
गेल्या दीड वर्षात माणसांनी कोठे देव शोधला असेल तर तो डॉक्टरांमध्ये. कोरोनाचा हा नवीन आजार, ज्यावर कोणती लस नव्हती किंवा कोणताही ठोस… अशा वेळेस खरा कस लागला तो संपूर्ण जगातील डॉक्टरांचा आणि वैज्ञानिकांचा. या आजारावर उपाय काय, हा सर्वांसमोर प्रश्न होताच… त्यात डॉक्टरांचा थेट रुग्णांशी संपर्क येत होता. बघता बघता आपल्या देशातील रुग्णसंख्या वाढू लागली. त्या वेळेस सरकारी डॉक्टर आणि नर्स कमी पडू लागले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल 2020मध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टरांना मदतीची हाक मारली. अशा वेळेस अनेक डॉक्टरांनी त्यांच्या या हाकेला प्रतिसाद दिला, त्यातील एक नाव म्हणजे डॉक्टर धनंजय मोरे.
डॉक्टर मोरे सर्वप्रथम धारावी येथे रुजू झाले. धारावीची परिस्थिती अतिशय वाईट होती आणि तिथे झपाटय़ाने रुग्णसंख्येत वाढ होत होती. अशा वेळेस डॉ. मोरे यांनी तिकडच्या रुग्णांचा आढावा घेतला आणि उपचार सुरू केले. 3-4 दिवसांनंतर त्यांच्या लक्षात आले की, आजारापेक्षा लोकं इतर सर्व ताणतणावामुळे मानसिक आणि शारीरिकरीत्या जास्त कमजोर होत आहेत. त्यांना सकारात्मकतेची जास्त गरज आहे. म्हणून त्यांनी रुग्णांना खोलीत आत काsंडून न ठेवता काही वेळेसाठी बाहेर मैदानात येण्याची परवानगी दिली. ज्यामुळे त्यांना भरपूर ऑक्सिजन मिळेल. त्याचबरोबर सर्वांना योगा, प्राणायम करायला लावले आणि रोज त्यांना सकारात्मकतेचे धडे देण्यात आले. यामुळे त्यांच्यात चांगला बदल दिसू लागला. डॉ. मोरे म्हणतात की, औषधांबरोबरच चांगले जेवण, फळ, भाज्या खाणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळेच धारावीतील रुग्णांना लवकर बरे वाटू लागले. या यशानंतर ‘धारावी पॅटर्न’ इतर ठिकाणी राबविण्यात आला. धारावीनंतर डॉ. मोरे यांना 200 बेडच्या स्वतंत्र कोविड केंद्राची जबाबदारी मिळाली. तिथे जास्त वयस्कर रुग्ण होते. अशा रुग्णांना योगा करणेदेखील कठीण जात असे. तेव्हा त्यांच्या फुफ्फुसांना चांगला व्यायाम मिळावा आणि त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता वाढावी म्हणून त्यांना बलून थेरपी शिकवण्यात आली. याने त्यांच्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागले. त्यानंतर त्यांचे काम रेल्वेतून येणाऱया लोकांची तपासणी करणे हे होते. यावेळेसदेखील त्यांना वेगवेगळे अनुभव आले. रोज सकाळी 4 वाजता दादर स्थानकावर जाऊन बाहेरून येणाऱया प्रवाशांची ते तपासणी करत. पण प्रत्येक वेळेला संकटातून मार्ग काढायचा आणि संकटावर मात करायची हे त्यांना चांगले जमले होते.
त्यांचे काम बघून त्यांना दर वेळेला वेगवेगळ्या जबाबदाऱया देण्यात आल्या. सध्या ते ए वॉर्ड वॉर रूम येथे नियुक्त आहेत. आतापर्यंत असंख्य लोकांना त्यांनी त्यांच्या परीने मदत केली आहे. इतर सर्व डॉक्टर्सच्या सहाय्याने त्यांनी बऱयाच लोकांना मदत केली.
कोरोनाची पहिल्या आणि आता दुसऱया लाटेचा तडाखा सगळ्यांनी अनुभवला आहे. कोरोना आणि त्यामुळे करावे लागलेले लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचीच आर्थिक, सामाजिक तसेच माणसांच्या आरोग्याची व मानसिकतेची घडी विस्कटली आहे. ही घडी सावरण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर जसे सुरू आहेत तसेच ते सामाजिक, सेवाभावी संस्था, डॉक्टर्स, आरोग्य सेवेकरी, गृहनिर्माण सोसायटय़ा आणि इतर पातळ्यांवरदेखील होत आहेत. काहींनी व्यक्तिगत पातळीवरही या सेवाकार्याला हातभार लावला. अशा सर्वच ’कोरोना योद्धां’ना सलाम !
























































