उत्तम क्रिकेटपटू अन् सुसंस्कृत माणूस!

740

>> द्वारकानाथ संझगिरी

बापू नाडकर्णी आज हयात नाहीत हे मनाला समजावणं मला जरा कठीण जातंय. काही गोष्टी मन स्वीकारायला तयारच नसतं. ते गेली काही वर्षे आजारी होते. अधूनमधून मी त्यांना भेटायला जात असे. ‘आजारपण’ त्यांच्या शरीरावर दिसे, आवाज थोडा क्षीण झाला होता. पण बुद्धी तीक्ष्ण होती. एखादी आठवण मधूनच उसळी घेऊन येई. अगदी शेवटची श्रीलंकेविरुद्धची टी-20 मॅच त्यांनी पूर्ण पाहिली. त्यानंतर मृत्यूने त्यांच्यावर जाळं फेकलं आणि त्यात ओढून घेतलं.

बापूजींबरोबर आमच्या भावविश्वाचा एक भाग तुटला. अजून ती त्यांची डावखोरी गोलंदाजीची ऍक्शन, त्यांचा तो टप्पा, ठरवलेल्या दिशेने जायची चेंडूची सवय वगैरे सर्वच आठवतं. अगदी काल घडल्यासारखं. ‘‘अचूकते तुझं नाव बापू नाडकर्णी’’ असं म्हणावं इतका त्यांचा टप्पा अचूक होता. त्यामागे तासन्तास यष्टीवर आणि एक नाणं ठेवून त्यावर चेंडू टाकून केलेली मेहनत कारणीभूत होती. ‘निर्धाव षटकांचे बादशहा’ असं त्यांना म्हणायला हरकत नाही. पण ही ‘बादशाही’ त्यांना प्रचंड मेहनतीतून मिळाली. त्यांनी इंग्लंडच्या केन बॅरिंग्टन आणि बोलुसला एकवीस निर्धाव षटकं टाकली. तेव्हा तीन-चार क्षेत्ररक्षक सोडले तर इतर उशी घेऊन झोपले असते तरी चाललं असतं. यष्टिरक्षक असणं ही त्यांच्या गोलंदाजीसाठी चैनीची गोष्ट होती. कारण चेंडू क्वचित वाट चुकायचा. बॅटची कॅड चेंडूनं घेतली तरच यष्टिरक्षकाला किंचित कष्ट उपसावे लागत. एरवी चेंडू चुकला की पायचीत होणं किंवा बोल्ड होणं.

मी एकदा सचिन तेंडुलकरला विचारलं होतं, ‘‘आजच्या काळात बापू नाडकर्णी इतकी निर्धाव षटकं टाकू शकले असते का?’’ कारण आता फलंदाजांची वृत्ती वन डे आणि टी-20ने बदललीय. तो म्हणाला, ‘‘एक तर त्यांना ठोकून काढलं गेलं असतं किंवा त्यांनी पाच-सहा विकेटस् काढल्या असत्या. चेंडू सातत्याने बचावात्मक रीतीने खेळला गेला नसता.’’ खरं आहे त्याचं म्हणणं. पण हाच प्रश्न आणि उत्तर मी एकदा बापूजींना सांगितलं. ते म्हणाले, ‘‘खरंय त्याचं म्हणणं’’ आणि मग मिष्कीलपणे म्हणाले, ‘‘त्या काळातही हार्वे-ओनिल, सोबर्स-कन्हाय होते ना. आणि मी माझे डावपेचही बदलले असते.’’ खरंच मला टी-20मध्ये बापूजींनी गोलंदाजी टाकलेली पाहायला आवडलं असतं. त्या काळातही बापूजींना आक्रमक फलंदाजांशी दोन हात करावे लागत. त्यांनीच सांगितलेला एक किस्सा मला आठवतोय. त्यावेळी बापूजी इंग्लंडमध्ये कौंटीत खेळत असत. समोर एकदा ग्रॅहॅम पोलॉक आला. त्यांनी बाहेर सरसावत बापूजींना वर उचललं. सवयीप्रमाणे बापूजी ओरडले, ‘‘अप् हिम’’ चेंडू सीमापार गेला. तेव्हा त्यांच्या कौंटी कर्णधाराने सांगितलं, ‘‘ग्रॅहॅम पोलॉकच्या बाबतीत, ‘अप हिम’ म्हणजे ‘अप, अप ऍण्ड आऊट ऑफ ग्राऊंड’’. बापूजींनी दोनदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा-सहा बळी घेतले. त्या काळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे पदलालित्य बॅले डान्सरला लाजवणारं असे. फक्त वरतून चेंडू फेकून द्यायची आजची पद्धत अस्तित्वात नव्हती आणि तरीही बापूजींचा कसोटी स्ट्राइक रेट फक्त षटकामागे दोन धावा आहे. आजच्या पिढीच्या गोलंदाजांना ही परिकथा वाटेल.

फलंदाजी करताना त्यांचा पवित्रा थोडासा जास्त वाकून असल्यामुळे थोडा विचित्र, पण फटके त्यांच्याकडे सर्व होते आणि टिच्चून कसं खेळायचं याचं प्रदर्शन भरवत. एकदा ट्रुमनला षटकार ठोकल्यावर ट्रुमन त्यांना म्हणाला, ‘‘पुढल्या वेळी मांस थोडं वाढवून या.’’ पण त्यांच्या शरीरावरचं मांस कधी वाढलंच नाही. 1964 साली इंग्लंडविरुद्धची कानपूर कसोटी मी कधी विसरणार नाही. मी शाळेत होतो. पहिल्या चार कसोटी अनिर्णीत राहिल्या. पाचव्या कसोटीत टायगर पतौडीने इंग्लंडला टॉस जिंकून फलंदाजी दिली. त्यांनी डोंगर रचला. त्यासमोर हिंदुस्थानी संघ कोसळला. बापूजी खालच्या क्रमांकावर येऊन 52 नाबाद राहिले. त्याआधी त्यांनी 57 षटकं टाकली होती आणि 121 धावा देऊन 2 बळी घेतले होते. फॉलोऑन दिल्यावर बापूजींना पतौडीने तिसऱया क्रमांकावर पाठवले. बापूजींनी 418 मिनिटं किल्ला लढवला आणि नाबाद 122 धावा केल्या. त्यानंतर जमिनीला चिकटून राहण्याच्या बाबतीत घोरपडीच्या राज्यात बापू नाडकर्णींचं उदाहरण दिलं जाऊ लागलं. त्यावेळी माझा वर्गमित्र म्हापसेकरला सरांनी वर्गाबाहेर उभं केलं की तो समोरच्या नरेन ताम्हाणेंच्या खिडकीखाली जाऊन कॉमेंट्री ऐकायचा आणि तास संपल्यावर आत परत येऊन एकच गोष्ट सांगायचा ‘‘अजून बापू नाडकर्णी खेळतायत.’’ म्हणजे हिंदुस्थानी संघाचा श्वास अजून सुरू आहे. ही मॅच अनिर्णीत राहिली याचं सर्व श्रेय फक्त बापूजींना जातं.

बापूजी मूळचे नाशिकचे. त्यांचा खेळ बहरला पुण्यात. पण आजच्या पिढीसाठी बापूजींची एक गोष्ट सांगितली पाहिजे. त्यांचे सर्व खेळांमधले प्रावीण्य अफलातून होतं. खो-खो, लंगडी, आटय़ापाटय़ामध्ये त्यांनी शाळेचं प्रतिनिधित्व केलं. टेबल टेनिस, टेनिसमध्ये त्यांनी कॉलेजचं प्रतिनिधित्व केलं. बॅडमिंटन ते हिंदुस्थानी स्तरावर खेळले आणि क्रिकेट थेट देशासाठी. ‘‘दोन ‘अर्धांगिनी’ नकोत. एकाची निवड कर. बॅडमिंटन किंवा क्रिकेट’’ असं प्रोफेसर देवधरांनी सांगितल्यावर त्यांनी क्रिकेट निवडलं. पण बॅडमिंटनने त्यांना ‘अर्धांगिनी’ मिळवून दिली. आमच्या पुष्पावैनी. त्यांच्या बॅडमिंटनच्या डबल्समधल्या पार्टनर. आणि हे सर्व करताना त्यांनी गणितात इंटरमध्ये दोनशेपैकी दोनशे गुण मिळवले. गोलंदाजीतल्या त्या अचूकतेचं त्यांचं गणित का चुकलं नाही याचं मर्म यात सापडेल.

त्यांनी महाराष्ट्र आणि पुढे मुंबईसाठी खेळताना प्रचंड कामगिरी केली. कसोटी क्रिकेट त्यावेळी खडतर होतं. पाहा ना, 1955-56 साली पहिली कसोटी ते खेळले. नाबाद 68 धावा केल्या. 57 षटकं टाकली. तरी त्यांना वगळलं गेलं. पुढची कसोटी थेट तीन वर्षांनी! परफॉर्मन्स देऊनही बचावात्मक या सबबीखाली टायगर पतौडीकडून त्यांच्यावर अन्याय झाला. पण शेवटी 1968 साली पतौडीच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनला त्यांनी 43 धावांत 6 बळी घेतले. कसोटी जिंकून दिली आणि ते निवृत्त झाले. आणि पतौडीच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, ‘‘का? का? निवृत्त होतोयस?’’

त्यानंतर त्यांची दुसरी खेळी सुरू झाली. मॅनेजर, कोच, निवड समिती अध्यक्ष वगैरे! त्यावेळी त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली. तोपर्यंत मी दुरून शाळेच्या अर्ध्या चड्डीतून त्यांना मैदानावरच पाहत होतो. मैदानाबाहेरचे बापू अत्यंत सुसंस्कृत होते. त्यांच्यावर टीका करण्याचे प्रसंग आले. तेव्हा तेच मला म्हणत, ‘‘बेटा, ते तुझं काम आहे. तू ते निष्ठsने करायला हवे. त्यात मैत्रीचा प्रश्न कुठे येतो?’’ मला प्रश्न पडे, त्यांना राग येतो की नाही. मी एकदा त्यांना विचारलं की, ‘‘विजय मांजरेकरांनी असं म्हटलं की, ज्या दिवशी बापूजी चेंडू वळवतील त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्यावी.’’ कुंबळेप्रमाणे ते चेंडू जास्त वळवत नाहीत असा त्यांच्यावर आरोप होता. ‘‘अरे, त्या विजयचा स्वभाव गमत्या होता.’’ हे त्यांनी मला हसत सांगितलं. चिडणं नाही, राग नाही. काही नाही. जणू बुद्धाने डोक्यावर हात ठेवला. ज्या ग्रिफिथच्या चेंडूने नरी कॉण्ट्रक्टरचं डोकं फुटलं त्या स्पेलची आठवण सांगताना ते म्हणत, ‘‘मी माझ्या वडिलांना पत्रात लिहिलं की, आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळताना आपण मरू शकतो याची मला जाणीव झाली.’’ ते उत्तम वक्ते होते. क्रिकेटच्या कुठल्याही समारंभात ते मुद्देसूद बोलत. ते उत्तम श्रोते होते. शास्त्राrय संगीताची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचं वाचन उत्तम होतं. एक सुसंस्कृत आयुष्य ते जगले. त्यांना मुलगा नव्हता; पण विजय खरेंनी त्यांच्या जावयाने ती त्रुटी दूर केली. आपल्या आईवडिलांना सांभाळावं तसं त्यांनी बापूंना त्यांच्या शेवटच्या आयुष्यात सांभाळलं. त्यांचा मला फोन आला, तेव्हा माझ्या सांगितिक कार्यक्रमाला त्यांना यायचंय वगैरे वाटलं. पण तो फोन वाईट बातमीचा होता. एक उत्तम क्रिकेटपटू, एक सुसंस्कृत माणूस आपल्यातून निघून गेला हे सांगणारा तो फोन होता. मृत्यूने आपलं भावविश्व ओरबाडून नेलं.

आपली प्रतिक्रिया द्या