लेख – किती किती रूपे तुझी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

आज अनंत चतुर्दशी. दहा दिवसांच्या उत्सवी गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्याचा दिवस. या तिथीचा वार्षिक सोहळा जोश-जल्लोषाचा. गेल्या अनेक वर्षांच्या ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात, राज्यभर आणि जगात जिथे जिथे गणेशोत्सव होतो तिथे तिथे निघणाऱया भव्य मिरवणुकांची आठवण येणं अगदी साहजिक आहे. कारण यंदाचा सारा प्रकारच निराळा आहे. गणपती आले. श्रद्धेने त्यांची भक्ती केली गेली. ‘कोरोना’ काळातले नियम पाळत घरोघरीही गणेशपूजन झाले. परंतु गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे समूहाने आनंद व्यक्त करण्यासारखी परिस्थिती नव्हती. अनेक सार्वजनिक गणपतीही यंदा दीड दिवसाचे झाले. असे पूर्वी कधी घडले नसावे.

यंदाच्या चातुर्मासातल्या सगळय़ाच उत्सवांवर कोरोनाचे गडद सावट आहे. मात्र आपल्या मनातल्या अनेकरूपी गणरायचे चिंतन करायला कोणाची आडकाठी असणार? गणपती हे जनसामान्यांच्या ‘घरी’ येणारं दैवत. त्याच्या आगमनाची आतुरतेने प्रतीक्षा करणं, स्वागताची जय्यत तयारी करणं आणि त्याच्या सहवासाचा भक्तिभावाने आनंद घेण्यात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस फुलपाखराचे रंगबेरंगी पंख लावून आल्यासारखे वाटतात.

पारंपरिक पूजेबरोबरच आधुनिक पद्धतीने गणरायाचे विविध रूपात दर्शन घडते ते याच काळात. अर्थात फार पूर्वीपासूनच गणेशमूर्तींच्या विविध रूपांची निर्मिती झाली आहे असे लक्षात येईल. प्राचीन शिल्पकलेत गणेशांच्या अनेक भावमुद्रा आढळतात. त्यातील नृत्यगणेश किंवा ‘महाभाराता’च लेखन करणारा गणपती अथवा अगदी एखादं वाद्य वाजवणारा गणपतीही दिसून येतो. अनेक कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या कलाप्रकारातून गणेश प्रतिमा रंगवल्या, घडवल्या. गणपती विविधरंगी आणि विविधरूपी रूपात दिसतो आणि त्यामुळेच तो ‘गणां’चा म्हणजे लोकमानसात रुजलेला गणनायक ठरतो.

मराठीमध्ये गणेशावर पूर्वापार अनेक कवनं केली गेली. लोककलेत कार्यक्रमाची सुरुवात ‘गण-गौळणी’ने होते. ‘गणपती आला आणि नाचून गेला’ की मग पुढचा कार्यक्रम सुरू होतो. ‘आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना’ हे शाहीर साबळे यांच्या स्वरातलं गीत तुम्हीही ऐकलं असेल. असा गणराय मंचावर आल्यावर देवी शारदाही साथीला ‘रुद्रवीणा’ घेऊन येते आणि कवी म्हणतो, ‘प्रसन्न होऊन विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे, तुझ्या कृपेने आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा.’

गणेशाची आराधना करूनच कुठल्याही कार्याचा आरंभ होतो. ‘निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्यषु सर्वदा’ अशी मागणी भक्तजन गणपतीकडे करतात. असा हा गणपती गुणपतीही आहे. ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असं म्हटलं आहेच. अशा पारंपरिक कवनाप्रमाणेच आधुनिक काळातही गणपतीचं रूपवर्णन करणारी गाणी आहेतच. नर्तन गणेशाचं लयतालबद्ध स्वरूप शांता शेळके यांच्या आणि लदादिदींच्या अप्रतिम स्वरात अजरामर झालेल्या ‘गणराज रंगी नाचतो’ या गाण्यातून आपल्यासमोर येते. यातील शब्दांबरोबर आणि सुरांसोबत आपल्या मनात नर्तन गणेश साकारतो.

‘गणराज रंगी नाचतो, नाचतो’ या गाण्यातल्या या ओळी पहा.
‘नारद तुंबरू करिती गायन,
करे शारदा वीणावादन
ब्रह्मा धरतो तालही रंगून, मृदंग धीमी वाजतो’ आणि या तालावर ‘तुंदिलतनु परि चपळ साजिरी’ असलेला गणपती नृत्य करू लागतो तेव्हा त्याचे मातापीताही धन्य होतात.
आणि… ‘गौरीसंगे स्वये सदाशिव, शिशुकौतुक पाहतो’ असा हा सोहळा आपल्याही मनःपटलावर साकारतो.

गणेशाची चित्र, शिल्प, मूर्ती, काव्य यातून गणपती आपल्या मनात स्थानापन्न करणाऱया सर्व कलाकारांचेही कौतुक करायला हवे. यावर्षी अनेकांना आपले हे कलाकौशल्य मुक्तपणे दाखवता आले नाही याचे कारणही कोरोनाच. मात्र असा दुर्धर काळ मानवी इतिहासात केव्हा ना केव्हा येतोच. कोरोनापर्वाचे आपण साक्षीदार आहोत इतकेच. असा कसोटीचा काळ येतो तेव्हा त्याच्याशी निर्धाराने लढत देऊन ‘विघ्नविनाशही होतोच. दोन हजार वीस हे एकूणच वर्ष जगाला एका अनपेक्षित संकटाच्या खाईत लोटत उगवलं. पण त्याचाही अस्त होईलच. नव्या उमेदीचा, आरोग्यसंपन्नतेचा काळही पुन्हा परत येईल. या संकटाशी झुंजणाऱयांचे स्मरण करून आणि गणरायाला नमन करून ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणूया. अश्विन महिना ‘अधिक मास’ असल्याने गणपती पुढच्या वर्षी लवकर येणार नाहीत. परंतु जेव्हा येतील तेव्हा थाटामाटात आणि जल्लोषात येऊ देत अशी मनोकामना व्यक्त करून ‘पुढच्या वर्षी उत्सवी दिमाखात या’ असं म्हणत त्यांना या वर्षीपुरता निरोप देऊया.