आभाळमाया – दक्षिण चंद्रावरचे मोठ्ठे विवर!

चंद्र आपल्या पृथ्वीच्या खूप म्हणजे खूपच जवळ आहे. रॉकेटच्या इंधनावर खर्च करण्याइतका पुरेसा निधी असला तर सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावरच्या चंद्रावर अवघ्या तीन दिवसांत पोचता येतं, हे 1969 मध्येच अमेरिकेच्या चांद्रमोहिमेने सिद्ध केलं. मग आपल्या चांद्रयानांना एकविसाव्या शतकात महिने का लागतात यावर आपण या स्तंभातून पूर्वी वाचलंय. त्याचं काय आहे की, शक्तीशाली रॉकेट आणि त्यावर खूप मोठा उपग्रह (पे-लोड) बसवून अंतराळातील विविक्षित ठिकाणी धाडणं हा प्रचंड पैशाचा खेळ आहे.

मग ज्यांच्याकडे पैसा कमी आहे त्या देशांनी काय करायचं तर त्याला अधिक तंत्रकौशल्याचा आणि धोका पत्करूनसुद्धा सुयोग्य पद्धतीचा मार्ग अवलंबवावा लागतो. आपल्या तीनही चांद्रयानांचा मार्ग असाच खडतर, पण पैशाची कमालीची बचत करणारा होता. पृथ्वीभोवती चकरा मारून अंतराळी कक्षा वाढवत नेणे आणि चंद्राभोवती फेऱ्या घेऊन वेग कमी-कमी करत उतरणे यात फार मोठी कसोटी असते. तिन्ही चांद्रयानांनी ही अवघड कसरत पार पाडली, परंतु चांद्रयान-2 चंद्रावतरणाच्या काही सेकंद आधी झालेल्या गफलतीने भरकटलं.

त्यामुळे नाऊमेद न होता, ‘इस्रो’ने पुन्हा नवा डाव मांडला आणि जिंकला. विज्ञानात, त्यातही अंतराळ विज्ञानात अपयश जमेस धरावंच लागतं. म्हणजे एखादं यान चंद्रावर सुखरूप उतरलं तरी अचानक त्यावर एखादा अशनी कोसळला तर? …तर सगळाच खेळ खल्लास! मात्र अशा संभाव्य संकटांचा अवास्तव बाऊ करून चालत नाही. अन्यथा, वैज्ञानिक प्रगतीच थांबेल.

चांद्रयान-2 ने अपेक्षित यश प्राप्त केलं. तेसुद्धा कोणत्याही देशाचं यान जिथे आजवर उतरलेलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण गोलार्धात. चंद्राचा हा आपल्याला कधीच न दिसणारा भाग चांद्रयान-3 ने पाहिला! आपल्याला दाखवला आणि नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, त्यावरच्या ‘प्रज्ञान’ रोव्हरने चंद्रावरचं सर्वात मोठं म्हणजे 160 किलोमीटर व्यासाचं विवर शोधण्याचा मान मिळवला आहे.

याआधी चंद्रावरचं सर्वात मोठं विवर मानलं जात होतं ते म्हणजे पोल एटिकन खोरं (बेसिन) हे चंद्रावरचं आतापर्यंतचं सर्वात खोल आणि प्राचीन आघात-विवर होतं. सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी हे चार ते आठ किलोमीटर खोलीचं महाविवर तयार झालं. आता चांद्रयान-3 च्या विक्रमामुळे त्याचा पहिला क्रमांक गेला.

आता चांद्रयान-3 ला सापडलेलं विवर हे या जुन्या मोठ्या विवराच्या जवळच आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरलेल्या ‘प्रज्ञान’चा हा कौतुकास्पद शोध आहे.

या विवरातील धूळ आणि खडक अभ्यासल्यावर असं लक्षात येतंय की, ते चंद्रनिर्मितीनंतर लगेचच एखाद्या प्रचंड अशनीचा (महापाषाणाचा) आघात होऊन तयार झालं असावं. ‘प्रज्ञान’ रोव्हरने घेतलेल्या ‘हाय-रेझोल्यूशन’ फोटोमधून असं जाणवतं की, यामुळे चंद्रनिर्मितीच्या काळातील त्याची भूशास्त्रीय स्थिती नेमकी कशी होती याचा अंदाज येईल. एटिकन बेसिनपासून 350 किलोमीटर अंतरावर संशोधन करताना हे प्राचीन चांद्रविवर आढळलं आहे. त्यातूनच चंद्राच्या भूगर्भीय (जिओलॉजिकल) उक्रांतीवर अधिक प्रकाश टाकू शकेल. ऐटिकन विवरानेच 1400 मीटरपर्यंत उंच कड (रिम) तयार झाली.

अहमदाबादच्या ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ने याची पुष्टी केली आहे. हा भाग अनेक खनिजांनी समृद्ध असा आहे. मात्र सर्वात मोठय़ा विवराची अब्जावधी वर्षांच्या काळात भरपूर झीज झाली असून ते बऱ्याच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं आहे. कारण चंद्रावर अशनीपाताचे प्रकार वारंवार होतात. तिथलं वातावरण खूप विरळ असण्याने छोटे-मोठे दगड-गोटेसुद्धा पृथ्वीच्या कोसळणाऱ्या अनेक (लाखो) दगडांप्रमाणे दाट वातावरणाशी घर्षण होऊन जळून न जाता थेट चांद्रपृष्ठाला धडक देतात. त्यामुळे तिथल्या भूमीवरच्या रचनेत सारखे बदल होत राहतात.

थोडक्यात काय तर आपल्या चांद्रयानाची संशोधन क्षमता ‘प्रज्ञान’च्या रूपाने चंद्रावर कार्यरत असून त्यातून आणखी काय काय शोध लागतात ते पाहायचं. हिंदुस्थान चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी तयारीत आहे. या वैज्ञानिक उपक्रमाला, आधी तिथे पोचलेल्या यानाचं संशोधन बळ आणि अर्थातच योग्य माहिती देत असतं.

एखाद्या नैसर्गिक उपग्रहाकडे किंवा ग्रहाकडे जाणाऱ्या मोहिमा आधीच्या ‘प्रोब’च्या अनुभवातून नवीन काही शिकत असतात. वैज्ञानिक प्रयोगांची एक अतूट साखळीच असते. त्यातला एखादा प्रयोग अयशस्वी झाला तरी ही साखळी तुटत नाही. उलट अपयशातूनही नवं काही शिकण्याची संधी प्राप्त होत असते. विज्ञान क्षणिक चमत्कार करत नाही, पण त्यातून जे सत्य उलगडत जातं ते अनेक ‘चमत्कारां’पेक्षा भारी असतं.

वैश्विक  

[email protected]