
>> अंजली धानोरकर
सेठ गोडीन हे ‘ट्राइब्स’, ‘द डिप’, ‘पर्पल काऊ’, ‘ऑल मार्केटर्स आर लायर्स’ आणि इतर आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक. त्यांच्या या पुस्तकांनी लोकांच्या विचार आणि कृतीमध्ये बदल घडवून आणला. ते जगातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक ब्लॉगर असून ‘अल्ट एमबीए’चे संस्थापक आणि अतिशय लोकप्रिय वत्तेदेखील आहेत. सेठ गोडीन यांचे ‘लिंचपिन’ हे पुस्तक वाचकांना मार्गदर्शन करणारे आहे.
रथावर आरूढ होऊन युद्धामध्ये राजा दशरथ लढत होते. अचानकपणे त्यांच्या रथाच्या चाकाच्या आसाला असणारा खिळा निसटला आणि चाक निखळून पडणार एवढय़ात राणी कैकयीने त्या खिळ्याच्या जागी स्वतच्या हाताने घट्ट धरून ठेवले आणि रथ व्यवस्थित चालत राहिला. थोडक्यात, रथाच्या त्या चाकासाठी तो खिळा एवढा महत्त्वपूर्ण आहे की, जर तो नसेल तर चाक निखळून पडून जाईल.
‘लिंचपिन’ या मूळ इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे ‘असा अत्यंत महत्त्वपूर्ण खिळा’. एखाद्या संस्थेमध्ये, कार्यालयात जी व्यक्ती अशा रीतीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते तिला लिंचपिन म्हटले जाते. लिंचपिनच्या अगदी विरुद्ध प्रकारात वागणाऱया व्यक्तींना ‘सरडा मेंदू असणाऱया व्यक्ती’ असे म्हटले जाते. या सरडा मेंदू प्रकारातील व्यक्ती केवळ सांगितलेलीच कामे करतात आणि कोणत्याही प्रकारचे धोके पत्करू इच्छित नाहीत. याउलट लिंचपिन स्वत पुढाकार घेऊन विविध कामे पूर्ण करतात. तुमची आवड, तुमचे भविष्य आणि जे क्षेत्र तुम्ही निवडाल, त्यात खूप मोठा बदल घडवून आणण्याची तुमची क्षमता यावर लिंचपिन भाष्य करते.
सरडा मेंदू प्रकारातील व्यक्ती आणि लिंचपिन यांच्या मधील मूलभूत स्वरूपाचे फरकदेखील लेखकाने स्पष्ट केले आहेत. सरडा मेंदूचे नेमके वागणे कसे असते याबाबत विशद करत असतानाच या वृत्तीचा त्याग करून लिंचपिन ब् ानण्याची प्रक्रिया अत्यंत साध्यासोप्या शब्दांत लेखकाने नमूद केली आहे. बदलत्या जगाचे स्वरूप पाहता सरडा मेंदू प्रकारातील व्यक्तींना कधीही त्यांच्या कामामधून बाहेर फेकल्या जाणाचा धोका स्पष्ट आहे. त्याउलट काम कला प्रकारातील असो किंवा व्यावसायिक स्वरूपाचे, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये लिंचपिन स्वतचा वेगळा ठसा उमटवतात.
सरडा मेंदू बाजूला सारून लिंचपिन प्रकारचे महत्त्व, आवश्यकता आणि तिथपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया समजून घेऊन यश मिळवायचे असेल तर हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे. त्याचप्रमाणे स्वतच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवण्यासाठी आणि करीअरमध्ये यश मिळवण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
लिंचपिन
लेखक ः सेठ गोडीन अनुवाद ः चंद्रशेखर मराठे
प्रकाशन ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठ ः 296 किंमत ः 350 रुपये