>>डॉ. जगदीश कदम
मराठी बालसाहित्याला फारशी प्रतिष्ठा नाही. एकेकाळी बालसाहित्याचा फार मोठा वाचक वर्ग होता. संस्कारक्षम वयात बालकांच्या हातात उत्तमोत्तम पुस्तके पडली तर त्यांची योग्य प्रकारे जडणघडण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर बालसाहित्याचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकते. हे महत्त्व हेरून मराठीतील नामवंत सर्जक डॉ. सुरेश सावंत आणि डॉ. मथू सावंत यांनी ‘भगवान अंजनीकर यांचे बालसाहित्य ः बालवाचकांच्या नजरेतून’ हे संपादन सिद्ध केले आहे. हे संपादन यासाठी वैशिष्टय़पूर्ण आहे की, या पुस्तकातील सगळे लेखक हे शालेय विद्यार्थी आहेत.
डॉ. सुरेश सावंत आणि डॉ. मथू सावंत या संपादक द्वयीने लेखकाच्या निवडीपासूनच कल्पकता दाखविलेली आहे. शंभरावर पुस्तके लिहिणारे डॉ. भगवान अंजनीकर यांची बालसाहित्याची पंचवीस पुस्तके संपादनासाठी निवडली आहेत. डॉ. भगवान अंजनीकर या लेखकाच्या पंचवीस बालसाहित्यकृती निवडून त्यावर विद्यार्थ्यांकडून आस्वादपर लेखन करून घेण्यात संपादकद्वयी यशस्वी झालेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे लेखन म्हणजे एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा कशी करावी याचा वस्तुपाठ ठरावा असे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी एखादे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या मनावर कोणते संस्कार होतात, त्या पुस्तकातील कोणता भाग त्याला केंद्रस्थानी ठेवावा असे वाटते, कोणत्या पात्राने वाचक प्रभावित होऊ शकतो, लेखकाच्या भाषेचे वेगळेपण कोणते आणि या पुस्तकातून कोणता बोध दिलेला आहे अशा अनेक प्रश्नांची उकल विद्यार्थी वाचकांनी या पुस्तक परिचयातून केलेली आहे. आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करावे हे या समीक्षा लेखांतून जाणवत राहते. त्यामुळे अलीकडे बहुचर्चित असलेल्या ‘ज्ञानरचनावादा’ची पुष्टी करणारा हा उपक्रम आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
प्रस्तुत पुस्तकात विद्यार्थ्यांचे समीक्षा लेखन हे प्रामुख्याने डॉ. भगवान अंजनीकर यांनी लिहिलेल्या चरित्र पुस्तकांचे आहे. बसवेश्वर ते नरहर कुरुंदकर असा हा चरित्र मालिकेचा प्रवास आहे. वाचकांची जिज्ञासा वाढविणारी आणि रंजनाची भूक भागविणारी पुस्तकेसुद्धा विद्यार्थ्यांनी समीक्षेसाठी निवडलेली आहेत. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा कशी वेगळी आहे हे संक्षिप्त आशयासह सांगितले आहे. महापुरुषांची चरित्रे ही संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांच्या हातात पडायला हवीत. थोर शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांचे चरित्र कसे प्रेरणादायी आहे असे सांगत निरंजन पावडे हा विद्यार्थी लेखक कलामांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवतो. साने गुरुजी आणि गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांची चरित्रे वाचल्यानंतर शिक्षक कसा असावा हे प्रकर्षाने जाणवते अशी मतमांडणी शीतल वानखेडे आणि दीपाली भिसे या विद्यार्थिनी करतात. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध लेखकाने कसा घेतलेला आहे याविषयी सृष्टी कळसकर विवेचन करते, तर नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्टय़ांसंबंधी रोहित देशमुख आपले निरीक्षण नोंदवतो.
हे लेखन आस्वादात्मक असून लेखकाच्या आकलन टप्प्यात आलेली वैशिष्टय़े त्यांनी प्रामाणिकपणे नोंदवलेली आहेत. हे समीक्षा लेखन विद्यार्थ्यांनी केलेले असले तरी त्यामध्ये फारशी प्राथमिकता दिसत नाही. भाषेचा अडसर दिसत नाही. त्याचप्रमाणे ही समीक्षा शब्दजंजाळही वाटत नाही. अत्यंत सरळ, साध्या भाषेत ग्रंथांचा करून दिलेला आत्मीय परिचय असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
डॉ. भगवान अंजनीकर यांच्या बालसाहित्याचा शालेय विद्यार्थी असलेल्या समीक्षकांनी घेतलेला प्रामाणिक परामर्श म्हणजे प्रस्तुत समीक्षा ग्रंथ होय. डॉ. सुरेश सावंत आणि डॉ. मथू सावंत यांनी अत्यंत मौलिक स्वरूपाचे हे संपादन केलेले आहे. कसल्याही प्रकारची पोझ न घेता विद्यार्थी लेखकांनी डॉ. अंजनीकर यांच्या पुस्तकांसंबंधी लिहिले आहे. हे लेखन संक्षिप्त स्वरूपात असले तरी लेखकाची मूळ कलाकृती मुळातून वाचावी अशा प्रकारची उत्कंठा निर्माण करणारे हे संपादन आहे.
भगवान अंजनीकर यांचे बालसाहित्य
बालवाचकांच्या नजरेतून
संपादन- डॉ. सुरेश सावंत, डॉ. मथू सावंत
पृष्ठ–112, मूल्य-125 रुपये
प्रकाशन-इसाप प्रकाशन, नांदेड



























































