प्रासंगिक – अनंत चतुर्दशी आणि गणपती विसर्जन

>> विलास पंढरी

दरवर्षी येणारी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी दोन कारणांनी महत्त्वपूर्ण असते. या दिवशी पाहुणचाराला आलेले लाडके बाप्पा परत जातात, तर याच दिवशी अनेक भाविक अनंताचे व्रत करतात. त्यामुळेच या दिवसाला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते. पेशवेकालीन पुण्यात साजऱया केल्या जाणाऱ्या सार्वजनिक उत्सवांत दसऱयाचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी. हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठय़ा उल्हासाने साजरे केले जात असत. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा खजिन्यातून होत असे. या वेळी होणाऱया कार्यक्रमांत खेळ आणि करमणुकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत. यानिमित्ताने अनेक व्यायामपटू, नर्तक, नट, गायक, शाहीर अशा कलाकारांना चांगले मानधन मिळत असे. विशेष म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळाऐवजी दरवर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे 10 दिवस पेशव्यांच्या महालात गणेशोत्सव साजरा होत असे. त्याची आतासारखीच मिरवणूक निघत असे.

गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आजच्या सारखीच पुण्यात लोकांची गर्दी होत असे. सन 1893 पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. मंडळांच्या गणपतीचे दहा दिवस आणि विसर्जन मिरवणूक हे दोन्हीही सध्या मात्र फार मोठे इव्हेंट्स झाले आहेत.  पाणावलेले डोळे आणि ढोलताशांचा गजर अशा संमिश्र वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ असा जयघोष करीत गणरायाला भावपूर्ण निरोप आपण दरवर्षीच देतो. काही घरी दीड दिवसांनी, काही ठिकाणी सात दिवसांनी, तर बहुसंख्य ठिकाणी अनंत चतुर्दशीला हा भावपूर्ण सोहळा दरवर्षी रंगतो. माहेरवाशीण म्हणून तीन दिवसांसाठी आलेल्या गौरींचा तर थाटच वेगळा असतो. प्रार्थना करत अक्षता टाकून गौरीचे मुखवटे स्टँडवरून काढताना महिला वर्ग खरेच गहिवरतो. विसर्जन करून घरी आल्यावर गणपतीचे रिकामे मखर बघून फारच उदास वाटते. सार्वजनिक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची अवस्था तर आणखी वाईट असते.

गणपती बाप्पा आपल्या घरी येताना सुख-समृद्धी, भरभराट घेऊन येतात अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. सुखकर्ता आणि दुःखहर्ता असलेल्या विघ्नविनाशक गणरायाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्यांत अश्रू दाटलेले असतात. आज म्हणजे शनिवार, 6 सप्टेंबर रोजी होणाऱया या विसर्जनासाठीची तयारी स्थापनेपासूनच सुरू झालेली असते. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे भव्य स्वरूप पाहता या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे. या दिवशी केवळ गणपती विसर्जन नाही, तर भगवान विष्णूच्या अनंत रूपाचीही पूजा करण्याची परंपरा असल्याने या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. यंदाच्या अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी शुभ वेळा खालीलप्रमाणे आहेत –

  • सकाळची शुभ वेळ ः 7ः36 ते 9ः10
  • दुपारची शुभ वेळ ः 12ः17 ते 4ः59
  • संध्याकाळी शुभ वेळ ः 6ः33 ते 7ः59
  • रात्रीची शुभ वेळ ः 9ः25 ते 01ः44
  • पहाटेची शुभ वेळ ः (रविवारी 7 सप्टेंबर ) 4ः36 ते 06ः02.

भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर गणपती बाप्पा पुन्हा पैलास पर्वती परततात असे मानले जाते. विसर्जन हे निसर्गचक्राचे प्रतीक आहे असेही मानले जाते. पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिकमास येत असल्याने गणपती बाप्पाचे आगमन सोमवारी, 14 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे यंदाच्या तुलनेत 18 दिवस उशिराने होणार आहे.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात. या दिवशी विशेषतः महाराष्ट्र व हरयाणामध्ये अनंताची पूजा केली जात असल्याने या दिवसाला अनंत चतुर्दशी असे म्हटले जाते.