ठसा : अनिल कांबळे

1212

>> माधव डोळे

ऐंशीच्या दशकात कविवर्य सुरेश भट यांच्या ‘एल्गार’ या संग्रहाने मराठी कविता लिहिणाऱया अनेक तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. त्यातील गझला, स्फोटक शब्दरचना, काळजाला भिडणारी थेट भाषा आणि कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय सांगणारा शेर यामुळे अनेक जण गझल लिहिण्याकडे ओढले गेले. भटांनी महाराष्ट्रात मराठी गझल लिहिणाऱयांची पिढीच तयार केली. त्यातील एक पाईक होते अनिल कांबळे. खरं तर 1972 पासूनच ते कविता लिहीत होते, पण गझलच्या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि कांबळे हे स्वतः गझलमय झाले. आयुष्यभर त्यांनी हा काव्यप्रकार आपल्या रक्तात भिनवला. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून बीए झालेल्या अनिल कांबळे यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते. कवी, गीतकार आणि गझलकार हा प्रवास अतिशय खडतर होता, पण या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. त्यांची सहाशेहून अधिक गाणी अनेक नामवंत संगीतकारांनी स्वरबद्ध केली. अनुप जलोटा, शंकर महादेवन, पद्मजा फेणाणी, रवींद्र साठे अशा गायकांनी ही गाणी गायली. ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी.. पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी’ ही गझल ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या हातात पडली आणि त्यांनी त्याचे सोने केले. लहान वयातच वाममार्गाला लागलेल्या मुलीच्या आयुष्याची दुखरी जखम त्यांनी जणू शब्दबद्ध केली. समाजाचे भीषण वास्तव, काळजाला भिडणारे शब्द व तेवढीच समर्पक चाल यामुळे ही गझल लोकप्रिय झाली. ही गझल श्रीधर फडके यांनी अनेक मैफलींमध्ये सादर केली. या एका गझलेने अनिल कांबळे रसिकांच्या काळजात जाऊन पोहचले. त्यांचे ‘माझ्या कविता’ व ‘कोवळ्या फुलांचा’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेली 40 वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने कवितांचे कार्यक्रम केले. त्याशिवाय बासरीचा सूर आला, माझ्या कविता, गझलांच्या प्रदेशात हे स्वतःच्या कवितांचे सर्वत्र कार्यक्रम केले. यानिमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानभर त्यांनी प्रवास केला. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसतानाही अनिल कांबळे यांनी कवितेच्या क्षेत्रात आपल्या नावाचा झेंडा रोवला. त्यांच्या हातात लेखणीबरोबरच ब्रशही होता. अनेक तरल चित्रे त्यांनी साकारली आहेत. आपले जगणे सच्चे तर आपली कविताही सच्ची आणि आपण खोटे तर कविताही खोटी असे सुरेश भट नेहमी सांगायचे. हा मूलमंत्र कांबळे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला म्हणून त्यांची गझल असो की कविता किंवा गीत, त्यात प्रामाणिकपणा दिसून येतो. केवळ कवितांचे कार्यक्रम करून ते थांबले नाहीत तर अनेक संस्था स्थापन करून रचनात्मक कार्यदेखील केले. युनिव्हर्सल पोएट्री फाऊंडेशन, प्रेरणा आर्ट फाऊंडेशन या दोन संस्थांचे ते अध्यक्ष होते. त्याशिवाय कवितेच्या प्रदेशात, आंतरिक सेतू व अक्षर अयान ही तीन प्रकाशने त्यांनी समर्थपणे चालवली. हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांमधील कवींची संमेलने त्यांनी आयोजित केली. कविता किंवा गझल माणसाचं आयुष्य घडवते. तो आपल्या जीवनाचा आरसा असतो असे ते नेहमी म्हणायचे. याच गझलचा समर्पक वापर त्यांनी कैद्यांसाठी केला. जेलमध्ये जाऊन त्यांनी कैद्यांचे कविसंमेलन आयोजित केले होते. या हटके उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. मराठी कविता जपत असतानाच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात इमानेइतबारे नोकरी केली. कांबळे यांनी अनेक तरुण कवींना मार्गदर्शन केले. भटांनी गझल हा काव्यप्रकार मराठीमध्ये रुजवला तेव्हा अनेक जण मोठय़ा उत्साहाने गझल लिहू लागले, पण त्यातील फार थोडय़ांनीच लिखाणात सातत्य राखले. त्यात अनिल कांबळे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. गेल्या तीन वर्षांपासून ते आजारी होते. उणेपुरे 66 वर्षांचे त्यांना आयुष्य लाभले, पण त्यांच्या गझला व कविता अनेकांना प्रेरणादायी ठरल्या आहेत. म्हणूनच ते एका गझलेत म्हणतात

जिथे सूर्य अंधारला दोस्त हो
तिथे दीप लावू चला दोस्त हो

आपली प्रतिक्रिया द्या