
>> दिलीप जोशी
पाच अब्ज वर्षांपूर्वी सूर्य आणि त्यानंतर काही कोटी वर्षांत आपली सूर्यमाला जन्माला आली. आपल्या सूर्याचं वय आता पन्नाशीत आहे. त्याचं एकूण आयुष्य दहा अब्ज वर्षांचं. तोपर्यंत तरी आपलं सौर कुल अबाधित असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बाकीच्या ग्रहांचं जाऊद्या. तिथे नैसर्गिक उत्पातांशिवाय अडथळे नाहीत. पृथ्वीवर मात्र माणूस नावाचा प्राणी उत्पात घडवायला समर्थ (!) आहे… आणि तोच मानव या ग्रहाला वाचवूही शकतो. पृथ्वीचे घडणे-बिघडणे सध्या बऱयाच अंशी माणसाच्या हाती आहे. याचा अर्थ आपला ग्रह नष्ट वगैरे होईल असे अजिबात नाही. नुकसान झालं तर ते माणसांचंच आणि पर्यायाने पृथ्वीवरच्या जीवनसृष्टीचं होईल. एवढी अमूल्य जैविक रचना सबंध विश्वात आणखी कुठे असली तरी ती आपल्याला ज्ञात नाही. हॉलीवूडचे सिनेमे आणि फॅन्टॅसी कथा वगळता ‘एलियन’ आढळलेला नाही.
इतर ग्रह जीवहीन अवस्थेत सूर्याभोवती गरगरताहेत. सूर्याचं गुरुत्वाकर्षणच इतकं प्रचंड आहे की, आइन्स्टाइनच्या सोस कर्व्हेचर सिद्धांतानुसार त्याना या जनक ताऱयाभोवती फिरणं अनिवार्य आहे. त्यांच्या कक्षा, निर्मितीच्या काळापासून अनेक स्थित्यंतरे पाहत आता स्थिरावल्या, म्हणजे निश्चित झाल्या आहेत. म्हणूनच सारी ग्रहमाला गुण्यागोविंदाने नांदते आहे.
मात्र या संपूर्ण ग्रहसंकुलाचा परिचय प्राचीन काळी नव्हता. सतराव्या शतकात दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यावर दूरस्थ गोष्टी दिसू लागल्या. तरीही प्राथमिक अवस्थेतल्या दुर्बिणींना मर्यादा होती. गुरूचे चार चंद्र-शनीची कडी ‘दिसली’ हीसुद्धा मोठीच गोष्ट मानली गेली. त्याच्या पलीकडे ‘कोणी’ ग्रह असेल असं वाटलं नव्हतं. पण माणसाचे विश्वरचनेबद्दलचे आणि सूर्य मालेविषयीचेही आडाखे धक्के खातच योग्य निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. हॉलेमीला पृथ्वीभोवती ‘विश्व’ फिरतं असं वाटलं. कोपर्निकसने आपल्या ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्य असल्याचं म्हटलं आणि पृथ्वीही त्याभोवती फिरते असं म्हणताच परंपरावाद्यांनी गहजब केला. गॅलिलिओला तर सजाच ठोठावली गेली.
असा प्रखर विरोध सहन करत सत्यान्वेषी संशोधक प्रयत्न करतच राहिले. शनीपलीकडेही तीन ग्रह असल्याचं हळूहळू लक्षात आलं. त्यापैकी शेवटचा मानला गेलेला प्लूटो 2004 मध्ये लघुग्रह ठरला, पण युरेनस, नेपच्युन इतके प्रचंड की ते ग्रहपद गमावणे शक्यच नव्हतं. सूर्यापासून सुमारे दोन अब्ज, ऐंशी कोटी किलोमीटर अंतरावर असलेला युरेनस 1980 मध्ये व्हॉल्टर-2 हे यान त्याच्या जवळून जाईपर्यंत फारसा ठाऊक नव्हता. त्याचा व्यास 51 हजार किलोमीटर आहे. तो त्याच्या कक्षेशी 97 अंशाचा कोन करत असल्याने सूर्याभोवती गडगडत जात असल्यासारखा भ्रमण करतो. स्वतःभोवती 17 तासात फिरणाऱया नेपच्युनचा एक दिवस, आपल्यापेक्षा लहान असला तरी त्याचं एक वर्ष म्हणजे आपली 88 वर्षे! याच्यावरून एखादं रॉकेट अवकाशात उडवायचं तर त्याचा वेग सेकंदाला 21 किलोमीटर एवढा ठेवावा लागेल.
विल्यम हर्शल हा शास्त्र्ाज्ञ 1757 मध्ये जर्मनीहून इंग्लंडला आला तेव्हा आपल्याकडे प्लासीच्या लढाईने इंग्रजी राजवट पाय रोवत होती. इंग्लंडमध्ये खगोलीय अभ्यासात रस घेणारा हर्शल मूळचा संगीतकार होता! याने 13 मार्च 1781 रोजी युरेनसचा शोध लावला. अर्थात त्यापूर्वीही काही निरीक्षकांनी युरेनसचं निरीक्षण केलं होतं असं म्हणतात. हर्शलला तो आधी एक दूरचा धूमकेतूच वाटला. पण नंतर तो आपल्या सौर कुटुंबाचा ज्येष्ठ सदस्य असण्याचं लक्षात आलं. 218 अंश तापमान असणाऱया युरेनसवर जीवसृष्टी म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याच्या मिरांडा नावाच्या उपग्रहावर आपल्या एव्हरेस्टच्या दुप्पट उंचीचा कडा आहे.
युरेनसनंतरचा नेपच्युन हासुद्धा पृथ्वीच्या जवळपास चार पट मोठा ग्रह फ्रेंच आणि ब्रिटिश संशोधकांना एकाच वेळी ‘सापडला.’ 1840 म्हणजे, तशी ही अगदी अलीकडचीच घटना म्हणायला हवी. सूर्याभोवती 165 वर्षांत एक फेरी पूर्ण करणाऱया नेपच्युनचा दिवस 16 तासांचा असतो. नेपच्युनवर गुरूसारखी महावादळं होत असतात. त्याचं तापमानही 218 अंश इतकं गोठवणारं! युरेनस आणि नेपच्युनच्या वातावरणात हायड्रोजनचं प्रमाण जास्त आणि हिलियम व मिथेनचं प्रमाण कमी आहे.
नेपच्युन त्याला कक्षेत फिरताना काहीसा डचमळतो हे लक्षात आल्यावर शास्त्र्ाज्ञांना त्याच्या पलीकडेही एखादा ग्रह असावा असं वाटू लागलं होतं, परंतु ‘प्लूटो’चं दर्शन घडल्यानंतर सुमारे शतकभराचा कालावधी गेला. त्या प्लूटोविषयी आणि नेपच्युन- प्लूटो यांच्या नात्याविषयी पुढच्या लेखात.
या कॉलममधून आपण लघुग्रहांच्या पट्टय़ाची माहिती गेल्याच आठवडय़ात घेतली. त्यातील मोठय़ा अशनीचा (महापाषाण) आघात पृथ्वीवर झाला तर उत्पात कसा घडतो ते सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राने लोणार येथे अनुभवला. अर्थात तेव्हा तेथे वस्ती नसणार. मात्र 30 जून 1910 रोजी रशियातील तुंगुस्का येथील जंगलात एक अशनी कोसळला आणि त्याने ते अरण्य भस्मसात केले. म्हणून हा दिवस ‘ऍस्टेरॉइड’ किंवा अशनी दिवस म्हणून पाळला जातो.



























































