
>> रविप्रकाश कुलकर्णी
अनिल आप्पासाहेब परुळेकरकृत ‘काहीही होऊ शकतं’ या शीर्षकाचं हे आत्मकथन, त्यात ते म्हणतात, ‘हे लिहीत असतानाच विषय 2022 या वर्षीचं साहित्याचं नोबेल पारितोषिक अॅनी इनॉक्स या आत्मचरित्रात्मक कादंबऱया लिहिणाऱया फ्रेंच लेखिकेला जाहीर झालं आणि पांडुरंग सांगवीकराच्या तोंडून सांगितलेल्या नेमाडेंच्या जीवनकथेसारखीच माझ्या स्वतच्याच तोंडून सांगितलेल्या या जीवनकथेला आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून मान्यता मिळेल अशी आशा पल्लवित झाली.’
हे आत्मचरित्र ‘सकाळ’ प्रकाशनने प्रकाशित केलेली आहे. लेखकाचे अस्ताव्यस्त लेखन वाचल्यानंतर वाचक लेखकाच्या मताशी सहमत होणार नाहीत, मात्र ते सोडता लेखकाच्या बाबतीत काहीही होऊ शकतं. याचं कारण लेखकानेच स्वतच्या लेखनाबाबत म्हटल्याप्रमाणे, ‘तपशिलात जाण्याची लेखनशैली काहींना कंटाळवाणी वाटली असावी’ हे खरेच. मात्र स्वत लेखक त्याबाबत म्हणतो, ‘आहे तितके देवाचे!’ एकूण आयुष्याचा ताळेबंद मांडणारे हे पुस्तक आहे.
या लेखकाचा विशेष म्हणजे भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’तून ते प्रेरणा घेतात एके ठिकाणी ते म्हणतात, ‘त्या वेळी माझ्या लक्षात आलं, जसा लहानपणी प्रशस्त दिसलेला बंगला मोठेपणी प्रशस्त दिसतोच असं नसतं, तशीच लहानपणी सुंदर वाटणारी मुलगी मोठेपणी सुंदर वाटतेच असं काही नसतं.’ अशी काही मार्मिक निरीक्षणं वाचून दाद द्यावीशी वाटते. असा झकास तिरकसपणा पण दिसतो. या कथनात मला सर्वात आवडलेला भाग म्हणजे त्यांनी सांगितलेली लेखन कामगिरी. त्यांच्याच शब्दांत, ‘एका वाक्यात सांगता येऊ शकणाऱया त्या कथाबीजाचा उपयोग करून मी जवळ जवळ 200 पानं भरेल असं कथानक जुळवून आणलं होतं. देवाजीच्या कृपेने त्यालाच पुढे कादंबरी म्हणून मान्यताच नव्हे, तर पारितोषिकेही प्राप्त झाली.’
ही कादंबरी म्हणजे ‘वनराईचा धडा’. तब्बल नऊ वर्षे ही कादंबरी प्रकाशित व्हायला लागली. त्यात दिलीप माजगावकर यांच्यापासून ते पॉप्युलरच्या अस्मिता मोहिते आदी प्रकाशकांनी कसे धक्के दिले याचं वर्णन आहे. त्यानंतर लेखक 370 पानांची ‘वाहतं पाणी’ ही कादंबरी लिहितो. पुढे कोकणीत एक, इंग्रजीत एक अशी पुस्तके लिहितो. त्यांच्या कथा लक्षवेधक आहेत. एकूण लेखक आपल्या वाटचालीचा निष्कर्ष काढतो, ‘शेवटी तात्पर्य राहतं एकच, काहीही होऊ शकतं.’