
>> विठ्ठल देवकाते
बुधवारी सकाळी महाराष्ट्रावरच नव्हे तर क्रीडा क्षेत्रावर दुःखाचे आभाळ कोसळले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी समजताच संपूर्ण राज्य हादरले. ज्यांच्या नावाने निर्णय वेगाने होत असे, ज्यांच्या उपस्थितीने प्रशासन कार्यतत्पर होत असे आणि ज्यांच्या शब्दाला क्रीडा जगतात वजन होते, असे क्रीडाप्रेमी अजित पवार अचानक आपल्यातून निघून जातील, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.
निर्णयक्षम नेतृत्व, वेगवान प्रशासन आणि निर्भीड भूमिकांसाठी ओळखले जाणारे अजित पवार क्रीडा क्षेत्रासाठी केवळ प्रशासक नव्हते. ते खेळाडूंच्या स्वप्नांचे आधारस्तंभ होते. अनेकांसाठी ते ‘साहेब’ नव्हते, तर विश्वास देणारे ‘दादा’ होते.
घोषणा नव्हे, कृतीची परंपरा!
अजित पवार यांचे क्रीडा धोरण कधीच केवळ कागदावर राहिले नाही. वर्षानुवर्षे फाईलमध्ये अडकलेले प्रस्ताव त्यांच्या कार्यकाळात थेट मैदानावर उतरले. जिह्याजिह्यांत उभी राहिलेली क्रीडा संकुले, अत्याधुनिक स्टेडियम्स, व्यायामशाळा आणि जलतरण तलाव हे त्यांच्या कार्यशैलीचे जिवंत पुरावे ठरले. शहरपेंद्रित विकासाची चौकट मोडत त्यांनी खेळ खेड्यापाड्यांपर्यंत नेला आणि तिथूनच नव्या चॅम्पियन्सची बीजं पेरली गेली. मातीतील गुणांना व्यासपीठ मिळालं, हीच त्यांची मोठी देणगी.
ग्रामीण खेळांचे पुनरुज्जीवन!
कुस्ती, कबड्डी, खो-खो या महाराष्ट्राच्या मातीतील खेळ अजित पवारांच्या काळात पुन्हा केंद्रस्थानी आले. कुस्ती संकुले, तालुका व जिल्हास्तरावरील स्पर्धांचे मजबूत जाळे, प्रशिक्षकांची नेमणूक या सर्व घडामोडींमधून ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची संधी मिळाली. अनेक तरुणांसाठी आखाडा आणि मैदान हीच शाळा ठरली. इथे केवळ खेळ शिकवला गेला नाही, तर आयुष्य घडवण्याचं बळ दिलं गेलं.
शिस्तबद्ध क्रीडा प्रशासन!
क्रीडा प्रशासन म्हणजे दिरंगाई, गोंधळ आणि आरोप ही ओळख बदलण्याचं धाडस अजित पवार यांनी दाखवलं. पारदर्शकता, वेळेत निर्णय आणि निधीचा योग्य वापर या त्रिसूत्रींवर त्यांनी क्रीडा व्यवस्थेला नवी धार दिली. शिस्त म्हणजे दडपशाही नव्हे, तर जबाबदारी हा संदेश त्यांच्या कामातून सतत दिसत राहिला.
खेळाडूंच्या घामाला किंमत
पदक जिंकणाऱया खेळाडूंना अजितदादांकडून केवळ अभिनंदनाचे शब्द मिळाले नाहीत, तर ठोस पाठबळ मिळाले. ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांतील यशस्वी खेळाडूंना रोख बक्षिसे, मानधन, थेट नोकऱया आणि प्रोत्साहन योजना, या सर्व गोष्टीतून त्यांनी खेळाडूंच्या घामाला किंमत दिली.
‘खेळातही कारकीर्द घडवता येते’ हा संदेश त्यांनी व्यासपीठावर बोलून नाही, तर निर्णयांमधून प्रत्यक्षात उतरवला. त्यामुळे अनेक खेळाडूंना मैदान सोडावं लागलं नाही; उलट मैदानच त्यांचं भविष्य ठरलं.
तरुणांसाठी प्रेरणा!
अजित पवार यांची भूमिका कायम स्पष्ट होता. खेळ हा केवळ छंद नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील तरुणांनी अभ्यासाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही मोठी स्वप्नं पाहायला सुरुवात केली. आत्मविश्वास वाढला, उद्दिष्टं ठरली आणि मैदानावर झुंज देण्याची वृत्ती बळावली. आजही अनेक खेळाडूंच्या यशामागे कुठेतरी ‘दादांनी दिलेली संधी’ दडलेली आहे.
अजित पवारांनी कठोर निर्णय घेतानाही एखाद्या खेळाडूचं करिअर मोडू नये ही काळजी नेहमीच घेतली. अपयश म्हणजे शेवट नाही, ही जाणीव त्यांनी जपली. म्हणूनच अनेक खेळाडूंना अजित पवार म्हणजे दरारा असलेला आधार वाटायचा. भीतीही आणि विश्वासही वाटायचा.
आज महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात जे काही उभं आहे, ते एका घोषणेतून उभं राहिलेलं नाही. ते घामातून, शिस्तीतून आणि वेळेवरच्या निर्णयांतून उभं राहिलं आहे. दादांनी खेळाला दयेवर सोडलं नाही. त्यांनी त्याला ताकदीवर उभं केलं. खेळाला राजकारणाचा बळी बनू दिला नाही. उलट राजकारणालाच खेळाच्या शिस्तीत उभं केलं.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं सोपं नाही. पण त्यांनी उभे केलेले मैदान, घडवलेले खेळाडू आणि रुजवलेली विचारधारा हीच त्यांची खरी स्मृती ठरेल. राजकारणात आक्रमक, प्रशासनात वेगवान आणि क्रीडा क्षेत्रात परिवर्तनवादी असलेले अजित पवार महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात ‘निर्णायक खेळाडू’ म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यामुळे मैदानावर खेळाडू पडतो तेव्हा माती अंगावर चिकटते. पण दादा उभे राहिले की संपूर्ण व्यवस्था सावध उभी राहायची. हीच सावध उभी राहिलेली व्यवस्था, हाच अजित पवारांचा खरा ठसा आहे.
क्रीडांगणावरील या ‘दादा’ माणसाला अखेरचा सलाम.



























































