साहित्य जगत- 95 वा वाढदिवस…

>> रविप्रकाश कुलकर्णी

कलावंताची कुंडली कधी मांडू नये. आयुष्याचा हिशेब मांडताना एका कलावंताने म्हटले आहे, “आयुष्याच्या या संध्याकाळी मी सुखी आहे का? आनंदी आहे का? मला वाटतं, ‘सर्व सुखाचे आगर बाप रखुमाईवर’ हा जो कोणी रखुमाईवर आहे, तो आयुष्यभर मला भेटतच होता, आनंदात ठेवत होता. आता या क्षणी निरोप घेतानाही मी आनंदात आहे…’’

आनंदाच्या या संध्याकाळी हे विचार मनात येतात आणि एका अज्ञात प्रदेशात मन तरंगू लागतं. या अज्ञातात काय ऐकू येतं? काय काय भेटतं? केशवसुतांची ‘दिडदा दिडदा’ ऐकू येते, ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ ऐकू येतं, ‘अवघाची रंग एक जाला’ ऐकू येतं आणि‘अंतरिक्ष फिरलो, पण ‘गेली न उदासी’ हेही ऐकू येतं. तरीही ‘तमाच्या तळाशी दिवे लागलेले’ दिसू लागतात आणि ज्ञात-अज्ञाताचं सरोवर अवघं प्रकाशमान होऊन जातं. आयुष्याची संध्याकाळ खरोखरच आनंदाची होऊन जाते.

‘माझ्या आयुष्याची संध्याकाळ आनंदाची झालेली आहे. खळबळणाऱया सरोवरातील तरंग शांत झालेले आहेत. सरोवर निष्कंप झालेले आहे! माणूस योजतो एक, पण अज्ञाताची एक अदृश्य करंगळी वेगळंच वळण गिरवत असते. वरती जो कोणी तो आहे त्याच्या मनाची खेळी काही वेगळंच योजत असते.’

हे चिंतन आहे मधु मंगेश कर्णिक यांचं. 2012 मध्ये त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या प्रसंगी केलेलं. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनंतरदेखील पूर्वीच्या जोमाने ते कार्यरत आहेतच.

हे सर्व आठवलं ते त्यांच्या 95व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिर येथे 25 एप्रिल 2025 रोजी जो सोहळा आयोजित केला होता त्याचं आमंत्रण आलं तेव्हा. शिवाय त्याच्या जोडीला मधु मंगेश यांच्या पाच पुस्तकांचे प्रकाशन! अर्थात मधु मंगेश कर्णिक यांची जन्मतारीख कागदोपत्री 28 एप्रिल 1933 आहे. म्हणजे त्या हिशेबात त्यांचं वय 92 आहे. मग सत्कार 95 चा कसा? असा प्रश्न पडतो. हा घोळ कागदोपत्री चुकीची नोंद झाल्यामुळे झाला. त्यांचं खरं जन्मवर्ष 1931 आहे. ही गोष्ट खुद्द त्यांनीच एकदा सांगितलेली आहे.

अर्थात मधु मंगेश पिंडाने गोष्टीवेल्हाळ. म्हणून ते सांगतात, आठ वर्षं झाली तरी त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं. ‘घोडो झालो तरी शाळेत जावक नको! बामणाचा नाव बुडवल्यान भोसडीच्यानं!’ असं म्हणत आणि कुल्यावर फटके मारत गावातल्या बाळा बामणाने त्यांना शाळेत नेलं. मास्तर म्हणाले, ‘याची जन्मतारीख काय घालायची बामणाचा मंगेशदादांचा मुलगा, खोतांचा पूर्ण सात वर्षांचा मुलगा बिगरीत बसवायला बरं दिसत नाही. याला पहिलीत बसवतो.’

बाळा बामण म्हणाला, “बसवा.’’

“जन्म तारीख काय घालायची?’’

“तुम्हीच काय ती घाला.’’

मास्तरांनी बोट मोडून हिशेब केला. ते वर्ष 1938. मधु मंगेश सांगतात, “मास्तरांनी बोट घालून त्यातून पाच वर्षं कमी केली. माझं जन्म साल 1933 हे ठरवलं आणि तशी दप्तरात नोंद करून ते मोकळे झाले. अशा रीतीने 31 साली 28 एप्रिल रोजी जन्म झालेला आतेबायचा मुलगा, मधली दोन वर्षं बाळा बामणाला आणि करुळीच्या शाळा मास्तरांना देऊन कसा तरी शाळेत दाखल झाला! अर्थात हा घोळ केव्हा कसा दुरुस्त केला हे मधु मंगेश यांनाच विचारायला हवं, असा विचार करत मी रवींद्र नाटय़मंदिरात वेळेत पोहोचलो खरा. सभागृह तुडुंब भरलेलं. बहुतेक जण कोकण मराठी साहित्य परिषदेचे. मंगेश यांची ही ताकद आहे. स्टेजवर कौशल इनामदार पेटी घेऊन शाळेतल्या गॅदरिंगमध्ये कधी एकदा आपला नंबर लागतो म्हणून विद्यार्थी आपलं भाषण पुटपुटत असतो तसा अधिरा झालेला.

मग एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. ग्रंथतुला होतीच. मग पुस्तकांचं प्रकाशन! ‘स्मृती जागर’ (उत्कर्ष प्रकाशन), ‘राजा थिबा’, ‘उधाण’, ‘स्वयंभू’ (मॅजेस्टिक प्रकाशन) आणि कवितासंग्रह ‘गूढ निगूढ‘ (मौज प्रकाशन). हे सगळं होत असताना कार्यक्रम घरंगळत चालला. त्यामुळे प्रेक्षक म्हणून बसलेले उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी बसल्या जागेवरूनच म्हणाले, “आम्हाला बोलायला देणार की नाही?’’ मग ते बोलले, मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे बोलले आणि मौजतर्फे मोनिका गजेंद्रगडकर मार्मिक बोलल्या, मग उशिरा आलेले मंत्री महोदय उदय सामंत बोलले. आधीच्या भाषणात नमिता कीर यांनी काही मागण्या केल्या होत्या त्या आणि मधु मंगेश यांनी खाजगीत काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या मागण्या मंजूर करून टाकल्या. त्यांच्यानंतर मंत्रीमहोदय आशीष शेलार बोलले. ते म्हणाले देखील की, मी आता बाहेर जाणाऱया प्रेक्षकांची नोंद घेतोय की, माझ्या भाषणाला कोणी शिल्लक राहील की नाही! हा त्यांचा मुद्दा मार्मिकच..!

असं सगळं असूनसुद्धा मधु मंगेश मात्र स्थितप्रज्ञ ‘योगीयाचा राजा’ असल्याप्रमाणे शांत बसलेले होते. खरं तर ते राजकीय पुढारीच व्हायचे. मग प्रसंग भान ठेवून त्यांनी थोडक्यात कृतज्ञता व्यक्त केली. केव्हा तरी कार्यक्रम संपला. निघताना मनात आलं, मधु मंगेश अनेकांना प्रेरणा देतात, सगळ्यांना बरोबर घेऊन कार्य करतात त्याचे हेच तर रहस्य नाही? म्हणूनच त्यांना दाद द्यायची. अभिष्टचिंतन करायचे.