माझ्या मित्राची बायको – सौ. बेला केदार शिंदे

4255

>> वरद चव्हाण, [email protected]

सौ. बेला केदार शिंदे. केदार आज यशस्वी दिग्दर्शक आहे. पण त्याच्या यशात बेलाचा वाटा सिंहाचा आहे. नवऱ्याचे करियर सांभाळून तिने स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व राखले आहे.

नमस्कार! गेले वर्षभर तुम्हाला भरपूर फिटनेसच्या टिप्स दिल्या. आजपासून एक नवी सुरुवात करतोय. आपण सगळेच लोकप्रिय झालेल्या कलाकारांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना ओळखतो, पण त्यांच्या यशामागे किंवा अडचणीच्या काळात त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. पहिला लेख कोणावर लिहावा? असा विचार करीत असताना मला एका अशा दिग्दर्शकाच्या पत्नीची आठवण झाली ज्यांच्याबरोबर रक्ताचे नाते नसले तरी ते आमच्या प्रत्येक सुखदुःखात आमच्याबरोबर होते. लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे आणि मी माझा पहिला लेख बेला केदार शिंदे यांच्यावर लिहायचे ठरवले.  ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राला अनेक सुपरस्टार्स दिले, पण याच कार्यक्रमांनी केदारदाला त्याची लाईफ पार्टनरसुद्धा मिळवून दिली. बेलाताई दहावीच्या व्हेकेशनमध्ये लोकधाराच्या तालमीसाठी गेल्या होत्या. तिकडेच दोघांची पहिल्यांदा भेट झाली. अर्थात मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्यासाठी बराच काळ लागला. केदारदांनी प्रपोज तर केलं, पण होकार 2 वर्षांनंतर मिळाला. दोघांच्या लग्नाला बेलाताईंच्या घरातून विरोध होता, पण अशावेळी केदारदाचे दोन असे मित्र त्यांच्या कामी आले, ते दोन मित्र म्हणजे अर्थातच भरत जाधव व अंकुश चौधरी आणि साबळे कुटुंबीयांनी मिळून केदारदा व बेलाताईंचं लग्न लावून दिलं. कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं खरं, पण आता हे लग्न यशस्वीपणे टिकवण्याची मोठी जबाबदारी या दोघांवरही होती.  केदार हा तेव्हा त्याच्या आजोबांकडे (शाहीर साबळे) राहत होता. संसारासाठी स्वतःचं हक्काचं असं घर नव्हतं. तेव्हा बेलाताईंनी एक प्रेमाचा शाब्दिक चिमटा काढला. त्या केदारदाला म्हणाल्या की, किती दिवस आजोबांचं नाव वापरणार आहेस? तुला एकांकिकेत पारितोषिके मिळत आहेत, तुझ्यात पोटेन्शियल आहे, मी (बेला) स्वतः अभिनय करून संसारासाठी नोकरीसुद्धा करते, पण आता केदार शिंदे हे नावसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे. केदारदाला बायकोचे एवढेच शब्द पुरेसे होते. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक कामात स्वतःला झोकून दिलं. मालिका, चित्रपटांसारखी नवीन माध्यमे शिकत गेला. बेलाताईसुद्धा काम आणि नोकरी सांभाळत होती. आणि केदारदा – बेलाताईंच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली ती त्यांची कन्या ‘सना’च्या रूपाने. सुरुवातीची काही वर्षे बेलाताईंनी सनाला गिरगाव म्हणजेच त्यांच्या माहेरी ठेवून नाटकाचे दौरे आणि नोकरी केली, पण एक वेळ आली जेव्हा सनासाठी व नवीन घराकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी बेलाताईंनी अभिनय व नोकरी सोडायची ठरवले.  ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेची निर्मिती करायचे ठरवले. बेलाताईंनी मालिकेची संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायचं ठरवलं. कर्ज काढलं आणि बेलाताई एक निर्माती म्हणून मैदानात उतरली. आणि तिची पहिलीच मालिका ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ अत्यंत लोकप्रिय झाली, या मालिकेनंतर बेलाताईंनी ‘जत्रा’ चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले. पण जे आर्थिक यश ‘टिपरे’ला मिळालं ते ‘जत्रा’ला मिळाले नाही. या कठीण प्रसंगात बेलाताई व केदारदा दोघंच एकमेकांचा आधार होते. दोघंही आर्थिक त्रुटीतून बाहेर आले व एक नवा प्रयोग करायचे ठरवले.  बेलाताईंनी सिद्धार्थ जाधवच्या ‘गेला उडत’ या नाटकाची निर्मिती केली. अर्थातच नाटक हे क्षेत्र चित्रपट व मालिकेपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे बेलाताईंना पुन्हा सगळं शून्यापासून शिकावं लागलं. निर्माती म्हणून नाटक, मालिका व चित्रपट या तिन्हीपैकी जरी तिला चित्रपटात लॉस झाला असला तरीसुद्धा एका चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया तिला जास्त भावली आणि ती लवकरच अजून एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. लग्नानंतर फक्त एक रीत म्हणून केदारदाने बेलाताईंचं नाव बदलून सुखदा ठेवलं, पण हे नाव फक्त घरापुरतंच राहिलं. अजूनही तिने तेच माहेरचं नाव लावणंच पसंत केलं. आज जरी लोकांना तिचं केदारदाच्या कामात एक निर्माती म्हणून असलेला सहभाग माहीत नसला तरी जेव्हा तिला सौ. केदार शिंदे  म्हणून ओळखतात तेव्हा तिला त्याचा अतिशय अभिमान वाटतो. घर, सना व केदारदाचं करीअर यापैकी कशाला प्राधान्य देशील असं विचारल्यावर तिचं उत्तर होतं की, पहिले केदारचे करीअर आणि सना, मग घर. या दोघांना मी शाळेत असल्यापासून ओळखतो. दोघांना इतकी वर्षे बघून मी एवढंच सांगेन की, लग्न यशस्वी होण्यासाठी ना पत्रिकेची गरज असते ना लग्नाच्या मुहूर्ताची, ना दोघांनी पत्रिका बघून प्रेम केलं आणि कोर्ट मॅरेज केल्यामुळे मुहूर्ताचा प्रश्नच नाही. कसा वाटला आजचा लेख? मला कळवायला विसरू नका

आपली प्रतिक्रिया द्या