
>> डॉ. समिरा गुजर जोशी
संस्कृत साहित्यातील ‘बृहऋयी’ (कालिदास, भारवी, माघ) मधील एक प्रमुख कवी माघ त्यांच्या ‘शिशुपालवध’ या एकमेव महाकाव्यासाठी प्रसिद्ध आहेत. सातव्या शतकातील या कवीच्या काव्यातील उपमा आणि वर्णनामुळे त्यांना ‘घंटामाघ’ ही पदवी देण्यात आली होती. कालिदासापेक्षाही श्रेष्ठ मानल्या जाणाऱया या महाकवीच्या साहित्याचे हे रसग्रहण.
‘शिशुपालवध’ नावाचे महाकाव्य लिहिणारा महाकवी माघ हा कालिदासापेक्षाही श्रेष्ठ होता असे अनेक संस्कृत पंडितांचे मत होते. आश्चर्य वाटते ना! आता त्यांचा हा दावा योग्य आहे की नाही, हे आपण पुपाहू, पण असं मत मी कशाच्या जोरावर मांडते आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
माघाचे कौतुक करत असताना संस्कृत पंडित त्याची मुक्त कंठाने स्तुती करतात. म्हणतात –
उपमाकालिदासस्य भारवेर्थगौरवम्।
दण्डिनः पदलालित्यं माघे संति त्रयोगुणाः?
कालिदासासारखे उपमा देण्यातील कौशल्य दुर्लभ आहे. भारवीसारखे अर्थगर्भ लिहिणे, दंडीसारखे शब्दांमधील लालित्य हेही सहसा न आविशेष आहेत, पण माघाच्या ठिकाणी मात्र हे तिन्ही गुण एकवटले आहेत. म्हणजे कालिदासापेक्षाही तो काकणभर श्रेष्ठच म्हटला पाहिजे नाही का? कालिदासाशी त्याची तुलना करताना किंवा त्याला त्याच्या पंक्तीत बसवताना ‘माघे मेघे गतं वय’ असेही म्हटले जाते. म्हणजे ‘मेघदूत’ वाचताना आणि माघ वाचताना वय सरून जाते. म्हणजेच आयुष्याला एखादी कविता पुरते असं कवी वैभव जोशी म्हणतात, त्याप्रमाणे मेघदूत आणि माघाचे ‘शिशुपालवध’ समजून घेण्यात आयुष्य सरते. इतक्या त्या समृद्ध कलाकृती आहेत. आता हेही थोडे अतिशयोक्त विधान आहे, पण इतकी ज्याची मुक्त कंठाने पंडितांनी स्तुती करावी तो माघ आहे तरी कोण?
त्यानेच आपल्या काव्यात स्वतविषयी त्रोटक माहिती दिली आहे. ती पाहता त्याचा काळ सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानण्यात येतो. तो श्रीवर्मल नावच्या गुजरातच्या राजाच्या पदरी होता. याव्यतिरिक्त विशेष माहिती मिळत नाही, पण माघाविषयी एक दंतकथा मात्र आती कथा विलक्षण आहे. तर काय झाले, राजा भोजाने माघाची कीर्ती ऐकून त्याला आपल्याकडे पाहुणचारासाठी बोलावले, पण स्वत माघाचा थाटमाट पाहून मनातून राजाच दिपला होता. मग त्याने या कवीच्या पाहुणचारात काही कसूर राहू नये म्हणून स्वत चंग बांधला. मिष्टान्न, पेये यांची तर सोय उत्तम केलीच, पण ते दिवस थंडीचे असल्यामुळे मखमली रजया वगैरे शाही बंदोबस्त ठेवला, पण माघ म्हणाला – मला इथली थंडी सहन होत नाही. मला आज्ञा द्यावी. जरी माघाने बोलून दाखवले नाही तरी आपल्या व्यवस्थेत कमतरता राहिली हे राजाला जाणवले. माघानेही राजाला आपल्या घरी पाहुणचारासाठी बोलावले. राजाला फार कुतूहल वाटत होते की, या कवीच्या घरी अशी काय चोख व्यवस्था आहे की, तो शाही पाहुणचार सोडून निघाला आहे. मग राजाही त्याच्या बरोबर आला. पाहतो तो काय? माघाचे वैभव बघून राजाचेही डोळे दिपले. त्याच्याकडे थंडीचा बंदोबस्त असा होता की, राजाला वाटू लागले उन्हाळाच आहे.
पण नंतर राजाला एक रहस्य कळले. माघाच्या बाबतीत म्हणे भविष्य होते की, तो खूप वैभवाचा मालक असेल, पण त्याच्या अंतकाळी मात्र तो दारिद्रय़ात असेल आणि पायाला सूज येऊन त्याचा मृत्यू होईल. राजाचा काही यावर विश्वास बसला नाही. त्यानंतर अनेक वर्षे उलटली. एक गरीब स्त्राr राजाकडे आली. म्हणाली – माझ्याकडे हा एक श्लोक आहे हा पहा. तुम्हाला आवडला तर संपूर्ण ग्रंथ देते. मला तुम्ही योग्य तो मोबदला द्या. राजाने तो श्लोक पाहिला. श्लोकाचा अर्थ असा होता की, आता चंद्रविकासी कमळे मावळली आहेत आणि सूर्यविकासी कमळांना तजेला आहे. त्यामुळे उलूक पक्षी (घुबड) हिरमुसला तर तिकडे चक्रवाक आनंदला आहे. विधीची करणी तरी किती अद्भुत असते पहा. चंद्र मावळत आहे तर सूर्याचा उदय होतो आहे. या श्लोकाने राजा इतका भारावला. म्हणाला – हा एकच श्लोक पृथ्वीमोलाचा आहे, तर ग्रंथाचे मोल मी काय करणार? त्याने विचारले – कवीचे नाव काय? पत्नीने आपली ओळख देत सांगितले. आम्ही अगदी कंगाल आहोत. त्यातून माझ्या पतींच्या पायांना सूज आली आहे म्हणून ते घराबाहेर पडू शकत नाहीत. राजाने तिला विपुल धन दिले. आपल्याला वाटतेच ना की, ठीक आहे. सूज आली पायांना, पण मरण तरी दारिद्रय़ात येणार नाही. तर पुचा कथाभाग ऐका – माघाची पत्नी ही दानशूर होती. ती रस्त्यात भेटलेल्या याचकांना नाही म्हणू शकली नाही. धन तर असे संपलेच, पण त्याच वेळी दारात आणखी एक याचक उभा राहिला. याला द्यायला काही नाही या दुःखात माघाने प्राण सोडले. शेवटचा श्वास घेताना धन मिळवूनही तो दरिद्री होता.
ही कथा काल्पनिक असेल किंवा कदाचित त्यात थोडेसे तथ्य असेल कुणास ठाऊक, पण ती माघाविषयी मनात प्रेम उत्पन्न करते यात शंका नाही. कदाचित तो प्रचंड दानशूर असेलही. विद्वान तर तो नक्कीच होता. कसा ते पुढच्या लेखात पाहू.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)























































