ठसा – अक्षता सावंत

86

सजदा फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘होठों पे ऐसी बात’ या चॅरिटी शोमध्ये मराठी-हिंदीतील गुणी गायिका अक्षता सावंत हिने तिचा 500 वा गाण्यांचा कार्यक्रम गाऊन आपले सामाजिक भान जपले. कलाकाराने फक्त उक्तीतूनच नव्हे तर कृतीतून दाखवून द्यायचे असते हे तिने प्रत्यक्षात दाखवले. कारण या चॅरिटी शोमधून ज्या शाळांना ग्रंथालय नाही, त्यांना ग्रंथालय उपलब्ध करून देण्याचे मदतकार्य सजदा फाऊंडेशनचे राहुल लाड व प्रा. प्रकाश जकातदार हे करतात.

पाचशेवा शो करणाऱया गायिका अक्षता सावंत हिचा सांगीतिक प्रवास तसा संघर्षमयच आहे. संघर्ष जेवढा कडवट असतो तेवढे यश गोड असते. म्हणूनच अक्षताला गाण्याबरोबरच सूत्रसंचालनाची संधी मिळाली. तसेच डिस्नेमधील तिचे सहकारी आदित्य सौरभ याच्यामुळे तिला ‘टॉर्टस’ या सीरिजच्या मुख्य पात्रासाठी डबिंग करण्याची संधी मिळाली आहे.

तसे अक्षता सावंत हिला बालपणापासून गाण्याचे वेड होते. तेव्हा आई-वडिलांनी तिच्या शास्त्रीय संगीताचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी तिला संगीत तज्ञ पुष्पा माडगावकर यांच्याकड रीतसर शिक्षणास पाठवले आणि मग तिच्या सांगीतिक जडणघडणीला सुरुवात झाली. त्यानंतर तिने काही काळ मराठी भक्ती संगीतातील आदरयुक्त व्यक्तिमत्त्व असलेल्या अजित कडकडे यांच्याकडून भक्तिगीताचे धडे घेतले. त्यामुळे आज कोणत्याही स्केलमध्ये अगदी सहजपणे गाणारी गायिका म्हणून अक्षता सावंतची ओळख झाली आहे. पृथ्वी थिएटरच्या सहभागामुळे तिला स्टेजवर वावरण्याचे धडे मिळाले. याचा उपयोग तिला सूत्रसंचालन करताना होतो.

दरम्यान, अभिजित पेंढारकर आणि सुयोग चुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अनेक मराठी नामवंत मालिकांसाठी पार्श्वगायन केले. ज्यात, ‘मन उधाण वाऱयाचे’ (स्टार प्रवाह), लगीनघाई (नाटक) आदी पंधराहून अधिक मालिकांचा आणि नाटकांचा समावेश आहे. तसेच तिने अदनान सामी यांच्या ‘बोल बेबी बोल’ या स्टार प्लसवरील काही कार्यक्रमांत ‘एपिसोड सिंगर’ म्हणून काम केले.

अक्षताला खऱया अर्थाने ओळख आणि प्रसिद्धी मिळवून देणारा तसेच एक गुणी गायिका म्हणून तिच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण जडणघडण करणारा कार्यक्रम म्हणजे ई टीव्ही मराठी वरील ‘कॉमेडी एक्प्रेस’ होय. त्या संधीचे तिने सोने केले. त्यानंतर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘बुधवारची जत्रा’, ‘कॉमेडीची जीएसटी एक्प्रेस’ या शोमध्ये तिनेही विनोदी संगीताची धुरा व्यवस्थितरीत्या सांभाळली. त्यात ‘बुधवारची जत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोमध्ये तिने काही एपिसोड अँकरिंगदेखील केले. या तिच्या सर्व यशाचे श्रेय तिचे वादक सहकारी आणि निर्माता दिग्दर्शक यांना देते. कुठल्याही कलाकाराला आपले साथीदार तितकेच महत्त्वाचे वाटले पाहिजेत असे ती मनापासून मानते आणि हा कलाधर्म ती पाळते. अक्षता सावंतच्या वैविध्यपूर्ण कलागुणांमुळे तिने अनेक स्टेश शो, म्युझिकल कॉन्सर्टमधून आपल्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावले. तसेच गोवा, दिल्ली, वडोदरा, इंदूर, लखनौ आदी ठिकाणीदेखील आपल्या आवाजाची अवीट गोडी रसिकांपर्यंत पोहोचवली. देशाबाहेर बँकॉक, मॉरिशस, दुबई, इस्रायल, ओमान या ठिकाणी तिने गाण्याचे शो केले आहेत. गाणं गाताना आधी ते स्वतः अनुभवा, ते एन्जॉय करा अशी अक्षताची धारणा असल्यामुळे ती प्रेक्षकांना त्यांच्याही नकळत गाण्यात इन्व्हॉल्व्ह करते आणि त्यांना ताल धरायला लावते. तिची स्वतःची गायनशैली आहे तरी सर्व बाजातील गाणेही गाते. ही तिची खासीयत आहे.

2012 च्या दरम्यान अक्षताने अँकरिंगच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुशील देशपांडे यांच्या व्हॉसअप मीडिया आणि टीव्ही एशियासाठी अँकरिंग सुरू केले. त्यात ‘फिल्मबाजी’, ‘कम्युनिटी राऊंड अप’ या दोन शोसाठी आजही अँकरिंग करीत आहे. 2015 मध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध ऍक्शन डिरेक्टर रवी दिवाण यांची निर्मिती असलेल्या ‘तिचा उंबरठा’ या सिनेमातून अक्षताने प्लेबॅक सिंगर म्हणून पदार्पण केले होते. जी कला इतरांना समाधान देते ती श्रेष्ठ कला अशी तिची मनोधारणा आहे. त्यामुळे कलेच्या सेवेत कुठेही अक्षता सावंतने तडजोड केली नाही. म्हणून गाण्याचे 500 शो झाले तरी तिने यशाने हुरळून न जाता कलेची सेवा सुरूच ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या