विज्ञान – वापर आणि विचार

1647

>> दिलीप जोशी

28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व आता सारेच मान्य करतात. गेल्या काही शतकांत तर आधुनिक विज्ञानाने जग व्यापलं. मग अंतराळ काबीज केलं. आता नित्यनव्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल फार काही विस्मयकारी वाटेनासं झालंय इतके आपण त्याला सरावलोय.

मेणाच्या ‘प्लेट’ किंवा तबकडीवर कोणताही आवाज नोंदवून तो ऐकता येईल किंवा काचेच्या गोळय़ातून प्रकाशाचा झोत पडेल या गोष्टी कविकल्पना वाटल्या असल्या, परंतु यंत्र तंत्रज्ञानाच्या संशोधनाने विलक्षण वेग घेतला आणि विविध प्रकारची सुखसाधनं माणसासाठी काम करू लागली. पन्नास वर्षांपूर्वी ‘कपडे धुण्याचं यंत्र’ म्हणजे वॉशिंग मशीन हीसुद्धा चकित करणारी गोष्ट वाटली होती. आता रोबोटिक झाडूपासून ते घरकाम करणाऱया यंत्रमानवापर्यंत प्रगती झाली आहे.

जीवनाशी निगडित असलेल्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्यक्ष संशोधन होत आहे. त्यासाठी मोठमोठय़ा संस्था कार्यरत आहेत. नवी वेगवान वाहनं, गतिमान कॉम्प्युटर, प्रभावी औषधं, वातावरणाचा अचूक मागोवा घेणारी यंत्रणा, शेतीविषयक सुधारणा अशी आणि इतर अनेक क्षेत्रं संशोधनाच्या कक्षेत येतात. या सर्व संशोधनाचं उद्दिष्ट माणसाचं जीवन सुखी, समृद्ध करावं असं असतं किंवा असायला हवं.

विज्ञानातील बहुविध संशोधन उत्पादनाच्या स्वरूपात ‘युजर फ्रेन्डली’ किंवा ग्राहकमित्र होऊन आलं की त्याचा वापर सोपा होतो. गतकाळाच्या अनेक टप्प्यांत तसा तो झालाच. परंतु विज्ञानाचा दैनंदिन जीवनातील वापर वाढला म्हणजे विज्ञानाचा विचार रूजला असं म्हणता येईल का?

अनेकदा आपण अनुभवत असलेल्या गोष्टींमागचं विज्ञान म्हणजे कार्यकारणभाव जाणून घ्यायचा प्रयत्न होत नाही. गतानुगतिक पद्धतीने आपण विचार करत राहतो. संशोधक, वैज्ञानिक त्यामागचं वैज्ञानिक रहस्य उलगडून सांगतात. बाराव्या शतकात आपल्या महाराष्ट्रात भास्कराचार्य नावाचे खगोलशास्त्र्ाज्ञ होऊन गेले. पृथ्वी अंतराळात अधांतरी फिरते इथपासून ते सूर्य-चंद्राची ‘ग्रहणं’ नेमकी कशी होतात हे त्यांनी सांगितलं. पायथॅगोरसचा सिद्धांत आधीच सोप्या शब्दांत मांडला आणि पृथ्वीचा परिघही मोजण्याची रीत सांगितली. त्याच काळात संत ज्ञानेश्वरही ‘जैसे सूर्याचे न चालताही चालणे’ असं नोंदवून गेले म्हणजे सूर्याचा पूर्व ते पश्चिम हा दिवसाचा प्रवास भासमान आहे याची त्यांना कल्पना होती. ज्ञानेश्वरीतच धातूची मूर्ती घडवणाऱया भट्टीचा उल्लेख असल्याचं एका ज्येष्ठ शिल्पकाराने सांगितलं होतं.

विज्ञानाने अशी कोडी सोडवली तरी परंपरेचा म्हणून एक प्रभाव असतोच. आमच्या खगोल कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही श्रोत्यांना प्रश्न विचारतो, ‘खगोलशास्त्र्ााबद्दल किती जणांना माहिती आहे?’ बहुतेक जण नकारार्थी उत्तर देतात. मग वक्ता म्हणतो, ‘ज्या पृथ्वीवर आपण आहोत ती खगोलातच आहे. तुम्ही ‘सनसेट पॉइंट’वर जाऊन मावळतीचा सूर्य पाहता किंवा पौर्णिमेच्या चांदण्याचा आनंद घेता हेसुद्धा खगोलातच येतं.’ मग श्रोते आमच्याशी ‘कनेक्ट’ होतात. नित्यानुभवाच्या या गोष्टींमागचं विज्ञान त्यांना समजावून घ्यावंसं वाटतं. आपली पृथ्वी सूर्याभोवती सेकंदाला सुमारे तीस किलोमीटर वेगाने फिरते असं म्हटलं तर आश्चर्य वाटतं, पण त्यामुळेच कुतूहल जागृत होतो आणि ज्या वैज्ञानिक गोष्टींचा नकळत अनुभव घेतला त्याविषयीचा विचार मनात रुजतो.

सहजसोप्या आणि जनसामान्यांना समजेल अशा शब्दांत विज्ञान समजावलं तरच ते जनमानसात रुजेल. कारण प्रत्येक व्यक्ती विज्ञानशाखेची विद्यार्थी नसते. विज्ञान मात्र क्षणोक्षणी वापरत असते. अगदी स्वयंपाकात ‘फोडणी’ देण्यामागेही विज्ञान असतंच. ते चटकन समजेल अशा शब्दांत मांडावं लागतं. आपलं चांद्रयान पृथ्वीभोवती अनेक फेऱया मारून वेगवर्धन करत कसं गेलं हे सांगताना झोपाळय़ाचा पहिला झोका आणि नंतरचा पाय जमिनीला जरासा टेकवून वेग वाढवणारा झोका असं उदाहरण दिलं की पटतं. इथे विज्ञानाचा विचार सुरू होतो. आता अनेक शास्त्र्ाज्ञ विज्ञानाचा विचार लोकाभिमुख करण्यासाठी सुबोध शैलीचा वापर करण्यावर भर देतात. फेनमन या भौतिकशास्त्र्ाज्ञाची व्याख्यानं युटय़ूबवर पाहा. या गोष्टीचा प्रत्यय येईल. आपण विज्ञानाच्या वापराबरोबरच त्याचा विचार करू लागलो तरच त्याचा वापर विचारपूर्वक आणि सकारात्मक होईल.

आपली प्रतिक्रिया द्या