
>> डॉ. वंदना बोकील–कुलकर्णी ([email protected])
समाज बदलण्यासाठी स्वतला बदलून दाखवणाऱया, कर्तृत्व गाजवून दाखवणाऱया लक्ष्मीबाई टिळकांचे ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र म्हणजे स्त्रीने कुठपासून कुठपर्यंत झेप घेतली आहे, हे समजून सांगणारे काव्यच.
मागच्या लेखात आपण बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेबद्दल जाणून घेतलं. आज त्यांच्या मैत्रिणीच्या म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्राविषयी! स्त्रियांच्या लेखनपरंपरेत खरं म्हणजे या आत्मचरित्रावर उदंड लिहिलं गेलंय. वाड्मयीनदृष्टय़ा तर ती मोलाची आहेतच. पण एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाची पहिली तीस वर्षं सामाजिक, सांस्कृतिक संदर्भांसह इतकी ठसठशीतपणे त्यातून उमटली आहेत! गंगाधर गाडगीळांनी ‘साहित्याचे मानदंड‘मध्ये त्याची ही साहित्यिक महत्ता सांगताना ‘उत्कृष्ट पाश्चात्य साहित्याशी तुलना करता येईल असे आधुनिक मराठी पुस्तक’ म्हणून त्याचा गौरव केला आहे.
1934 ते 1936 या काळात चार भागांत ते प्रथम प्रकाशित झाले. रेव्हरंड नारायण वामन टिळकांनी “माझं चरित्र लिहायचं असेल तर जसं घडलं तसं लिहा,’’ असं बजावून सांगितलं होतं. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणाऱया त्यांच्या पत्नीनं लिहिलेलं हे पुस्तक. रेव्हरंड टिळकांचं यथातथ्य चरित्र तर ते आहेच. पण त्याचबरोबर टिळकांच्या करुणावृत्तीच्या, दयाळू स्वभावाच्या आणि रसिक कवित्वाच्या सहवासाबरोबरच त्यांच्या विक्षिप्तपणाचे चटके सोसूनही त्यांच्या सहवासात फुलत गेलेल्या आणि स्वतचा विकास घडवत गेलेल्या प्रसन्न, खेळकर आणि स्वतंत्र वृत्तीच्या स्त्राrचं लोभस दर्शनही ते घडवतं. लक्ष्मीबाईंच्या शब्दांत ‘डेक्कन क्वीनच्या इंजिनाला जोडलेला खटारा’ इतकी कमालीची तफावत दोघांत असूनही त्यांच्या अनोख्या प्रेममय सहजीवनाचं हृद्य चित्रही त्यातून उमटलं आहे. पतीला परमेश्वर मानणाऱया प.भ.प. (पतीभक्तपरायण) पत्नीचं ते आत्मचरित्र नाही. भल्याभल्यांना साधत नाही ती कलात्मक अलिप्तता लक्ष्मीबाईंना सहजधर्मानं साधली आहे. प्रांजलपणा हा त्यांचा स्वभावविशेष आहे. त्यामुळेच आज 85 वर्ष होऊन गेली तरी ‘स्मृतिचित्रे’ ताजी वाटतात. आजही त्यातले अनेक प्रसंग हसवतात आणि अंतर्मुखही करतात. …..17-18 वर्षांच्या टिळकांचं 8-9 वर्षांच्या मनू गोखलेशी लग्न लागलं. ही गोष्ट 1880ची. मीठ, साखरेसारख्या वस्तूही धुऊन घेणाऱया कर्मठ नाना गोखल्यांची ही मनू पुढच्या आयुष्यात संत नवऱयाच्या पावलावर पाऊल टाकून माणूसधर्माचं पालन करणारी कशी झाली, याचा हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. रूढ अर्थानं अशिक्षित अशी ही बाई. पण विवेक, उपजत शहाणपण, आजूबाजूच्या जनव्यवहाराची उत्तम जाण तिच्या ठायी होती. तीच या लेखनाला अनमोल करते. अ-जर करते.
टिळक सतत कुठे नं कुठे निघून जात, जिकडे जातील तिकडचेच होत. त्यांचा वाटेल त्या माणसावर सहज विश्वास बसत असे. त्यामुळे फसगत होण्याचे प्रसंग सततचेच! अशा या तऱहेवाईक स्वभावाच्या पण संत वृत्तीच्या माणसाचा संसार निभावताना खटके, भांडणं यांचे प्रसंग वारंवार येत असत. त्याबद्दल लक्ष्मीबाई फार निर्मळपणे लिहितात.लक्ष्मीबाई म्हणतात, “टिळकांच्या या सद्गुणाला त्यांच्याच सहवासामुळे माझ्या संशयी वृत्तीचा ब्रेक उत्पन्न झाला. त्यांचा एखाद्या माणसावर विश्वास बसला की माझा हटकून त्याच्यावर अविश्वास ठेवलेला! ह्यावरून आमचे नेहमी खटके उडायचे… टिळकांना भय असे कोणाचेच वाटत नसे… जर काही भय त्यांच्या हृदयात असेल तर ते देवाचे व त्याच्या खालोखाल माझे!’’
लक्ष्मीबाई आपल्या पतीच्या मागे सावलीसारख्या गेल्या हे खरे असले तरी मेल्या मनाने नाही गेल्या. वेळप्रसंगी त्यांच्याशी भांडून स्वतचे म्हणणे त्यांनी टिळकांना ऐकवले. टिळकांच्या स्वभावाचे, वृत्तीचे, अव्यवहारीपणाचे अनेक भलेबुरे पैलू त्या ज्या सहजतेने दाखवून देतात, ते वाचलं की एकीकडे त्यांच्या जीवनसंघर्षाची कल्पना येऊन जीव गलबलून जावा आणि त्याच वेळी तल्लख विनोदबुद्धी, मूळचा आनंदी आणि खेळकर स्वभाव यांमुळे असे प्रसंग त्या ज्या खुमासदारपणे कथन करतात, त्याची जाणीव होऊन बाईंविषयी कौतुक दाटून यावं, असं या पुस्तकाच्या वाचनात पानोपानी घडतं. असं लिहू शकणाऱया या बाईचा मोठेपणा दर वाचनात नव्यानं जाणवतो.
म्हणून ‘स्मृतिचित्रे’ वाचण्याचा कलात्मक आनंद तर घेऊच. पण हेही समजून घेऊ की 1873मध्ये जन्मलेली एक स्त्राr कर्मठपणाच्या कोषातून बाहेर पडून मानवी करुणेच्या स्पर्शानं इतकी मोठी झाली की तिच्या संत पतीनं म्हटलं, “तू तर माझ्याही पुढे गेलीस!’’
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)





























































