ठसा : अरुणा देशपांडे

76

>>प्रतीक राजूरकर<<

जार्ज फर्नांडिसांचा उजवा हात म्हणून परिचित दिवंगत जगदीश देशपांडेंच्या वामांगिनी म्हणजे अरुणाताई देशपांडे. 1978 ते 2018 या चार दशकांत त्यांना जॉर्ज फर्नांडिसांना अतिशय जवळून बघण्याचा आणि समजण्याचा योग आला, त्याला कारण अर्थातच जगदीश देशपांडे जॉर्ज यांचे ऋणानुबंध. त्यामुळे देशपांडे कुटुंब हे जॉर्ज यांच्या परिवारातील सदस्य म्हणूनच वावरले. जगदीश देशपांडे जॉर्ज यांच्या सान्निध्यात आले ते 1974 साली. जयप्रकाश नारायण यांच्या हरितक्रांती आंदोलनातून त्यांच्यातले संबंध वृद्धिंगत झाले.

अरुणाताई आणि जगदीश देशपांडे यांची ओळखसुद्धा त्याच दरम्यान 1974 साली झाली. पुढे दोघेही विवाहबंधनात अडकले, पण जगदीश देशपांडे जॉर्ज यांच्या सामाजिक आयुष्यात एकरूप झाले होते. जगदीश देशपांडेंचा सर्वाधिक वेळ बिहार राज्यातच असायचा. त्यामुळे अरुणाताईंनी 1978 ते 1998 या वीस वर्षांच्या कालावधीत मुंबईत वास्तव्य करून नोकरी पत्करली. पती जगदीश देशपांडे हे त्याकाळी गाजलेल्या रेल्वे संपात, कोका-कोलाला देशातून हद्दपार करण्याच्या मोठय़ा आंदोलनात अग्रेसर होते. त्यांच्या निधनानंतरही अरुणाताईंचा जॉर्ज फर्नांडिस यांच्या परिवारांशी असलेला स्नेह कायम राहिला. जॉर्ज  अल्झायमरसारख्या रोगाने ग्रस्त असल्याने गेल्या दीड-दोन दशकांपासून अनेकांना त्यांचे जणू विस्मरणच झाले आहे. अशा मंडळींना लढवय्ये जॉर्ज यांची आठवण करून देण्यासाठी अरुणाताईंनी जॉर्ज यांच्या 88व्या वाढदिवशी लिहिलेल्या लेखातून आपल्या भावना वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला होता. इतके मोठे राजकीय क्षेत्रातील वलय असूनही अरुणाताईंनी स्वतःला जगदीश देशपांडे यांच्या पत्नी आणि जॉर्ज यांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या पत्नी इतकी मर्यादित राजकीय ओळख न ठेवता आपली स्वतंत्र अशी सामाजिक आणि साहित्यिक ओळख निर्माण केली. जगभरातील आणि देशांतर्गत अनेक ठिकाणी प्रवास करून विविध माहिती संकलित करून संस्कृती, पर्यटन, साहित्य इत्यादी अनेक विषयांवर प्रचंड अभ्यास केला. हिंदुस्थानच्या विविध धर्म संस्कृतींची ओळख करून देणारी त्यांनी लिहिलेली पुस्तके देश-विदेशात प्रचंड गाजली. त्यांच्या एका पुस्तकाला दलाई लामांची प्रस्तावना लाभली आहे, यावरून त्यांच्या व्यासंगाची प्रचीती येईल. 2000मध्ये अरुणाताईंचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले त्यात हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यटकांना राज्यनिहाय माहितीचे सविस्तर वर्णन आहे. आजवर त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. वीस वर्ष पर्यटन क्षेत्रात कार्य केल्यावर त्या अनुभवातून त्यांनी माहिती शब्दबद्ध केली आहे. Buddhist India Rediscovered या त्यांच्या सहाव्या पुस्तकाला इंटरनेट वर मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभला. 150 Fascinating Destinations Of India, India A Divine Destination, India Travel Guide ही त्यांची पर्यटनावरील लोकप्रिय पुस्तके. पुरातत्व विभागातील संभाजीनगरचे प्रसिद्ध आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे एम.के. जोशी. त्यांचे या वर्षी मार्चमध्ये निधन झाले. त्यांच्याबाबत अरुणाताईंना प्रचंड आदर होता. जोशींना अवगत असलेल्या नऊ भाषा, त्यांचा पुरातन विषयातील व्यासंग, मार्गरेट थॅचर, इंदिरा गांधींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वांना एम. के. जोशींच्या सहवासातून अजिंठा-वेरुळला पर्यटनाचा आलेला अनुभव, त्यांच्याकडून मिळालेली माहिती याचा अरुणाताई आवर्जून उल्लेख करायच्या आणि या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी एम. के. जोशी यांच्याप्रमाणे काम करावे असे त्या म्हणत.

अरुणाताईंचा पर्यटनाचा व्यासंग आणि उत्साह प्रचंड होता. या वर्षी जानेवारी-मार्च दरम्यान त्या व्हिएतनामला जाऊन आल्या होत्या. त्याचे त्यांनी केलेले वर्णन त्यांच्यातील निरागस बालमनाची जाणीव करून देणारे आहे. त्यांना पर्यटन प्रवासाची किती गोडी होती याचा अंदाज येऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून त्या कोल्हापूरला वास्तव्यास होत्या. हिंदुस्थानातील ऋषी, ऋषिकांच्या प्राचीन इतिहासावर त्यांनी संशोधन करून पुस्तक लिहिण्याचे कार्य हाती घेतले होते आणि लवकरात लवकर ते पुस्तक पूर्ण करायचे होते. त्यासाठी लागणारा उत्साह त्यांच्या बोलण्यातून आणि संकलित केलेल्या माहितीतून प्रतीत व्हायचा. त्यांचे पुस्तकावर लिखाण सुरू असताना त्या आवर्जून वेळ काढून आप्तस्वकीयांसोबत संपर्कात असायच्या. शिवाय लिखाणाच्या प्रगतीबरोबरच सर्वांच्या क्षेमकुशलतेची नित्य आस्थेने विचारपूस करत. 3 मार्च 1956 साली जन्मलेल्या अरुणाताईंची 29 ऑक्टोबरला दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांचे ऋषींवरील पुस्तक अपूर्णच राहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या