंगाच्या उंची वस्त्रप्रावरणे घातलेल्या ललना, त्यांच्या सोबत सुटाबुटातले जेंटलमन, त्यानंतर राजपरिवारातील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणारा बक्षीस समारंभ…सारे सारे काही विलक्षणच! खरे तर या वर्षी  ब्रिटनचे नवीन राजे किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी विम्बल्डनमध्ये हजर राहतील अशी सर्वांची अपेक्षा होती, पण ते काही झाले नाही.

शनिवारी महिलांच्या अंतिम स्पर्धेमध्ये झेक प्रजासत्ताकाच्या ओन्ड्रोउसोवाने आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आणि त्याची सुरुवात केली. त्यामुळे पुरुषांच्या लढतीमध्ये जोकोविचची घोडदौड अल्कराझ रोखणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता होती, जवळपास 23 ग्रँड स्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेल्या जोकोविचला नमविणे ही तशी मोठी कठीण कामगिरी, पण अल्कराझने विम्बल्डन स्पर्धेमध्ये सातत्याने विजय मिळवत आणि आपली कामगिरी उंचावत नेली. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या होत्या आणि दोघांमधील सामना खूपच संघर्षमय होणार याबद्दल जगभरातील प्रेक्षकांना उत्सुकता होती. तरुण, तडफदार आणि आकर्षक असा अल्कराझ आणि अनुभवसंपन्न जोकोविचचे विम्बल्डनच्या सेंटर मैदानावर आगमन होताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या मारून दोघांचे अभिनंदन केले. त्यानंतर झालेल्या पहिल्या सेटमध्ये 6-1 असा मोठय़ा फरकाने विजय संपादन करून जोकोविचने आपले इरादे स्पष्ट केले होते, पण दुसऱ्या सेटमध्ये अल्कराझने स्वतःला सावरून आपले कुठलेही मानसिक संतुलन ढळू न देता जोरदार प्रतिकार केला आणि उत्कृष्ट सर्व्हिसच्या जोरावर 7-6 असा विजय मिळवून जोकोविचला कडवा प्रतिकार केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये 6-1 अशी मजबूत आघाडी घेऊन आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या. तिसऱ्या सेटमध्ये  चौथा गेम खेळताना दोघांमधील तीव्र संघर्ष बघायला मिळाला. जवळपास शेवटच्या एका पॉइंटसाठी दोघांमध्ये बारा ते पंधरा मिनिटे संघर्ष झाला आणि मग तो गेम आपल्या नावावर करून अल्कराझ पुढे निघाला, परंतु अनुभवसंपन्न जोकोविचने पुन्हा स्वतःला सावरून चौथा सेट 6-3 च्या फरकाने जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये दोघांना समसमान संधी होती. त्यामध्ये सुरुवातीला  आघाडीही घेतली होती. जोकोविचने  4-4अशी बरोबरी साधली, पण त्यानंतर अल्कराझने आपला खेळ उंचावत नेला. बॅकहँड, फोरहँड, स्मॅश, व्हॉली असे वेगवेगळ्या फटक्यांचा तंत्रशुद्ध वापर करून जोकोविचची दमछाक केली. शेवटचा सेट 6-4 असा जिंकून विम्बल्डनच्या चषकावर आपले नाव कोरले आणि विम्बल्डनच्या जागतिक मैदानावरून आपल्या जगज्जेतेपदाची ललकारी दिली,

 ‘The depth of your struggle determine the height of your success’ या उक्तीप्रमाणे हे सर्व खेळाडू या अशा स्पर्धांसाठी किती आणि काय तयारी वर्ष, दोन वर्षे करतात हे समजून यावे. खरे तर हिंदुस्थानी खेळाडूंसाठी  ही विचार करण्यासारखीच गोष्ट. कारण खरे तर विम्बल्डनसारखी क्रीडांगणे कधीच कोणाला नशिबाने विजयश्री अर्पण करत नाहीत. ती खेळाडूंचे धैर्य, चिकाटी, संयम, मनोबल, संतुलन, जिद्द, वर्षभर स्पर्धेसाठी केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी या सर्वांची अगदी कठोर परीक्षा घेतात आणि मगच विम्बल्डनची खेळपट्टी खेळाडूला खऱ्या अर्थाने विजयश्री अर्पण करते. या सर्व कसोटय़ांवर खरे तर दोन्ही खेळाडू -जोकोविच आणि अल्कराझ- उत्तम होते, पण वीस वर्षीय अल्कराझचा तारुण्यसुलभ जोश, फटक्यांमधील जोरदारपणा, आक्रमकपणा आणि जिद्द या सगळ्या गुणांनी जोकोविचच्या अनुभवसंपन्नतेवर मात करून विम्बल्डनचा सुवर्ण चषक आपल्या हातातून उंचावून आपल्या विजयाची आणि पहिल्या ग्रँडस्लॅम विजयाची सुरुवात केली आहे. अल्कराझने सांगितले की, तो जेव्हापासून टेनिस खेळायला लागला तेव्हापासून जोकोविच त्याचा आदर्श राहिलेला आहे आणि आपण त्याला टेनिसमध्ये हरवण्याचे स्वप्न पाहिले होते, आज ते स्वप्न पूर्ण झाले आहे.