साहित्य जगत- सोबत आणि दिलासा

>> रविप्रकाश कुलकर्णी

आपलं काहीतरी बिघडलं असलं की, सगळंच आपल्याला बिघडल्यासारखं वाटायला लागतं. आजपर्यंत करत आलेला प्रवास आपल्याला  जिकिरीचा वाटायला लागतो. दिवसेंदिवस परिस्थिती पूर्वीपेक्षा जटिल व्हायला लागली आहे हे खरंच, पण पूर्वी तरी असं काय सगळं सुकर आणि सोपं होतं? पण तेव्हा सगळी सोसायची ताकद आणि तयारी असायची. आता तसं नाही. आधी मनाने नकोसं वाटतं आणि नंतर शरीराने. पण अजून ते स्वीकारायची तयारी होत नाही. अशा वेळी घालमेल होते. हॅम्लेट म्हणतो… ‘टू बी  ऑर नॉट टू बी’ ते हेच!

अशा वेळी कोणाचे तरी अगत्याचे आमंत्रण येते. कुणाला तरी अजून आपण हवेहवेसे वाटतो ही कल्पनाच मनाला उभारी आणते. त्यात पुन्हा पुण्याचे असले की काय विचारता? पूर्वीसारखे पुणे राहिले नाही हे जरी खरे असले तरीसुद्धा पुण्याची जादू अजून आहेच. त्यामुळे पुण्याला जायला मला काहीही कारण पुरते. आतादेखील तसंच झालं.

‘सोबत’कार ग.वा. बेहेरे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात एकेकाळी पराकोटीचे मतभेद होते. आधी शाब्दिक युद्ध झाले आणि नंतर हाणामारीपर्यंत प्रकरण वाढत गेले. मात्र पुढे दोघांची दिलजमाई झाली. अनेकांच्या मनात जे व्हावंसं वाटत होतं ते झालं. त्या वेळी बेहेरे यांनी त्यासंबंधात अप्रतिम लेख लिहिला होता. तो अर्थात हिंदुत्वासंदर्भात होता. हे मी कुणाला तरी सांगत होतो. तेव्हा हे पण सांगितले की, बेहेरे यांनी आपले पुस्तक बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण केले. त्यात त्यांनी आपल्या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

ज्यांना हे सांगितले त्यांचे किती समाधान झाले, माहीत नाही, पण  मन म्हणायला लागले, संदर्भ द्यायला हवा. मागे ग.वा. बेहेरे विशेषांक निघाला होता, त्यात माझ्या लेखात हा संदर्भ असावा, पण तो लेख माझ्या हाताशी नव्हता. ग.वा. बेहेरे यांचा मुलगा रवी बेहेरे यांच्याकडेदेखील तो अंक सापडेना. मग आता करायचं काय? शोध तरी कसा करायचा?

अशी अस्वस्थता फार त्रासदायक असते. काही सुधरत नाही आणि सुचतही नाही. मग एकदम आठवलं, दिलीपराज प्रकाशनने ग.वा. बेहेरे यांची बरीच पुस्तके प्रकाशित केली आहेत, त्यात हे असणार. वाचनालयात जाऊन शोध घेणे कठीण म्हणण्यापेक्षा वेळखाऊ होतं. यावर मार्ग एकच होता…दिलीपराज प्रकाशनात जाऊन धडकणे. सुदैवाने दिलीपराजच्या राजीव बर्वे यांनी सहकार्य करायचे कबूल केले.

पुण्यात दाखल झालो. विशेष म्हणजे दिलीपराजच्या स्टाफने आनंदाने सहकार्य केले. बेहेरे यांची पुस्तके शोधून उपलब्ध करून दिली. तिथे बसून प्रत्येक पुस्तक चाळण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण अखेर एकदाचा संदर्भ सापडला. बेहेरे त्या लेखात म्हणतात,“बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा घरोबा सोडून दिला आहे, हिंदुत्वाची पताका हाती घेतली आहे. मराठी माणसासाठी सर्वस्व नाशाला तयार झाले आहेत. मग माझी त्यांच्याबद्दल कोणती तक्रार शिल्लक राहते? ते लोकशाहीवादी आहेत की नाहीत, या कूट प्रश्नाचे उत्तरे शोधण्यात मला स्वारस्य वाटत नाही. आजचे तातडीचे आणि गरजेचे हिंदू, मराठी माणसांचे प्रश्न जो कोणी सोडवीत असेल, त्याच्या बाजूला राहण्यात मला कमीपणा वाटणार नाही. हमीद दलवाई यांच्यासारख्यांशी माझे उत्तम जमले. कारण राष्ट्राची त्यांना चिंता होती. मग बाळासाहेब  ठाकरे यांनी असे काय केले आहे की, मी त्यांच्याशी वैरासाठी वैर करावे? बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत आता पूर्वीपेक्षा बराच फरक झालेला आहे. जुने वैर विसरायचे अशी त्यांची इच्छा आहे आणि मी तर ‘दोन द्यावेत, दोन घ्यावेत आणि वैर मनात ठेवू नये’, अशा सावरकरांचा अनुयायी. माझे ठाकरेंशी जमणार नाही, तर भाई वैद्यांशी जमेल की शहाबुद्दीनशी जमेल? राष्ट्रीय अहंकार हा वैयक्तिक अहंकारापेक्षा कितीतरी मोठा असतो. ग.वा. बेहेरे या व्यक्तीच्या अहंकाराला अशी किती किंमत आहे?

बाळासाहेब ठाकरे जेव्हा माझ्या घरी आले, तास दोन तास जेव्हा बसले आणि दिलखुलास गप्पागोष्टी केल्या, त्या वेळेस मी त्यांच्याकडून एक अभिवचन घेतले. ते म्हणजे ‘हिंदुत्वाचे निशाण मी कधी सोडणार नाही. हिंदुत्वाचे निशाण घट्ट धरणारे ठाकरे यांचे हात मी हातात घेतले, ते मी कोणत्या लोभाने सोडावेत? लाख चुका जरी झाल्या असतील तरी हिंदुत्वाचा धागा इतका चिवट आहे की, उरलेला काळ तो आम्हाला एकत्र बांधून ठेवेल.’’

26 जानेवारी 1986 च्या ‘सोबत’मध्ये असलेल्या लेखातला हा काही भाग मुद्दाम उद्धृत केला आहे. या सद्भावनेची पुढची पायरी म्हणजे पुढे ग.वा.बेहेरे यांनी आपले पुस्तक अर्पण करताना म्हटले आहे…

‘चि.बाळ ठाकरे

यांचा बुलंद आवाज

हिंदूंना संरक्षणाची ग्वाही देतो.

मराठी माणसांना तो सदैव धीर देतो.

तो आहे तोवर मुंबई महाराष्ट्राची राहील.

त्याच्या देशप्रेमाबदल वा धर्मप्रेमाबद्दल

कसलीही शंका घेणे नीचपणाचे आहे.

तथाकथित पुरोगामी आणि सत्तांध

राजकारणी संधी मिळताच त्याला

बदनाम करण्याचा यत्न करतात.

तरीही भवानी तलवारीचे हे टोक

तळपते राहिले आहे,

तळपते राहणार आहे.

त्या टोकास.’

हे लिहीत असताना महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होताना दिसत होती. तिचा निष्कर्ष तर आता आपल्या डोळ्यांसमोर आहे. अशा वेळी समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना उपदेश करताना म्हटलं होतं… तुझा तो वाढवी राजा!

हा आदर्श डोळ्यांपुढे असला म्हणजे पुरे.