लेख – मोबाईल वापर : काही निर्बंध हवेतच!

572

>> दिलीप देशपांडे ([email protected])

वाचनाने माणूस समृद्ध होतो. ‘वाचाल तर वाचालअसे आपण म्हणतो. तथापि सध्याच्या मोबाईलच्या वापरामुळे वाचनाची सवयच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वेळीच मोबाईलचा मर्यादित वापर होणे अतिशय गरजेचे आहे. कारण तरुणाई त्याच्या आहारी गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी परीक्षा पे चर्चाया कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नका असा सल्ला दिला आहे. प्रत्येकाने मोबाईल वापराची दिशा नक्की ठरवायला हवी आहे. काहीतरी निर्बंध घालायला हवे आहे. तरच वाचन संस्कृती टिकून राहील आणि माणसामाणसांतला  हरवलेला  संवाद स्थापित होईल.

साधारणपणे 2003-04 सालातील गोष्ट आहे. तेव्हा मी खूप विचार करून मुलासाठी पहिला मोबाईल घेतला. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या जवळपासच्या एका मोबाईल शॉपीत तो घेतला. त्यावेळी मोबाईल घेणं म्हणजे खूपच आनंददायी गोष्ट होती. आपण मोबाईल घेतला ही जाणीवही वेगळीच होती. आता वर्षावर्षाने मोबाईल बदलवणाऱयांची संख्या पाहिली तर आश्चर्य वाटायला होते.

  त्यानंतरच्या काळात आमूलाग्र क्रांती घडून आली. नजीकच्या काळात गुरे वळणाऱया गुराख्याकडेही मोबाईल असेल असे भाष्य अंबानींनी केले होते आणि आज ते सत्यात उतरलेय. जो गुराखी ट्रान्झिस्टर रेडिओ घेऊन रानात जात होता आणि मनोरंजन करत होता, त्याच्याकडे आता मोबाईल आला आहे. खेडय़ापाडय़ात कोणीतरी एखादे वर्तमानपत्र आणले की, ते आळीपाळीने वाचले जात होते. आता त्यांच्याकडे मोबाईल आले. वर्तमानपत्राचे वाचन बंद पडले. खेडय़ापाडय़ांत ज्या महिला कधी वर्तमानपत्रसुद्धा वाचत नव्हत्या, त्यांच्या हातात आता मोबाईल आले. महिला मोबाईलवरील टीव्ही, यूटय़ूबवरच्या रेसिपी बघू लागल्या आणि तसे पदार्थ बनवायला लागल्या. व्हॉटस्ऍप ग्रुप तयार झाले. शेतकरी-शेतमजुराजवळही मोबाईल आला. त्यांनाही शेतीविषयी माहिती मिळू लागली. माहितीचे खूप मोठे दालन सगळ्यांनाच खुले झाले. हा खूप अनपेक्षित बदल घडून आला. एक प्रकारे तो चांगलाही म्हणावा लागेल.

काही वर्षांपूर्वी रेल्वे-बस प्रवासात आपण सहज एखादं वर्तमानपत्र, पुस्तक, बुक स्टॉलवरून वाचायला विकत घेत होतो. आता तेही बंद झालंय. बहुतेक प्रवासी आपापल्या मोबाईलवर व्हिडीओ मग्न असतात, नाहीतर कानात हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकण्यात गुंग असतात. सहप्रवासी असतात, पण संवाद मात्र नसतो. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, कॉलेजियन्सजवळ मोबाईल आले. रस्त्यावरून जाताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याचे चित्र दिसते. रोजच्या जगण्यात मोबाईल अविभाज्य अंग झाला. प्रत्येक ठिकाणी मोबाईल नंबर रजिस्टर करणे आवश्यक झाले. थोडक्यात, आता मोबाईल वापराविना कोणीही राहिले नाही असे म्हणावे लागेल. ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

एकीकडे या माध्यमामुळे जग जवळ आले, हवी ती माहिती गुगलवर मिळू लागली. माहितीचा खजिनाच मिळाला. असे असले तरी खूप काही फायदे तसे अनेक दुष्परिणामही दिसून येऊ लागले. तरुण मुलंमुली आत्मकेंद्री झालेली दिसतात.  वाचन बंद झाल्यासारखे झाले. सतत मोबाईलमध्ये डोकावू लागली आहेत. थोडय़ा थोडय़ा वेळाने व्हॉट्सऍपचे अपडेट बघण्याचा, स्टेटस, फेसबुकवरचे लाईक्स, कॉमेंट बघण्याचा नादच लागलाय. त्यामुळे सततच्या मोबाईल वापराने अनेक आजार जडू लागलेत. मोबाईल मिळाला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केल्याच्या घटनाही झाल्यात. अनिर्बंध मोबाईल वापरामुळे  विद्यार्थीवर्ग, तरुणाईचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. महाविद्यालयात समृद्ध वाचनालय आहे, पण वाचक विद्यार्थी वर्ग पाहिजे तसा राहिला नाही. गावागावांत वाचनालये आहेत, पण वाचकवर्ग कमी झालाय. ठराविक असा वाचकवर्ग आहे. काही प्रमाणात पुस्तकाची जागा ई-बुक्सनी घेतली आहे, पण असा वर्ग मर्यादित आहे. घरबसल्या सर्वच कार्यक्रमांचा आनंद घेता येत असल्यामुळे साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. माणसामाणसांतला संवाद कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. घराघरात प्रत्येकाजवळ वेगळे मोबाईल आल्याने जो तो आपल्या मोबाईलच्या नादात असल्याचे चित्र घराघरातून बघायला मिळतंय. अगदी लहान लहान मुलंही मोबाईलच्या आहारी गेल्याचे दिसते. एखाद्या कार्यक्रमातही चार लोक एकत्र येतात, त्यांच्यातही फार असा संवाद होत नाही. कारण जो तो आपला मोबाईल बघण्यात मग्न असतो ही सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही.  घरात आईवडील मुलांमधला संवाद कमी झालाय.

इंटरनेट, मोबाईल,व्हॉटस्ऍप, लॅपटॉप आदींमुळे वाचन समृद्धीचा दावा केला जात असला तरी तो खूप मर्यादित असा आहे. जग जवळ आलंय, पण माणसामाणसांतला संवाद कमी झालाय. याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

आजच्या घडीला अनेक विषयांवर नवनवीन पुस्तके, दरवर्षी खूप चांगले साहित्य घेऊन दिवाळी अंक बाजारात येतात. वाचकांसाठी अनेक सवलती जाहीर होतात, किती तरुण त्याचे वाचक आहेत हा खूप महत्त्वाचा भाग आहे. वाचकांचा एक विशिष्ट वर्ग आहे, तोच वाचतो. त्यात आमूलाग्र वाढ होणे काळाची गरज आहे.

परवाच रस्त्याने जाताना आठ-दहा  कॉलेज तरुण-तरुणी कट्टय़ावर बसली होते.  प्रत्येकाच्या हातात मोबाईल. मला त्यांच्याशी संवाद करावा वाटला म्हणून मी थांबलो. त्यांना वाटले, मला काही अडचण आहे. त्यातला एक म्हणाला, ‘‘काय, काही प्रॉल्बेम आहे का?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘प्रॉब्लेम नाही, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोलू का?’’

‘‘हो, बोला नं!’’ ‘‘बोलतो, पण खरं सांगाल?’’ ते ‘‘हो’’ म्हणाले.

माझा पहिला प्रश्न- तुम्ही अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त काही वाचन करता का?  जसे वर्तमानपत्र, कॉलेजच्या वाचनालयातले काही ग्रंथ, मासिके वगैरे. त्यावर त्यांचं उत्तर – वेळच मिळत नाही. काय वाचणार? फेसबुक, व्हॉटस्ऍपवर आलेलं वाचतो. मी त्यांना काही पुस्तकांची नाव सांगितली. ‘‘वाचली आहेत का?’’ त्याचं उत्तर ‘‘नाही’’च आलं. त्यातली एक मुलगी म्हणाली- मागच्या काही महिन्यांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. कॉलेजमधून आणतो पुस्तके, पण वेळेअभावी न वाचताच मुदतीत परत करावे लागते.

माझ्याशी बोलताना सगळ्यांचे लक्ष मात्र आपापल्या मोबाईलमध्ये मेसेज बघण्यात होते. ‘‘ठीक आहे काका, तुम्ही सांगितलेली पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करू. थँक्स फॉर युवर ऍडव्हाईस.’’ त्यांनी मला कटवलेच.  मी तिथून निघालो. मला आमचा काळ आठवला. कॉलेजमध्ये आम्ही ग्रंथपालाकडे पुस्तकांची मागणी करायचो. नसलेली पुस्तकं मागवायला लावत होतो. आता सगळी समृद्धी असून ही परिस्थिती.

वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचनाचे अनेक फायदे आपण सगळेच एकमेकांना सांगत असतो. ‘वाचाल तर वाचाल’ म्हणतो. ई-बुक्स वाचणारा वर्ग खूप कमी आहे. नवेकोरे पुस्तक हातात घेऊन वाचणे किंवा ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वेळीच मोबाईलचा मर्यादित वापर होणे अतिशय गरजेचे आहे. तरुणाई त्याच्या आहारी गेली आहे. वेळीच घरातील प्रत्येकाने मोबाईल वापराची दिशा नक्की ठरवायला हवी आहे. काहीतरी निर्बंध घालायला हवे आहे. तरच वाचन संस्कृती टिकून राहील आणि माणसामाणसांतला  हरवलेला  संवाद परत स्थापित होईल. ही काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या