मुद्दा – पाणथळ जागा गेल्या कुठे?

671

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

एक एकरपेक्षा जागा पाणथळ असू नये, ही पाणथळची व्याख्या बदलल्यामुळे मुंबईच्या सुमारे चारशे छोटय़ा पाणथळ जागा होत्या त्या इतिहासजमा झाल्यामुळे मुंबईलगतच्या छोटय़ा पाणथळीच्या जागाच कायदेशीरदृष्टय़ा नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कायदेशीर संरक्षण संपुष्टात आलेले आहे. परिणामी गेल्या चाळीस वर्षांत मुंबई शहराच्या आसपासच्या पाण्यालगतच्या पाणथळ जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्या नेमक्या कुणाच्या अधिकारक्षेत्रात येतात याचीच माहिती नसल्यामुळे कुणीही भूमाफिया उठतो, भराव टाकतो, जागा तयार करून त्यावर बांधकाम  उरकतो आणि त्या जागा गरजूंना विकून मोकळा होतो किंवा कायमचा पसार होतो. ज्या ठिकाणी मोठमोठय़ा उत्तुंग इमारती आल्या तेथे नवश्रीमंत नव्याने राहावयास आलेले आहेत. त्यांच्यासाठी जो घरेलू सेवक वर्ग त्यांच्या पाठीमागे आपोआप आलेला आहे, त्यांच्यासाठी भराव टाकून गरजूंना जागा विकण्याचा वा त्यावर झोपडय़ा उभ्या करण्याचा गोरखधंदा वाढलेला आहे. वीसेक झोपडय़ांचे नगर बनते, त्या नगराला लोकप्रिय पुढाऱयांची नावे दिली जातात. त्या एकदा स्थिरावल्या की, तात्पुरत्या नगराला वटवृक्षासारख्या फांद्या फुटून नगर क्र. 1, क्र. 2 अशा तऱहेने त्याच नावाच्या नगरांचा झोपडय़ांचा गट वाढत जातो. मतदार मिळविण्याच्या हव्यासापायी त्यांना वीज, पाणी, रस्ते यांची सोय मानवतेच्या नावाखाली कसेही करून वा कुठूनही करून देतात. उंदीर-घुशींसारख्या झोपडय़ा उभ्या राहतात व शहरांना कुरतडत असतात. मुंबईतील अनेक ठिकाणची पूर्वीची लोकवस्ती व सध्याची लोकवस्ती यांचा तुलनात्मक विचार करावा म्हणजे छोटय़ा छोटय़ा पाणथळ जागा कशा शहर स्वाहा करीत आल्यात याचा अंदाज येईल. मिठागरे, कांदळवन (खारफुटी) सारख्या पाणथळ जागा समुद्राची कवचकुंडले असताना ती इतिहासजमा होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या