लेख – स्वयंभू गंधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. एखाद्या कठीण चालीचे सोने कसे करावे, हे केवळ त्यांनाच ठाऊक होते. ‘भुई तन मन’, ‘‘साकार गंधार’ किंवा ‘कुठे न दीप काजवा’ यांसारखी गाणी रेकाॅर्ड करताना त्यांनी घेतलेल्या ताना आणि दिलेले भाव पाहून मी थक्क व्हायचो. रेकॉर्डिंग संपल्यावर मी अनेकदा त्यांच्या पाया पडलो आहे. त्यांच्या त्या आशीर्वादाची शिदोरी माझ्यासाठी अलौकिक आहे… – ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वियोगातून स्वरसृष्टी अजून नीटशी सावरलेलीही नसतानाच आशाताईंनी जगाचा निरोप घेतला आहे. स्वरसंगीताच्या क्षेत्रातल्या एका महान पर्वाची अखेर त्यांच्या जाण्याने झाली आहे. व्यक्तिशः माझ्यासाठी त्यांचा वियोग प्रचंड धक्कादायक आहे. आशाताई आणि बाबूजी यांच्यातील सांगीतिक मैत्र हे मराठी संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग होतं. त्या काळापासून आशाताई आमच्या घरचा एक अविभाज्य भाग होत्या. बाबूजींच्या संगीतात शब्दांना आणि भावनेला खूप महत्त्व असायचे आणि आशाताईंनी ते नेमकेपणाने टिपले. त्यांच्या आवाजातील लवचिकता आणि कोणत्याही शैलीत स्वतःला झोकून देण्याची वृत्ती थक्क करणारी होती. खरे तर आशाताई आमच्या घरी आल्या त्या माझ्या आईमुळे, ललिताबाईंमुळे. तो काळ आशाताईंच्या संघर्षाचा होता. माझी आई तेव्हा हिंदी चित्रपटांत गात असे. एकदा लोकलने प्रवास करताना अंधेरी स्टेशनवर आशाताई डब्यात चढल्या आणि आईसमोर येऊन बसल्या. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाल्या, ‘‘ललिताबाई, मी लताची बहीण. तुम्ही फडके साहेबांना सांगाल का मला गाण्याची संधी देण्याबद्दल?’’ आईने हे बाबूजींना सांगितले आणि त्यानंतर बाबूजींनी आशाताईंना बोलावले. तिथून जो प्रवास सुरू झाला, तो पुढे अनेक दशके अविरत चालला.

‘ऋतू हिरवा’ या अल्बमच्या वेळी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तब्बल 21 वर्षांनंतर ‘साकार गंधार’च्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकत्र आलो. आशाताईंसोबत काम करताना मनावर नेहमीच एक प्रकारचे दडपण असायचे. हे दडपण त्यांच्या मोठेपणाचे नसून त्यांच्या गाण्याप्रती असलेल्या निष्ठेचे असायचे. माझ्या संगीत कारकीर्दीतील ‘ऋतू हिरवा’ हा अल्बम एक मैलाचा दगड ठरला, पण या अल्बममागे सात वर्षांची प्रतीक्षा होती. सुरुवातीला ही गाणी मी लतादीदींना ऐकवली होती. त्यांना ती आवडलीही, पण काही कारणास्तव त्यांचे रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. मी तब्बल सात वर्षे थांबलो होतो. शेवटी 1989 मध्ये मी आशाताईंकडे गेलो. त्यांना सर्व काही प्रामाणिकपणे सांगितले की, दीदींकडे ही गाणी आधी गेली होती. त्यांनी चाली ऐकल्या आणि क्षणभर माझ्याकडे नजर रोखून बघत म्हणाल्या, ‘‘श्रीधर, गाणी कठीण आहेत रे, पण मी गाईन. फक्त मी दीदींना सांगून मगच हे गाणे रेकाॅर्ड करेन.’’ जेव्हा ‘ऋतू हिरवा’चे रेकॉर्डिंग झाले, तेव्हा आशाताईंनी त्या गाण्यांचे अक्षरशः सोने केले. ‘भोगले जे दुःख त्याला’ हे गाणे गाताना मी त्यांना म्हटले होते की, ‘‘ताई, तुमच्या आयुष्यातील जे काही चढ-उतार आहेत, त्याचे प्रतिबिंब या गाण्यात आहे. त्यांनी ते इतक्या भावूकपणे गायले की, आजही ते ऐकताना अंगावर काटा येतो. ‘ऋतू हिरवा’ इतका लोकप्रिय झाला होता की, त्याच्या तोडीचे किंवा त्यापेक्षाही चांगले संगीत आपल्याला द्यायचे आहे, हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. भारतीय संगीतात अशी संकल्पना आहे की, जो स्वर अतिशय निर्मळ आणि स्वयंभू असतो, त्याला ‘गंधार’ म्हणतात. आशाताईंचा आवाज म्हणजे तोच ‘स्वयंभू गंधार’ होता. शांताबाई शेळके यांनी लिहिलेले ‘साकार गंधार’ हे गाणे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा त्यांनी मला लगेच अनुमती दिली.

आशाताईंचा स्वभाव ‘डाऊन टू अर्थ’ होता. त्यांच्या वागण्यात कधीही आपल्या स्वरसामर्थ्याचा, केलेल्या कामाचा अहं दिसला नाही. अत्यंत साधेपणाने त्या प्रत्येक व्यक्तीशी वागत. बा. भ. बोरकर, शांता शेळके, आरतीप्रभू, ग. दि. माडगुळकर, सुरेश भट, सुधीर मोघे अशा नामवंत कवींबरोबरच सौमित्रसारख्या कवीच्या कविता आशाताईंच्या आवाजात रसिकांसमोर आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर मधुबाला, मीनापुमारीपासून अगदी अलीकडच्या नायिकांपर्यंत त्यांनी अनेकांसाठी आपला आवाज दिला आहे. त्यांनी 14 भाषांमध्ये 12हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढय़ाच ताकदीने गाऊ शकत, हे शतपैलुत्व अलौकिक होतं. अभिजात संगीताला स्थळ, काळ, वेळेचं बंधन नाही तसंच आशा भोसले यांच्या आवाजालाही कशाचंच बंधन नव्हतं. आशाताईंसारखी अष्टपैलू गायिका होणे केवळ अशक्य आहे. त्यांच्या स्वरांनी मराठी मनावर जे अधिराज्य गाजवले आहे, ते शब्दांच्या पलीकडचे आहे.

शब्दांकन – विधिषा देशपांडे