व्यायामशाळा : पैलवान गडी

330

>> वरद चव्हाण, [email protected]

अभिनेता अनिकेत केळकर. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्यापेक्षा 1000 सूर्यनमस्कार… दंडबैठका यावर त्याचा भर.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजचा हा लेख एका अशा सेलिब्रिटीचा आहे, जो आज वयाच्या फॉर्टीज क्लबमध्ये असूनसुद्धा त्याचा शूटिंगमध्ये ऑन ऍण्ड ऑफ कॅमेऱयाचा उत्साह बघून आमच्यासारखे तरुणसुद्धा ओशाळतात. आजवर त्यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्टय़ातले अनेक चित्रपट केलेत, पण ‘लक्ष्य’ या मालिकेमुळे तो सगळय़ांचा लाडका झाला. आमच्या क्षेत्रात आदराने त्याच्या नावापुढे ‘जी’ लावलं जातं. हे आहेत आपले आजचे सगळय़ांचे लाडके सेलिब्रिटी ‘अनिकेतजी’ केळकर. मित्रांनो, फिट असणं म्हणजे किती ऍब्स दिसतात किंवा बायसेप्स किती इंची आहेत असं नाही. आज चाळिशीत असूनसुद्धा अनिकेत त्याला हवं ते खाऊ शकतो. त्याशिवाय त्याच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या लोकांच्या बरोबरीने अक्षरशः मेकअप रूममध्ये हैदोस घालणं हेसुद्धा माणूस फिट असण्याचे चिन्ह आहे, नाही का? अनिकेतशी या लेखानिमित्त बोलताना मला जाणवलं की, हल्लीच्या व्यायामशैलीवर त्याचा फारसा विश्वास नाही. आताच्या अत्याधुनिक मशिन्स, प्रोटिन्ससाठी घेतली जाणारी सप्लिमेंटस्, ग्रॅम्सच्या हिशेबात मोजलं जाणारं जेवण हे त्याला अजिबात मान्य नाही. अनिकेतचा भाऊ प्रोफेशनल बॉडीबिल्डर आहे. जुन्या व्यायामशाळेचे संस्कार अनिकेत आणि त्याच्या भावावर झाले आहेत. 500 ते 1000 सूर्यनमस्कार, दंडबैठका, जोरबैठका, मारण, चणे, हरभरे, बदाम, कच्ची अंडी, दूध पिणं, कमीतकमी 10-15 पोळय़ा खाणे अशा पहेलवान लोकांबरोबर अनिकेत मोठा झाला. अनिकेतनुसार आपल्या हिंदुस्थानी परंपरेचा व्यायाम हा खरा व्यायाम आहे. त्यात आपण नुसतं शरीरच कमवत नाही, तर चांगली ताकदसुद्धा कमवतो. हा व्यायाम आपण सातत्याने पाच – सहा महिने जरी केला तरी वर्षभर आपले मसल्स शाबूत राहू शकतात असं त्याचं ठाम मत आहे. अनिकेत खाण्याचा खूप शौकीन आहे. पौष्टिक खाण्यापासून चमचमीत खाण्यापर्यंत कुठलाही पदार्थ त्याला खायला आवडतं. स्वतःच्या घरातून आणलेला डबासुद्धा त्याला एकटय़ाने खायला आवडत नाही. तो डबासुद्धा त्याला सगळय़ांबरोबर शेअर करायला आवडतो. आता व्यायामाचं म्हणाल तर तो रोज न चुकता 40-50 मिनिटे तरी चालतोच चालतो. मला आठवतंय, आमच्या ‘ललित 205’ मालिकेच्या सेटवर मी आणि गौरव घाटणेकर व्यायाम करायचो तेव्हा मात्र अनिकेत आमच्यात व्यायाम करायला नक्कीच यायचा किंवा आपण असं म्हणू की, तो व्यायाम करतो असं आम्हाला भासवायचा. पण खरं सांगू का मंडळी, अनिकेतजींसारखा एखादा माणूस जर आपल्या ग्रुपमध्ये असेल ना तर आपल्याला हसवून, शूटसारख्या व्यस्त रूटिनमध्ये सगळय़ांचे मनोरंजन करीत, वातावरण हलके ठेवून त्याच्या नकळत अनेकांची तब्येत सुधारतोय याची त्याला जाणीवसुद्धा होत नसते.

आज प्रत्येकाला अनिकेत सांगू इच्छितो की स्टेरॉइड्स, प्रोटिन सप्लिमेंटस्च्या मागं न लागता योगावर जास्तीत जास्त भर द्या आणि इतरांना हसवत रहा. कारण आपण हसलो की, नकळत आपल्या मनातली अनेक दुःखं, ताण आपल्या नकळत कमी होतात आणि जर आपण सुखी व समाधानी राहिलो तर आपली तब्येत नक्कीच सुधारते.

आपली प्रतिक्रिया द्या