वेब न्यूज – ऑटो ब्रूअरी सिंड्रोम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘ऑटो ब्रूअरी सिंड्रोम’ असे भारदस्त नाव असलेला एक रोग आहे. हा विषय एकदम चर्चेत येण्याचे कारण 2022 मधील एक गुन्ह्याचे प्रकरण आहे, ज्या संदर्भात नुकताच न्यायालयाने निकाल दिला. 2022 मध्ये बेल्जिअम देशात एका कार चालवणाऱया माणसाला पोलिसांनी थांबवले. पोलिसांना संशय होता की कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतोय. शिरस्त्यानुसार चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी 0.91 होती. कायदेशीर मर्यादेच्या दुप्पट हे प्रमाण असल्याने चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. चालकाची एका महिन्यात पुन्हा तपासणी करण्यात आली. यावेळी त्याच्या श्वासात 0.71 इतकी अल्कोहोलची पातळी मिळाली. अर्थात, हा मनुष्य मद्यपी आहे हे सप्रमाण सिद्ध होत होते. मात्र खरी गंमत तर पुढे झाली. कोर्टाने या चालकावरील सर्व आरोप रद्द करून त्याची निर्दोष म्हणून मुक्तता केली. या चालकाच्या मदतीला धावून आला तो जगातील एक दुर्मिळ असलेला आजार, अर्थात ऑटो ब्रूअरी सिंड्रोम. या रोगामध्ये रोग्याचे शरीर स्वतः आतल्या आत अल्कोहोल तयार करायला लागते. त्यामुळे रोग्याची अवस्था एखाद्या मद्यधुंद माणसासारखी होते, तेदेखील दारूचा एकही थेंब न पिता. या चालकाची ओळख सध्या गुप्त ठेवण्यात आलेली आहे. या प्रकरणात तीन डॉक्टर्सनी या चालकाची तपासणी केली आणि एकमताने हा चालक ऑटो ब्रूअरी सिंड्रोमचा शिकार असल्याची पुष्टी न्यायालयासमोर केली. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. त्याची जप्त केलेली गाडीदेखील त्याला परत करण्यात आली.