आभाळमाया – कृष्णविवराची ‘करामत’!

606

>> दिलीप जोशी

अवकाशातील ग्रह-ताऱयांची जत्रा, नुसत्या डोळय़ांनी छान दिसते. सध्याचा मोसम तर आकाश दर्शनाचाच आहे. त्यामुळे शक्य तेव्हा, शक्य तिथे आपलं ‘विश्वरूप दर्शन’ जरूर घ्या. ग्रहताऱयांच्या बाबतीत सांगायचं तर सूर्याभोवतीचे सारे ग्रह आपले कुटुंबीयच. त्यामुळे सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेली पृथ्वी किंवा आपल्या सूर्यमालेतील शेवटचा ग्रह चार अब्ज किलोमीटर असलेला नेपच्यून या सर्वांची एकच ‘फॅमिली’. त्यापलीकडे कुठे ग्रह असतील तर ते सूर्याव्यतिरिक्त परताऱयाभोवती फिरणारे असणार. असाच एक अगदी जवळचा परतारा म्हणजे प्रॉग्झिमा सेन्टॉरी. तो आपल्यापासून फक्त! साडेचार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. त्याच्याभोवती ‘हॅबिटेबल’ ग्रहमाला किंवा ग्रह सापडलेला नाही. आपल्या एका आकाशगंगेतच 200 अब्ज तारे. तेव्हा त्यातल्या किमान 10 हजार ताऱयांभोवती तरी ग्रहमाला असण्याची शक्यता जास्त आहे.

आपल्या आकाशगंगा दीर्घिकेच्या (गॅलॅक्सी) केंद्रस्थान एक महाकृष्णविवर आहे. धनु राशीच्या पार्श्वभूमीवर आकाशगंगेचे केंद्र असून या केंद्राभोवती आपली सूर्यमाला 25 कोटी वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करते. ग्रह-तारे, कृष्णविवर यांच्यात सतत वेगवान घडामोडी सुरू असतात. आपलं विश्वसुद्धा प्रसरणशील असण्याचं बिग बॅन्ग (महाप्रसारण) सिद्धांतानंतर लक्षात आलं. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

ब्लॅक होल किंवा कृष्णविवर कधी तयार होतं? प्रत्येक ताऱयाचा जीवनकाळ त्याच्या वस्तुमानावर (त्यातील द्रव्यावर) ठरलेला असतो. आपल्या सूर्याचं जीवनमान सुमारे 10 अब्ज वर्षांचं. त्यापैकी 5 अब्ज संपली. कालांतराने आपला सूर्य म्हातारा म्हणजे ‘महातारा’ होईल. त्याच्या आकारमानात प्रचंड वाढ होत जाईल. इतकी की मंगळापर्यंतचे ग्रह (पृथ्वीसकट) तो गिळून टाकेल. सरतेशेवटी त्याचं श्वेतखुजा किंवा व्हाईट ड्वार्फमध्ये रूपांतर होईल. आपल्या सूर्याच्या अंतानंतर त्यांच्या अवशेषाचं वस्तुमान जेवढं उरेल त्याच्या 1.4 पेक्षा जास्त वस्तुमान शिल्लक राहणाऱया ताऱयाचं रूपांतर त्याच्या अंतानंतर ‘न्यूट्रॉन स्टार’मध्ये होतं असा सिद्धांत चंद्रशेखर वेंकटरमण यांनी मांडला. ते सर सी. व्ही. रामन यांचे पुतणे. योगायोगाने दोघांनाही भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालं. चंद्रशेखर पुढे अमेरिकेत स्थायिक झाले. नोबेल मिळाल्यानंतर ते हिंदुस्थानात आले होते तेव्हा त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण ऐकण्याचा योग अनेकांना आला.

एखाद्या ताऱयाचं अखेर झाल्यावरचं वस्तुमान (आपल्या सूर्याच्या तुलनेत) 3.4 पेक्षा अधिक असेल तर त्याचं ब्लॅक होल किंवा कृष्णविवरात रूपांतर होते हे आजच्या पिढीला विज्ञानात शिकवलं जातं. कृष्णविवर दिसत नाही. कारण ते आसपासचा प्रकाशही ‘गिळतं’. त्यामुळे काही ताऱयांच्यामध्ये जिथे नुसतेच काळे भाग दिसले. तेथील प्रचंड गुरुत्वाकर्षणाचे रहस्य उलगडताना कृष्णविवराचा शोध लागला. 1916 मध्ये आइन्स्टाइन यांनी कृष्णविवरांच्या सम्मीलनातून वस्तुमान बाहेर पडतं ते गुरुत्वीय लहरी किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्हज्च्या स्वरूपात असतं असा सिद्धांत मांडला. अमेरिकेतील ‘लायगो’ प्रकल्पाने जगभरातील वैज्ञानिकांच्या सूक्ष निरीक्षणाद्वारे 100 वर्षांनी म्हणजे 2016 मध्ये अशा ‘गुरुत्वीय लहरी’ सापडल्याचं जाहीर केलं. स्टीफन हॉकिंग यांनी तर ब्लॅक होलमधूनही बाहेर पडणाऱया प्रारणांची संकल्पना मांडली. त्याला हॉलिंग रेडिएशन म्हणतात.

एवम् गुणविशिष्ट कृष्णविवराबाबतची ताजी बातमी अशी की, आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या महाकृष्णविवराने त्याच्या कृष्ण उदरातून तारा बाहेर भिरकावला आहे. एरवी प्रकाशासह सर्व काही गिळणाऱया ब्लॅक होलची ही करामत आहे आणि आपल्या दीर्घिकेच्या केंद्रभागात असं घडलंय. या नवजात ताऱयाला संशोधकांनी एस-5 एचव्हीएस्-1 असं संशोधनात्मक नाव दिलं असून पृथ्वीपासून हा तारा आकाशगंगेचा केंद्रकाच्या दिशेने 29 हजार प्रकाशवर्षे दूर आहे. तो ग्रस किंवा क्रेन म्हणजे ‘बक’ या तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर दिसू शकेल, पण सामान्य दुर्बिणीमधून दिसणं कठीणच. मोठय़ा रेडिओ दुर्बिणींना त्याचा वेध घेता येईल. कार्नेजी विद्यापीठातल्या तिंग ली या संशोधकाने या ताऱयाचा शोध लावला असून ऑस्ट्रेलियातील ‘सदर्न स्टेलर स्ट्रीम स्पेक्ट्रोस्कोपिक सर्व्हे’ या प्रकल्पांतर्गत वापरल्या जाणाऱया दुर्बिणीद्वारे त्याचे निरीक्षण केले गेले.

हा रन-अवे स्टार एकेकाळी एका जोडताऱयाचा (व्हॅली) भाग असावा आणि हे जोडतारे ब्लॅक होलने गिळताच त्यातील एक गोफणीसारख्या केंद्रोत्सारी वेगामुळे (स्लिंग शॉटद्वारे) बाहेर फेकला गेला असावा. हे सारंच अद्भुत आहे, जे जाणण्याची बुद्धी माणसाला असणे हीच निसर्गाची केवढी मोठी देणगी!

–  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या