ठसा – भाई मळेकर

1582

>> अरुण मळेकर

गेल्या शतकातील 60 च्या दशकापर्यंत असंख्य संस्कारक्षम विद्यार्थी घडवताना आपल्या पंचक्रोशीत महात्मा गांधींच्या विचारसरणीनुसार हाती सेवादीप घेऊन क्रतस्थपणे काम करणाऱयांपैकी स्व. भाई मळेकर म्हणजे तसे एकांडी शिलेदार होते. महात्मा गांधींच्या सहवासाचा परिसस्पर्श त्यांना लाभला. प्रख्यात बोर्डीच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले भाई मळेकर म्हणजे अनेक चेहऱयांचे अजब रसायन होते. शिक्षक असलेले भाई पत्रकार होते, कवी होते, अमोघ वक्तृत्वाचे फर्डे वक्ते होते आणि हेन्स ऍण्डरसनचा वारसा चालवत विद्यार्थ्यांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे त्यांचे पालकही होतेच.

भाईंचं खरं नाव गजानन महादेव मळेकर, परंतु बोर्डीच्या एस.पी.एच. विद्यालयासह पंचक्रोशीत भाई म्हणून ते सर्वश्रुत होते. त्या काळी बोर्डीच्या शाळेत शिक्षकांना ‘सर’ म्हणून संबोधण्याची पद्धत नव्हती. आप्पा, भाऊ, तात्या, नाना, भाई या नावांनी शिक्षक ओळखले जात. भाईंच्या बालवयातच वनक्षेत्रपाल असलेल्या पित्याचे छत्र गमावलेल्या कै. भाईंचे शालेय शिक्षण डहाणू मुक्कामी तर मॅट्रिक होण्यासाठी ते बोर्डी शाळेत 1922 मध्ये आले ते परिक्षेत्राचे सगेसोयरेच होऊन गेले. त्यापूर्वी त्यांच्या अल्पशिक्षित करारी मातोश्री सरस्वतीबाई, पितृतुल्य कीर्तने वकील आणि मसूरकर महाराज यांनी त्यांची जडणघडण केलीच होती. घोलवड – बोर्डीच्या परिसरासह त्यांचे शिक्षक आ. भिसे, चित्रेसर, आत्मारामपंत सावे यांनी मोहित केल्यावर त्याच एस.पी.एच. विद्यालयात शिक्षक म्हणून ते रुजू झाले. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीत भाईंचे समकालीन धडपडत होते. अशावेळी भाई त्यांच्या स्वधर्मानुसार शिक्षक झाले.

शाळेच्या शारदाश्रम वसतिगृहातील मुलांना भाईंचा आधार वाटायचा. शिक्षकी पेशासाठी कोणतीच पदवी नसताना बालमानसशास्त्र उत्तम जाणणाऱया भाईंवर गांधींच्या हृदयपरिवर्तन शासन पद्धतीचा पगडा होता.

गांधींच्या विचारसरणीने मोहित झालेल्या भाईंना साबरमती आश्रमाची ओढ लागणं स्वाभाविक होतं. भिसे सर, ए. व्ही. सावे सरांच्या परवानगीसह शुभेच्छांचे पाठबळ घेऊन अखेर भाई साबरमती आश्रमात दाखल झाले. तेथील 1927 ते 1929 या काळातील गांधींच्या सहवासाने त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली. या काळात गांधींची जीवनशैली अनुभवताना त्या युगपुरुषाची वाणी जीवाचा कान करून ऐकली. भाई तेथून परतले ते गांधींना दिलेल्या वचनपूर्तीसाठी ‘घोलवड-बोर्डी परिसरात मी अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन करून शंभर खादीधारी माणसेही तयार करीन.’ भाई स्वतः खादीधारी होते आणि अस्पृश्यता मानणारे नव्हतेच. घोलवड-बोर्डी परिसरात अस्पृश्यता उच्चाटनाची मोहीम राबवताना त्यांचे स्नेही वा. रा. ऊर्फ बापू अमृते यांचे योगदान वादातीत आहे.

भाषाप्रभू भाई सिद्धहस्त लेखकही होते. भाईंच्या ललित लेखनावर रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा प्रभाव होता. त्यांचा ‘अंजली’ हा काव्यसंग्रह त्याचाच परिपाक असून भाई मळेकर हे व्यक्तिमत्त्व समजावून घ्यायला हा ग्रंथ खूप बोलका आहे.
आयुष्याच्या अखेरपर्यंत भाईंना शाळेचाच ध्यास होता. ब्रेन हॅमरेजने’ शेवटच्या गंभीर आजारपणातही काही क्षण शुद्धीवर आल्यावर शाळा, विद्यार्थ्यांबद्दलच ते बोलत होते. कुटुंबीयांसाठी भविष्याकरिता काहीतरी तरतूद करून ठेवण्याचा व्यवहारीपणा भाईंकडे नव्हता. कारण आयुष्यभर ते क्रतस्थ – निर्मोहीपणेच काम करीत राहिले आणि त्याच एकाकी भणंग अवस्थेत वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याला आता सहा दशकांचा काळ लोटल्यावरही भाई मळेकरांविषयी असलेली आस्था कायमच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या