ऑस्करप्राप्त वेशभूषाकार

>> दिलीप जोशी

1980 मधली गोष्ट. आम्ही काही पत्रकार मित्र दिल्ली, आग्रा पाहण्यासाठी ट्रिपला निघालो होतो. बहुदा दुपारच्या वेळेला मुंबई सेंट्रल स्टेशनवरून सुटणाऱया पश्चिम एक्प्रेसने जायचे होते. आम्ही थोडा वेळ आधी स्टेशनवर पोहोचलो, तर तिथे बराच बंदोबस्त दिसत होता. स्टेशनच्या एका प्लॅटफॉर्मवर एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. रेल्वेच्या पुलावर थांबून लोक खालचं दृश्य बघत होते. आम्हीही काही काळ थबकलो. कुठला सिनेमा? मग कळलं की, सर रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपटाचं दृश्य तिथं घेतलं जात होतं. साधारण एकोणीसशे तीसच्या दरम्यान आपल्या रेल्वेकडे असतील असे ट्रेनचे डबे प्लॅटफॉर्मजवळ उभे होते. चित्रीकरणाचा सारा संच मोठमोठय़ा कॅमेऱयांसह होताच. गांधीजी त्या ट्रेनने मुंबईहून जातायत असं बहुधा चित्रण असावं. कारण त्यांचे गुरू गोखले यांनी त्यांना ट्रेनने फिरून देश पाहायला सांगितले होते. त्यांच्या भेटीनंतर ती ट्रेन चित्रपटात दिसते.

तिथे दिग्दर्शक ऍटनबरो आणि गांधीजींचं काम करणारे अभिनेते बेन किंग्जले होतेच. किंग्जले अर्थातच गांधीजींच्या सर्व जगाला परिचित असणाऱया वेशात होते. किंग्जले खरोखर गांधीजींसारखे दिसत होते. त्यांच्या त्या विशिष्ट वेशभूषेचं डिझाइन भानू अथैया यांचं होतं. खरं तर एकूणच चित्रपटाचं ‘कॉस्च्यूम डिझायनिंग’ त्यांनी केलं होतं. त्यावेळी त्या दृश्यात पुढे काय घडलं ते पाहण्यासाठी आम्ही थांबू शकलो नाही. कारण आमच्या ट्रेनचीही वेळ झाली होती.

अतिशय भव्य निर्मिती असलेला ‘गांधी’ चित्रपट जगभर गाजला. 1980च्या दशकातल्या नव्या पिढीला गांधीजी नव्याने समजले. जुन्या पिढय़ांपैकी ज्यांनी त्यांना पाहिलं होतं, त्यांच्या पूर्वस्मृती जाग्या झाल्या. या चित्रपटाला हॉलीवूडमधलं प्रतिष्ठत ‘ऍकॅडमी ऍवॉर्ड’ किंवा ‘ऑस्कर’ प्राप्त झालं. 1983 मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक ऍटनबरो यांना उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी, बेन किंग्जले यांना उत्तम अभिनयासाठी, जॉन ब्रिटली यांना उत्कृष्ट पटकथेसाठी आणि उत्कृष्ट कॉस्च्यूम डिझायनिंग किंवा वेशभूषेसाठी भानू अथैया यांना ‘ऑस्कर’ सन्मान लाभला. याशिवाय या चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. आजही हा चित्रपट जगात आवडीने पाहिला जातो.

चित्रपटाच्या वेशभूषेसाठी ज्यांना ऑस्कर मिळालं त्या भानू अथैया म्ह्णजे मूळच्या कोल्हापूरच्या भानुमती राजोपाध्ये. एखाद्या हिंदुस्थानी आणि मराठी व्यक्तीला ऑस्कर मिळण्याचा तो अद्वितीय क्षण होता.

गणपतराव (अण्णासाहेब) राजोपाध्ये हे भानुमतीचे वडील. ते चित्रकार होते. त्यामुळे या कलेचा वारसा त्यांना लाभला होताच. तो त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अधिक समृद्ध केला. त्या मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयात शिकल्या. नंतर एका इंग्लिश साप्ताहिकासाठी चित्रं काढू लागल्या. वेशभूषेबाबत त्यांचे विचार त्यांनीच म्हटल्यानुसार ‘फॅशन डिझायनिंग’चे नव्हे तर कॉस्च्यूम डिझायनिंगचे होते. हळूहळू तशी संधी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मिळाली आणि शंभरहून अधिक हिंदी सिनेमांमधील वेशभूषा त्यांनी 1956 ते 2015 या काळात प्रत्ययकारीपणे घडवली. गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’, ‘साहब बीबी और गुलाम’, ‘कागज के फूल’, ‘आम्रपाली’ अशा चित्रपटांपासून ते देव आनंदचा ‘गाईड’ आणि आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ अशा कित्येत चित्रपटांमधली अत्यंत अचूक आणि वेधक वेशभूषा भानू अथैया यांच्या कल्पनेतून साकारलेली होती. राज कपूर, यश चोप्रा यांच्या चित्रपटांसाठीही त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपटाची वेशभूषा भानू अथैया यांनीच साकारली होती.

विविध क्षेत्रांतील अनेक मराठी प्रतिभावंतांना जागतिक कीर्ती आणि सन्मान लाभले. साहित्य, क्रीडा, संगीत, चित्रकला, विज्ञान आणि अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये मराठी माणसं तेजाने तळपली. मात्र ‘ऑस्कर’ मिळालेली एकमेव मराठी व्यक्ती म्हणजे भानू अथैया. 15 ऑक्टोबरला वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘कागज के फूल’ मधला गुरुदत्त यांचा सर्वस्व हरवलेल्या सिने दिग्दर्शकाची अखेर होते तो सीन आठवला. वृद्ध दिग्दर्शक (गुरुदत्त) हळूहळू अखेरच्या क्षणी दिग्दर्शकाच्याच खुर्चीत येऊन बसतो. या हृदयस्पर्शी दृश्यातलं त्यांचं ते तरुण वयातलं वृद्ध रूप ही भानुताईंच्या वेशभूषेचीही कमाल. तीच गोष्ट ‘साहब बीबी और गुलाम’ यांच्या बंगालीच वाटलेल्या भूमिकांच्या वेशभूषेची.

‘गांधी’ किंवा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशा चरित्रपटांची वेशभूषा तर अधिक आव्हानात्मक. कारण या महान व्यक्तींना सारं जग आधीपासूनच ओळखत होतं. भानू अथैया यांनी या चित्रपटांमधून त्यांना पुन्हा पडद्यावरून जगासमोर आणताना वेशभूषाकार म्हणून खूप विचार केला. ‘ऑस्कर’ ही त्या कलाविष्काराचीच पावती. त्यांना विनम्र आदरांजली.

आपली प्रतिक्रिया द्या