साहित्य जगत- एका लॉर्डचे वेगळेपण

>> रविप्रकाश कुलकर्णी

सिनेमा विशेषतः हिंदी सिनेमा ही अजब गोष्ट आहे. सिनेमाचे हे वेड आसेतू हिमाचल सगळीकडे पाहायला  मिळते. उच्चभ्रू वर्गात मात्र हे हिंदी सिनेमाचे वेड सहसा कोणी जाहीरपणे सांगत नाही. अर्थात, त्याला पण अपवाद आहेतच. हे सगळं आठवायचं कारण 29 जुलै 2025 रोजी लॉर्ड मेघनाद देसाई यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले ही बातमी वाचून.

मेघनाद देसाई हे माटुंग्याच्या रामनारायण रुईया कॉलेजातून अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आणि ते नंतर ब्रिटनला गेले. डॉक्टरेट केली आणि तिथले झाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थेत कित्येक वर्षे त्यांनी प्राध्यापकी केली. हे करत असतानाच तेथील राजकारण, समाजकारण यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांना मजूर पक्षात मानाचे स्थान मिळाले. अर्थशास्त्रासंबंधित त्यांची बरीच पुस्तके आहेत.

 लिहिणे हा त्यांचा अंगभूत गुण होता. पुढे त्यांना ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ लॉर्डस्चे सदस्यत्व मिळाले. हे ‘लॉर्डपण’ त्यांनी आयुष्यभर शेवटपर्यंत मिरवले. त्यांच्या पुस्तकावर लेखक म्हणून लॉर्ड मेघनाद देसाई अशीच नाममुद्रा कायम राहिली. असे हे देसाई पहिल्यापासूनच हिंदी सिनेमाचे जबरदस्त फॅन. त्यात पुन्हा दिलीप कुमारवर विशेष प्रेम.

या प्रेमापोटीच पुढे त्यांनी ‘नेहरूज हिरो-दिलीप कुमार इन द लाईफ ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिलं. (नंतर ‘पाकीजा’ चित्रपटावरदेखील त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं.) या पुस्तकाचा अनुवाद ‘नेहरूंचा नायक दिलीप कुमार आविष्कार भारतीयत्वाचा’ हा दीपक देवधर यांनी केला असून तो लाटकर प्रकाशन, पुणेतर्फे प्रकाशित झालेला आहे.

या पुस्तकाबाबत देसाई म्हणतात, आमच्या जीवनात चित्रपटांना फार मोठे स्थान होते. चित्रपटांनी आमचे मनोरंजन करता करता आमच्या जीवनाला आकार दिला. या युगात दिलीप कुमार एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्याने आमचे जीवन भारून टाकले होते. आम्ही त्याचे कपडे, केसांचा भांग, लकबी आणि संवाद या सगळ्यांचे अनुकरण करत असू, परंतु त्याहीपेक्षा अधिक म्हणजे त्याच्या भूमिकांमधून रेखाटले जाणारे आदर्श आमच्या मनात खोलवर रुजत होते. हे पुस्तक त्या भूमिका आणि आमच्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडला याविषयीचे आहे. तसंच त्यांनी असंही म्हटलं आहे की, चित्रपटाच्या चष्म्यातून राजकारणाकडे पाहिले तर कसे दिसेल?

मेघनाद देसाई यांनी याबाबत सर्वांचे आभार मानताना लिहिलं आहे, माझ्या काहीशा विस्कळीत हस्तलिखिताचे संपादन किश्वर अहलुवालिया यांनी केले. त्यांचा मी ऋणी आहे (किश्वर या प्रथितयश लेखिका आहेत). यानिमित्ताने दोघांची घसट इतकी वाढली की, दोघांनी आपल्या जोडीदारापासून काडीमोड घेऊन पुनर्विवाह केला. त्या वेळी वराचे वय 64 होते, तर वधूचे 48. मेघनाद देसाई यांनी ‘रिबेलियस लॉर्ड या’ आत्मचरित्रात आपल्या सहजीवनाची कहाणी सांगितली आहे.

दिलीप कुमार, एक सार्वकालीन दंतकथा. दिलीप कुमार यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचे दुर्लक्षित सत्य म्हणजे, त्यांनी त्यांच्या संबंध कारकीर्दीत फक्त एकदाच मुसलमान व्यक्तिरेखा साकारली आहे आणि ती म्हणजे ऐतिहासिक ‘मुघल ए आझम’मधील अकबराचा पुत्र सलीम.

‘लीडर’ चित्रपटकाळात दिलीप कुमारच्या घरावर धाड पडली. त्याच्याभोवती संशयाचे जाळे पसरू लागले. याबाबतीत मेघनाद देसाई यांनी पत्रकार मोहनदीप लिहिलेल्या (17 ऑगस्ट 1997 – डेली संडे) लेखाचा काही भाग उद्धृत केला आहे. ‘अनेक वर्षांनंतर एक पत्रकार या नात्याने मी त्या अप्रिय घटनेची पुन्हा चौकशी केली. जरी त्याने नाकबूल केल्या असल्या तरीही त्या सर्व गोष्टी खऱया होत्या. दिलीप कुमारच्या पाली हिलच्या बंगल्यावर धाड पडली होती हे खरे होते. त्यात एक ट्रान्समीटर सापडला होता, हेही खरे होते. त्याच्याकडे प्रचंड राजकीय ताकद होती, त्याने तो अन्यत्र असल्याचे सांगितले आणि या गोष्टीचा साफ इन्कार केला तरीही ती केस 18 वर्षे खुली राहिली होती हेही खरे होते. त्याने याबाबत असे सांगितले होते की, त्याच्याकडे नव्याने कामाला लागलेल्या एका नोकराकडे ट्रान्समीटर होता. सीबीआयने यावर विश्वास ठेवला नाही आणि माझ्यासारख्या लोकांनाही ते पचनी पडले नाही. सीबीआयद्वारे वर्षानुवर्षे तपास केल्या जाणाऱया अन्य केसेसप्रमाणे ही केसही कालांतराने बंद करण्यात आली.’

अशी विशेष फारशी कुठे न आलेली माहिती या पुस्तकात आहे म्हणून त्याचे महत्त्व. मेघनाद देसाई यांच्या जाण्याने असे काही आठवत गेले त्याची ही नोंद.