मुद्दा – भिक्षा मागणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे

>> दादासाहेब येंधे

सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी आपल्या आजारपणाचे किंवा असहायतेचे प्रदर्शन करून पैसे किंवा अन्न यासारख्या वस्तूंसाठी याचना करताना कित्येक भिकारी आपल्याला दिसून येतात. गेल्या शंभर, दीडशे वर्षांमध्ये हिंदुस्थानातील औद्योगिकीकरणानंतर विविध स्तरांवर स्थित्यंतरे घडू लागली व त्याचा परिणाम म्हणजे सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात भासू लागल्या. त्यात भिकाऱ्यांचा प्रश्न हा नागरी समस्या म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे.

दारिदय़, बेरोजगारी, कौटुंबिक कलह, वृद्धांची आबाळ, घटस्फोट यांसारखी कौटुंबिक करणे तर शारीरिक व मानसिक अपंगत्व, कुष्ठरोग, अर्धांगवायू यांसारखे दीर्घकाळ परिणाम करणारे आजार यासारखी जैविक कारणे माणसांना भीक मागण्यास प्रवृत्त करतात. याशिवाय काहींचा हा कौटुंबिक व्यवसायही असतो. लहान मुले, महिलांना बळजबरीने शारीरिक, मानसिक त्रास देऊन किंवा अपंग करून भीक मागण्यास रस्त्यावर बसविले जाते. याशिवाय देशातील विविध रेल्वे स्थानके, मठ, देऊळ, मशिदी, स्मशानभूमी, धार्मिक तीर्थक्षेत्रे या ठिकाणीही भीक मागून गुजराण करणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येते.

सध्या मोठ्या प्रमाणात असलेले भिकाऱ्यांचे अस्तित्वच अनेक प्रकारे उपद्रवी ठरत आहे. त्यांच्या वास्तव्यामुळे पाण्याचे, हवेचे व परिसराचे प्रदूषण होऊन श्वसनाचे आजर, त्वचेचे रोग, साथींचे रोग यांचा प्रसार होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर चोऱ्या, जुगार, मारामाऱ्या व लैंगिक गुह्यांना पोषक अशी पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे त्या त्या भागातील सुरक्षिततेला त्यामुळे धोका निर्माण होतो असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या रेल्वे स्थानक हे भिकाऱ्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणून पुढे येत आहे. देशभरातील असंख्य रेल्वे स्थानकांवर, स्थानकाच्या बाहेरील बाजूस हजारो भिकारी वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे. त्यांना ऊन, पाऊस, थंडी यापासून मोफत संरक्षण देणारी रेल्वे स्थानके जणू त्यांच्यासाठी हक्कांची घरेच बनू पाहत आहेत. तसेच त्यांच्या मनात येईल तेव्हा ते विनातिकीट एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनकडे रेल्वेने मोफत प्रवासही करीत असतात. बरेचसे मठ, मंदिराबाहेरही भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना अन्न, पैसे देऊन गुन्हेगारी कृत्यासाठी वापरले जात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.  मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पाकीटमारी किंवा चोरी करणाऱ्या मुलांचा याच पद्धतीने वापर केला जात असल्याची उदाहरणे आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की, कित्येक भिकारी, गर्दुले भीक मागत असताना मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये चढून महिलांकडे एकटक पाहणे, अंगविक्षेप करणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांवर त्यांची एवढी भीती बसली आहे की, महिला प्रवासी महिला डब्यांतून प्रवास करताना कचरतात. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी मुंबईत लोकलने प्रवास करताना प्रवाशांना दिलासा देण्याचे काम पोलीस करतात. प्रत्येक महिला डब्यात एक-एक पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

रेल्वे डब्यांत, रेल्वे स्थानकांवर, स्थानकाबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या भिकाऱ्यांना पकडून त्यांना दंड किंवा शिक्षा करण्यापेक्षा त्यांचे पुनर्वसन करावे. 1 ते 18 वयोगटातील भिकाऱ्यांची मुक्तता करून त्यांना निवारा आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी संस्थांची मदत घ्यावी. 18ते 60 या वयोगटातील काम करण्याची क्षमता असणाऱ्या भिकाऱ्यांना कामासाठी प्रवृत्त केले जाणे गरजेचे आहे. तर 60 वर्षांच्या पुढील भिकाऱ्यांना विविध एनजीओंच्या मदतीने अनाथाश्रमात सोडण्यात यावे.

भिकाऱ्यांचे पुनर्वसन करताना सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे ते म्हणजे त्यांची मानसिकता बदलणे. कारण काही कारण नसताना भीक मागून त्यांना आयते पैसे मिळत असल्याने किंवा परिस्थितीपुढे हतबल होऊन बहुतांश भिकारी हा भीक मागणे सोडण्यास तयार नसतात. त्याकरिता विविध सामाजिक संस्थांना पोलिसांनी संपर्क करून त्यांच्यामार्फत भिकाऱ्यांचे समुपदेशन व्हावे. रस्त्यावर कुणी असहाय्य चेहरा समोर करून भीक मागण्यास आला असता भिकेपोटी त्यांना पैसे किंवा काही वस्तू देण्यापेक्षा पोलिसांमार्फत त्यांना सुधारगृहात पाठवावे. रस्त्यावर भीक मागणे सोडून ते सुधारगृहात गेले तर खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांच्याही शिक्षणाची सोय होईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या