ठसा – आलुरे गुरुजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण, राजकारण, संस्थाचालक अशा कार्यक्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची अमीट छाप सोडणारे आणि ‘मराठवाडय़ाचे साने गुरुजी’ अशी ओळख लाभलेले शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी गेले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि राजकीय क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. पांढरा स्वच्छ धोतर, झब्बा, डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावातील हे व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या आयुष्यावर महात्मा गांधी, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याचा प्रभाव राहिला. शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले.

बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात सहा सप्टेंबर 1932 साली जन्म झालेल्या सिद्रामप्पा नागप्पा आलुरे यांनी शिक्षकी पेशाचा प्रारंभही सरकारी प्राथमिक शाळा पाडळी येथूनच केला. हाडाचा शिक्षक काय करू शकतो, हे सिद्रामप्पांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले. शिक्षकाची नोकरी लागल्यापासून त्यांनी आपल्या पगारातील 25 टक्के रक्कम गरीब, मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवली. नंतरच्या काळात ते शिक्षक आमदार झाले. त्या काळातही मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. सरकारी शिक्षकाची नोकरी काही दिवस केल्यानंतर ते तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून  कार्यरत असताना शिक्षण आणि राजकारण अशा दोन्ही आघाडय़ांवर ते कार्य करू लागले. 1980 च्या सुमारास काँग्रेस पक्षाकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले, त्यावेळी त्यांनी शेकापच्या माणिकराव खपले यांचा पराभव केला. 1990 च्या सुमारास रुजू झाल्यानंतर काही दिवसांनी ते मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले. आलुरे गुरुजींनी अणदूर येथे 1959 च्या सुमारास रुजू झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. अवघ्या 21 विद्यार्थ्यांना घेऊन जवाहर विद्यालयाची सुरुवात केली. आज तुळजापूर तालुक्यात संस्थेचे एक महाविद्यालय, 2 उच्च माध्यमिक विद्यालये, 10 माध्यमिक  शाळा, एक प्राथमिक शाळा, 1 रात्रशाळा, तीन बालवाडय़ांमधून साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचा महत्त्वाचा गुणविशेष सांगायचा म्हणजे आलुरे गुरुजी यांची शिस्त, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, शिवाय मोफत शिक्षणाची सोय हे सांगता येईल. या शाळेचे आलुरे गुरुजींचे अनेक विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत. दहावी परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान जवाहर विद्यालयाने पटकावला. शिक्षण प्रवासाची ही शैक्षणिक गंगा आजही प्रवाही आहे. आलुरे गुरुजी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान होत. 1978 पासून त्यांचे पक्षबांधणीत महत्त्वाचे योगदान राहिले. शैक्षणिक आणि राजकीय कार्यासोबतच ते विविध सामाजिक कार्यात, अंधश्रद्धा निर्मूलन, भारत जोडो अभियान, व्यसनाधीनता निर्मूलन, साक्षरता अभियान, पोतराज, मुरळी निर्मूलन, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ अशा वेगवेगळ्या चळवळीत कार्यरत असत. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले गुरुजी खऱ्या अर्थाने डोळस होते. काँग्रेसची विचारधारा, गांधी, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे यांचा प्रभाव; अशा सम्यक मिश्रणातून त्यांची नाळ कायम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी जोडलेली होती. खेडय़ातल्या मुलांना शिक्षणाच्या सोयी मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी अणदूर येथे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. नंतरच्या काळात संस्थात्मक कार्यास राजकीय बळ शिक्षक आमदार या माध्यमातून लाभले. एकवीस विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सुरू केलेल्या शाळेचा मोठा वटवृक्ष झाला. वयाच्या 90 वर्षांच्या प्रवासात त्यांनी शिक्षण आणि राजकारणाच्या क्षेत्रात विविध पदेही भूषविली. जिल्हा शिक्षण मंडळ, पंचायत राज समिती, एसटी महामंडळ यांचे सदस्य, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, अणदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष, शिखर बँकेचे 15 वर्षे संचालकपद, श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असे कितीतरी सांगता येईल. एखाद्या व्यक्तीमुळे पदाचीही शोभा वाढते, ते आलुरे गुरुजींच्या बाबतीत अगदी खरे वाटते. या वैविध्यपूर्ण आणि लक्षणीय कार्याचा सन्मान वेळोवेळी झाला. ग्राम गौरव, गांधी फोरमचा समाजभूषण, मराठवाडा विकास मंचचा मराठवाडा भूषण, सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाचा कर्मयोगी, श्री सिद्धेश्वर सर्वसेवा संघाचा मानवभूषण अशा अनेक पुरस्कारांची नावे सांगता येतील. शिक्षण, राजकारण, सामाजिक, सहकार अशा क्षेत्रात आलुरे गुरुजी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा उमटवली, ठसठशीत केली. हाडाचा शिक्षक शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कार्य तर करू शकतो, पण त्याचबरोबर तो ज्या ज्या क्षेत्रात जाईल तिथे तिथे आपला प्रभाव पाडू शकतो, हेच सिद्रामप्पा आलुरे गुरुजींच्या प्रदीर्घ प्रवासावरून आपल्या लक्षात येऊ शकते.

  •  प्रशांत गौतम