लेख – जीवनाचा अर्थ सांगणार्‍या आध्यात्मिक रचना

>> डॉ. राजू पाटोदकर  

आषाढी एकादशी नुकतीच पार पडली. कोरोनामुळे नेहमीच्या प्रथेप्रमाणे वारी आणि आषाढीचा उत्सव साजरा होऊ शकला नाही.  तरीही त्यानिमित्ताने विठू माऊली आणि आध्यात्मिक साहित्य, अभंग, भक्तिगीते यांची उजळणी झालीच. संतांनी पंढरीरायावर अनेक भक्तिरचना केल्या आहेत, होत आहेत. त्यातील अनेक प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अध्यात्मासोबतच जीवनाचा अर्थ स्पष्ट करणार्‍या या भक्तिरचनांनी महाराष्ट्राला भक्तिरसात गुंफून आणि गुंतवून ठेवले आहे. अशा काही प्रातिनिधिक भक्तिरचनांचा आढावा लेखात घेतला आहे.

वि ठू माऊलीवर संतांनी अनेक भक्तिरचना रचल्या. भक्तजन आजही त्या मोठय़ा भक्तिभावाने म्हणताना दिसतात. अशीच काही भक्तिगीते आपल्या मराठी चित्रपटांतूनही बरीच लोकप्रिय झाली. काही भक्तिरचना लोककलावंतांनी गायल्या व त्या चित्रपटांपेक्षाही अधिक रसिकमान्य झाल्या. ‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेला व अफाट लोकप्रियता मिळालेला संत एकनाथांचा अभंग म्हणजे ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी’. पंडितजींनी हा अभंग गायलेल्या दिवसापासून ते आजतागायत त्याची लोकप्रियता वाढतच आहे. या अभंगाला राम फाटक यांनी संगीतबद्ध केले असून पंडितजींनी ते भूप व नट रागात गायलेले आहे. या अभंगाच्या प्रत्येक शब्दाला पंडितजींनी आपल्या खास गायकीद्वारे वेगळेपण दिल्याने त्यास आगळी वेगळी लय मिळाली. पंडितजींच्या अनेक भक्तिरचना अशाच लोकप्रिय आहेत.

सिद्धहस्त कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेले एक सुरेख गीत आपणास ‘प्रपंच’ या चित्रपटातून पाहावयास मिळते. यातील सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’ हे गीत प्रचंड लोकप्रिय आहे. या गीतातील प्रत्येक शब्द हा अर्थपूर्ण असून ज्या पद्धतीत बाबूजींनी ते गायले आहे त्यास तोड नाही. एकतारी, चिपळ्या यांचा सुरेख उपयोग करून उत्तम असे चित्रीकरण झालेले हे गीत आहे.

‘संत गोरा कुंभार’ हा दिग्दर्शक राजेश लिमकर यांचा 1961 या वर्षी प्रदर्शित झालेला आणखी एक उत्तम असा चित्रपट. गायक संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी तर गीतकार गदिमा. अप्रतिम असे हे कॉम्बिनेशन. गीताचे बोल ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम’ हे गीतदेखील बाबूजींच्या उत्तुंग अशा प्रतिभाशैलीची साक्ष देणारे आहे. हे गीत ऐकताना याची प्रचीती येतेच, परंतु हे गीत पाहताना आणखी एक कलावंत आपल्यासमोर दिसतो तो म्हणजे कै. कुमार दिघे. अत्यंत तल्लीन होऊन ते हे गीत साकार करताना पडद्यावर आपण पाहतो व आपणही त्यात सहभागी होतो हेच या गीताचे यश.

राजा नेने, सुलोचना यांच्या कलाविष्काराने नटलेला एक सुरेख चित्रपट म्हणजे 1964 या वर्षी प्रदर्शित झालेला ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’. या चित्रपटात संत ज्ञानेश्वरांचीच ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ ही भक्तिरचना गीतरूपाने साकारलेली आहे. आशा भोसलेंच्या आवाजात ही गीतरचना आपणास ऐकावयास मिळते. भागीरथी चित्रचा हा चित्रपट असून दिग्दर्शक मधुकर पाठक आहेत. सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा यांचे संगीत लाभलेला हा अप्रतिम चित्रपट आहे.

सुधीर फडके यांच्या दिग्दर्शनात निर्माण झालेला विठ्ठलभक्तीचा एक छानसा चित्रपट म्हणजे ‘झाला महार पंढरीनाथ’. गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि गायक कलावंत आशा भोसले, वसंतराव देशपांडे व स्वतः बाबूजी. यातील विठ्ठलदर्शनाचे सुरेख गीत म्हणजे ‘निजरूप दाखवा हो, हरी दर्शनास या हो’. शाहू मोडक यांचा सुरेख अभिनय, सोबत हिंदीतील कलावंत जयराज तसेच पद्मा चव्हाण. भरपूर ट्रिक सीन्स असलेला असा हा चित्रपट आहे.

रंजना या गुणी अभिनेत्रीचा उत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘अरे संसार संसार’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. मराठी ‘मदर इंडिया’ असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटात जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले एक सुरेख विठूमाऊलीचे गीत आहे. ‘विठूमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा’ हे त्या गीताचे बोल. जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायले आहे. संगीतकार अनिल-अरुण तर पडद्यावर आपणांस हे गीत साकारताना मोहन गोखले व इतर कलावंत दिसतात.

विठ्ठलभक्तीने प्रेरित असलेला एक सुरेख चित्रपट म्हणजे रमाकांत कवठेकर दिग्दर्शित 1988 साली प्रदर्शित झालेला ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट. या चित्रपटातील संत जनाबाईंची भक्तिरचना म्हणजे ‘धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर.’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे गीत असून विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेले आहे. मराठी माणसाची अस्मिता, श्रद्धा असलेल्या पंढरीच्या वारीवर आधारित या चित्रपटात आहे.

‘कानडा राजा पंढरीचा’ हा एक अभंग. मात्र ‘राजा पंढरीचा’ या नावाने 1995 साली यशवंत भालकर दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात चक्क ‘विठ्ठलनामाची शाळा’च भरविलेली आहे. बालकलावंत प्रसाद माळी आणि त्याचे शाळकरी मित्र पाटी, पेन्सिल घेऊन शाळेत न जाता विठ्ठल, रखूमाईच्या मंदिरात येतात आणि विठ्ठलभक्ती करतात. त्यावेळी ‘विठ्ठलनामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहानभूक हरली, विठ्ठलनामाची शाळा भरली’ हे गीत आपणांस पाहावयास मिळते. जगदीश खेबूडकर ऊर्फ नानांच्या गीतरचनेला संगीतकार बाळ पळसुले यांनी अविट अशी चाल दिली असून बेला शेंडे या गायिकेने आपल्या गोड आवाजात हे गीत गायलेले आहे.

पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी मराठी मन आतुर होते. मिळेल त्या माध्यमातून पंढरीला पोहोचून पांडुरंगाचे दर्शन हाच एक ध्यास. काही जण तर पिढय़ान्पिढय़ा वारीद्वारे विठ्ठल दर्शन घेतात. या वारीचे खरेखुरे दर्शन आपणांस ‘लय भारी’ या 2014 साली प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुख अभिनित व निशिकांत कामत दिग्दर्शित ‘माऊली’ या चित्रपटातून झाले. चित्रपटाच्या टायटल साँगमध्येच अख्ख्या वारीचे यथार्थ दर्शन आपणांस होते. ‘तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली’ हे ते गीत. गीतकार गुरू ठाकूर, संगीतकार अजय-अतुल, तर गायक अजय गोगावले आणि उत्कृष्ट चित्रीकरण असे भन्नाट कॉम्बिनेशन.

अस्सल लोकगायक लोक, भक्तिसंगीताचा बादशहा म्हणून प्रख्यात गायक स्व. प्रल्हाद शिंदे यांच्याकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. आपल्या पहाडी आवाजाने त्यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ’ हे भक्तिगीत घराघरात आणि मराठी माणसाच्या ओठी पोहोचविले. केवळ हेच नव्हे तर ‘चल गं सखे चल गं सखे पंढरीला’, ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’, ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, ‘चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी’ अशा बर्‍याच रचना त्यांनी महाराष्ट्राला व माऊली भक्तांना ऐकविल्या आहेत. त्यांचा आवाज महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या या भक्तिगीतांच्या विविध कॅसेटस्, सीडी बाजारात उपलब्ध असून दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढतच आहे.

या काही प्रातिनिधिक भक्तिरचना आहेत. यासोबतच आणखीही अधिक चांगली गाणी आहेत. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला भक्तिरसात गुंफून ठेवलेले आहे. संतमाहात्म्यांच्या या रचना अध्यात्मासोबतच जीवनाचा अर्थही स्पष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे या नुसत्या ऐकल्या तरी निश्चितच आपल्या मनाला एक प्रकारचे आगळेवेगळे समाधान लाभते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या