लेख : नेत्रदानाबाबत जनजागृतीची गरज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, परंतु नेत्रदान नेमके कसे होते याबाबतचे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न…

आमच्या मॉर्निंग ग्रुपपैकी एकाचा वाढदिवस एका अंधशाळेतील विद्यार्थ्यांना भेट देऊन आम्ही साजरा केला. सोबत स्वीट डिश घेऊन गेलो होतो. त्यांना जेवू घातल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भावमुद्रा पाहून वाढदिवसाचं सार्थ झाल्यासारखं वाटलं. पाचवी ते आठवी असा विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. जेवू घातल्यानंतर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे ऐकून थक्क झाल्यासारखं झालं. नियतीने एक बाजू कमी दिली तर दुसऱ्या बाजूनं ती भरभरून देत असते याचा प्रत्यय आला. मग प्रश्न असा पडतो की, दैवानं यांना का बरं अंध ठेवलं असावं? 1) नेत्ररोपण शस्त्र्ाक्रियेबद्दल त्यांना अपुरी व चुकीची माहिती दिली असेल, 2) त्याबद्दल त्यांना भीती वाटत असेल, 3) नेत्ररोपण शस्त्र्ाक्रियेसाठी आवश्यक असलेले त्यांच्याकडे पैसे नसतील, कारण काहीही असले तरी आज ही मंडळी डोळस बनून या जगात आपल्या नैसर्गिक टॅलेंटने मोठय़ा पदावर जायला त्यांना कोणीही रोखू शकले नसते, एवढं शास्त्र्ा प्रगत आहे, पण नेत्रपेढय़ा त्या प्रमाणात कुठे आहेत?

डोळय़ांची गरज कोणाला कधी लागेल याची शाश्वती देता येणार नाही. बुबुळ हा डोळय़ाचा पुढील पारदर्शक भाग असतो, ज्यामधून प्रकाशकिरणे मागच्या पडद्यावर पडतात. त्यामुळे आपल्याला पुढील गोष्टी सहजपणे दिसतात. स्पष्ट नजरेसाठी बुबुळे पारदर्शक असणे फार महत्त्वाचे असते. नेत्ररोपणाच्या शस्त्र्ाक्रियेसाठी शस्त्र्ाक्रियेनंतर बुबुळे खराब झाल्यास आणि 3) किरेटोकोनस (बुबुळाची तीक्र वक्राकार रचना)- नेत्ररोपण शस्त्र्ाक्रियेसाठी पेशंटच्या बुबुळाचा खराब भाग काढून टाकून त्या जागी बुबुळांच्या पडद्याचे रोपण करण्यात येते. यात खालील पद्धती अवलंबिल्या जातात.

1) ड्रिप पेनिट्रेटिंग कॅरेटोप्लॉस्टी ः यात संपूर्ण बुबुळ बदलून त्या जागी नवे बुबुळ बसविले जाते.

2) डेस्मेट स्ट्रिपिंग कॅरेटोप्लॉस्टी ः यात संपूर्ण बुबुळ न बदलता बुबुळाचा पृष्ठभाग बदलला जातो.

3) डीप एण्टेरियर लॅमलेर कॅरेटोप्लॉस्टी ः यामध्ये बुबुळाचा केवळ वरचा थर बदलला जातो.

4) स्टेम सेल ः यात चांगल्या बुबुळाच्या काही पेशी काढून त्या लॅबमध्ये वाढविल्या जातात. त्यांचा उपयोग बुबुळाच्या विकारावर उपचारांसाठी केला जातो. चांगल्या बुबुळाचा पडदा हा मृत व्यक्तींचे डोळे नेत्रपेढीला दान केल्यानंतर गरजू पेशंटच्या नेत्ररोपणासाठी उपलब्ध होतो.

नेत्रदान कोण करू शकतो?- नेत्रदान कोण करू शकतो याबाबत समाजात अद्याप काही गैरसमज आहेत. फक्त फॉर्म अथवा अर्ज भरून नेत्रदान पूर्णपणे साध्य होत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीची इच्छा मात्र जाहीर होते, परंतु अर्जदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याची गरज असते. नातेवाईकांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय अवयवदान, नेत्रदान करण्याच्या मनःस्थितीत नसतात. अशा वेळी कोणीतरी मन खंबीर करून पुढे येणे गरजेचे असते. प्रामुख्याने ज्यांना नेत्रदान करायचे असते, त्याने खरे तर आपली इच्छा कुटुंबीयांकडे बोलून दाखवायला हवी; जेणेकरून भविष्यात त्यांच्या इच्छेनुसार नेत्रदान करण्यास अडथळा येता कामा नये. परिणामी संबंधित व्यक्तीची इच्छा अमलात आल्यास त्यामुळे एका अंध व्यक्तीला जग पाहण्याची संधी मिळणे शक्य होणार आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून नेत्रदान करता येते. म्हणजेच आठ वर्षांचा मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावली तरी तिचे डोळे मृत्यूनंतर अवघ्या चार तासांत काढून त्याचा उपयोग दुसऱ्यासाठी करणे सहज शक्य आहे. मोतीबिंदू, काचबिंदू असलेल्या पेशंटच्या नेत्रदानाचा उपयोग नेत्रपेढी करू शकते. याशिवाय मोतीबिंदू अथवा काचबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीने केलेले नेत्रदान उपयोगी ठरते. चष्म्याचा मोठा नंबर असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात. कावीळ, कॅन्सर, एड्स आदी रोग असलेल्या पेशंटच्या नेत्रदानाचा उपयोग संशोधनासाठी करण्यात येतो.

नेत्रदान करताना…

1) संबंधिताच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढय़ांशी संपर्क साधावा.

2) मृत व्यक्तीचे डोळे बंद करावेत.

3) डोळय़ावर ओल्या कापसाच्या घड्या ठेवून द्याव्यात.

4) मृत्यूनंतर चार तासांतच मृत्य व्यक्तीचे डोळे काढणे आवश्यक आहे.

5) काविळीच्या तपासण्या व एचआयव्ही तपासणीसाठी मृत व्यक्तीचे दोन ते तीन मिली रक्त घ्यावे लागते.

6) नेत्रदान केल्यानंतर मृतदेहाला विद्रूपता येते असा एक गैरसमज आहे, परंतु मृतदेहाला कोणत्याही स्वरूपाची विदपता येत नाही. बुबुळांमुळे अंधत्व आलेल्यांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदान हाच एक मार्ग आहे. त्यासाठी समाजाने नेत्रदान करण्याची व त्याबाबतची जनजागृती करण्याची आज गरज आहे.