
>> अस्मिता प्रदीप येंडे
स्वतच्या मालकीचे घर घेणे ही खूप संवेदनशील भावना आहे. जमीन असो वा घर सर्वसामान्य माणसाचे मालमत्ता खरेदीसंदर्भात असलेले गैरसमज दूर होऊन सामान्य जनांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी लेखक धनराज खरटमल यांनी ‘मालमत्ता खरेदी करताना’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीस आणले आहे.
लेखक धनराज खरटमल हे महसूल खात्याच्या नोंदणी विभागात नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत असताना नोंदणी अधिकारी म्हणून आलेले अनुभव पुस्तकात मांडलें आहे. पुस्तकात 45 लेखांचा समावेश असून प्रत्येक अनुभव, घटना कथेच्या स्वरूपात अवतीर्ण करून बोजड वाटणारी माहिती अधिक सुलभ करून सांगितली आहे. शासकीय भाषा थोडी किचकट असते, पण या पुस्तकाची निवेदन शैली सहज आकलन होणारी आहे. या पुस्तकात मालमत्तेसंदर्भात नोंदणी कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, महसूल कायदा, त्यातील तरतुदी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वाटणीपत्र व मृत्युपत्र यातील फरक, खरेदीखत की साठेखत यामधील अंतर, दस्ताची नोंदणी करणं का आवश्यक आहे? मुद्रांक शुल्क म्हणजे काय? म्हाडाचे घर विकत घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या? नवीन फ्लाट खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात? कुलमुखत्यार पत्र कधी करावे? बक्षिसपत्र म्हणजे काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील. एक विक्रेता व खरेदीदार म्हणून आपली काय कर्तव्ये आहेत, आपण मालमत्ता विकत घेण्यासाठी कोणत्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, माहितीची सत्यता कशी पडताळून पाहावी याविषयी आपल्याला नवी दृष्टी दिली आहे.
जमिनीचा व्यवहार करताना, त्याची वाटणी करताना, खरेदीखत करताना फसवणूक झाल्यास कुठे दाद मागावी, कोणते पुरावे सादर करावे, याची उदाहरणासहित माहिती दिलेली आहे.
लेखक धनराज खरटमल यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी, होणारी फसवणूक ही बाब लक्षात घेऊन या समस्यांवर काय ठोस उपाययोजना करावी याबाबत योग्य मार्गदर्शन केले आहे.
मालमत्ता खरेदी करताना
लेखक ः धनराज खरटमल
प्रकाशक ः ग्रंथाली प्रकाशन मूल्य ः 250 रुपये