
>> अरुण जोशी
फार वर्षांपूर्वी रूपकुमार राठोडला पाहिलं होतं ते अनुप जलोटा यांच्या कार्यक्रमात, तबलावादक म्हणून. अनुपजींच्या ‘ऐसी लागी लगन’सारख्या गाण्यांनी रसिक नादावले होते. त्यात एक तरुण तबल्याची उत्तम साथ करायचा. पुढे तो पार्श्वगायक होऊन बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होईल याची तेव्हा कल्पना नव्हती. रूपकुमारचा जन्म मुंबईचा. मात्र त्याचं सांगीतिक घराणं जामनगरचं. त्याचे वडील पंडित चतुर्भुज राठोड त्यांच्या धृपद गायिकीसाठी प्रसिद्ध होते. थोडक्यात ताल-सुरांचं वातावरण असलेल्या घरातच रूपकुमारचं बालपण गेलं.
रूपकुमारचा भाऊ सिनेसृष्टीत संगीतकार झाला. त्याचं नाव श्रवण. रूपकुमार मात्र तबलावादनात पारंगत होता. मात्र तो केवळ तालवाद्यात रमणारा नव्हता. कारण हातातल्या जादूप्रमाणेच त्याच्या कंठातही सूर होते आणि कधी ना कधी ते प्रगट होणारच होते. त्याचा दुसरा भाऊ विनोद गाण्याच्या क्षेत्रात आधीच पोहोचला होता. सुरुवातीला त्यानेही गजल गायन केले, पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासारख्या मातब्बर संगीतकारांकडे पार्श्वगायन करण्याची संधी त्याला मिळाली. ‘गुमराह’ चित्रपटासाठी त्याने ‘मै तेरा आशिक हूं’ हे पहिलं गाणं गायिलं आणि नंतर त्याला मागे वळून पाहण्याची वेळ आलीच नाही. नंतरच्या काळात अनेक चित्रपट, अल्बम, सांगीतिक कार्यक्रम यातून रूपकुमार राठोड हे नाव रसिकांपर्यंत पोहोचलं. कार्यक्रमात मन्ना डे यांचं ‘ए मेरी जोहरा जबी’ या गाण्यापासून ‘दिल को तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ’ अशा कोणत्याही गाण्यातल्या शब्दांची आवर्तनं करीत श्रोत्यांनाही त्यात सहभागी करून घेण्याचं गजल गायिकीतलं कौशल्य राठोड यांना उपयोगी पडलं. कार्यक्रम चांगलेच गाजायला लागले. त्यातच एकीकडे हिंदी चित्रपटातली घोडदौड सुरूच होती. ‘सरफरोश’मधलं ‘जिंदगी मौत ना बन जाये यारों’सारखी उत्तम गाणी त्यांना मिळाली. ती मैफलीत रंगवून सादर करण्यातला आनंद त्यांनी मिळवला. आमिर खान, शाहरुख खान अशा नायकांनी पडद्यावर साकारलेल्या गाण्यांना स्वर दिल्यामुळे रूपकुमार यांची लोकप्रियता वाढली. ‘तुझ मे रब दिखता है, यारा मै क्या करू’ हे शाहरुखवर चित्रित झालेलं त्याचं गाणंही खूप गाजलं.
1980 च्या दशकात तबलावादनाकडून हाती संवादिनी (पेटी) घेऊन गझलांचे कार्यक्रम सादर करणाऱ्या रूपकुमार यांचा हिंदी चित्रपट गीतांचा सिलसिला 1989 पासून सुरू झाला तो आजतागायत. ‘बॉर्डर’ चित्रपटातलं ‘संदेसे आते है’ हे सोनू निगमसह त्यांनी गायिलेलं हृद्य द्वंद्वगीत आजही रसिकप्रिय आहे. अशी किती तरी चित्रपटांतली यशस्वी गाणी रूपकुमार यांची सांगीतिक कारकीर्द घडवण्यात मोलाची ठरली. ‘गुमराह’, ‘बॉर्डर’प्रमाणेच ‘अंगार’, ‘नाजायज’, ‘भैरवी’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘हम साथ है’, ‘लक्ष्य’, ‘वीर-झारा’, ‘सरफरोश’, ‘अग्निपथ’ या अनेक चित्रपटांमधल्या गाण्यांनी रूपकुमार राठोड यांना हिंदी सिनेक्षेत्रात यशस्वी केलं. त्याचबरोबर त्यांनी मराठी, तमीळ, उडिया, नेपाळी, बंगाली, कन्नड अशा विविध भाषांमधून गाणी गायिली.
मराठीच्या बाबतीत सांगायचं तर ‘अनुभूती’ नावाच्या कार्यक्रमात त्यांनी त्यांना आवडणारं आशाताईंचं ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली’ हे कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं सादर करून श्रोत्यांची मनं जिंकली. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘अजय (पोहनकर) यांच्यामुळे मी हा प्रयत्न करतोय. काही चुकलं तर क्षमा करा.’ रूपकुमार यांची पत्नी सुनाली तेव्हा हृदयनाथांकडे शिकत होत्या. त्यामुळे ते माझेही गुरू आहेत, पण माझी साधना एकलव्यासारखी आहे, असे रूपजी म्हणाले होते. त्यांनी आणि सुनाली यांनी ‘मिशन उस्ताद’ या ‘टीव्ही शो’मध्ये ‘उत्साद जोडी’चा सन्मान मिळवला होता. याशिवाय त्यांचे सुफी गजलांचे कार्यक्रमही खूप लोकप्रिय ठरले. त्रिलोक गुरू, रणजित बारोट, अजय पोहनकर या तरुण सहकाऱ्यांच्या साथीनेही त्यांनी स्टेज गाजवलं. ‘तू तिथं मी’ नावाच्या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड यांनी जयश्री शिवराम यांच्यासह दोन द्वंद्वगीतं गायिली.
‘शब्दाविना ओठातले कळते मला, कळले तुला’ आणि ‘युगायुगांचे नाते अपुले’, ‘नको दुरावा’ ही दोन्ही गाणी यू-टय़ूबवर पाहता येतील. रूपकुमार राठोड यांची आणखीही मराठी गीतं असतील. कारण मुंबईतच जन्मलेल्या नि वाढलेल्या रूपकुमार यांचा मराठीशी परिचय तर बालपणापासून असणार. टिपेला जाऊ शकणारा भरदार स्वर त्यांना लाभला आहे. तालवाद्याची (तबला) यशस्वी कारकीर्द बहरत असतानाच त्यांना आपल्या सूरशक्तीचा शोध लागला आणि हिंदी सिनेसृष्टीला एक दमदार गायक मिळाला. अंतर्मनातून आलेल्या या ‘संदेशा’ला त्यांनी योग्य न्याय दिला.


























































