
>> अशोक बेंडखळे
जुन्या पिढीतील म्हणजे आगरकर-टिळक यांच्या पिढीतले ज्येष्ठ लेखक कृ. अ. (कृष्णराव अर्जुन) केळुसकर यांच्या निवडक लेखांचे ‘विचार संग्रह’ हे पुस्तक 1934 मध्ये प्रसिद्ध झाले आहे (प्रकाशक ः गुरुवर्य केळुसकर गौरव मंडळ, दादर, मुंबई). त्यात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, विज्ञान, शिक्षण अशा विविध विषयांवरील 38 लेख असून लेखकाचा अनेक विषयांचा अभ्यास, सुस्पष्ट विचार आणि दूरदृष्टी दिसते ती स्तिमित करणारी आहे.
केळुसकरांच्या सर्व लेखांचा परामर्श जागेअभावी शक्य नाही. मात्र काही लेखांची ओळखही त्यांच्या विचारांचा स्पष्टपणा व अभ्यास दाखवण्यास पुरेशी वाटते. स्वदेशाभिमान या लेखात त्यांनी मनुष्यास जसा स्वाभिमान, तसा राष्ट्रास स्वदेशाभिमान कसा हितावह ते सांगितले आहे. स्वसंपादित धनाचा व सामर्थ्याचा विनियोग समाजाच्या उत्कर्षासाठी व्हावा हे अधोरेखित केले आहे. सामाजिक सुधारणांबाबत बोलताना यात उद्भवणाऱया अडथळ्यांचे वर्णन करून सुधारणेच्या या युगात जुन्या चालीरीती व समजुती यांविषयी फाजील प्रीती न दाखवता जे मनुष्यास शाश्वत सुख देणारे आहे, त्याचा अंगीकार करावा असे धारिष्टय़ाचे विचार मांडले आहेत.‘समाजास धर्माची आवश्यकता आहे काय?’ या लेखामधून लेखकाच्या पुरोगामी विचारांचे दर्शन घडते. आजपर्यंत धर्माच्या नावाने विविध समाजांत कलह माजून मनुष्य सुखास व राष्ट्रीय उत्कर्षास हानी झाली आहे. त्याचप्रमाणे घनघोर युद्ध होऊन कैक राष्ट्रांच्या प्रगतीस खीळ बसली, अनेक राष्ट्रे नामशेष झाली हे विचार सुधारकी बाण्याचे व दूरदृष्टीचे आहेत.
मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे हा आजचा विचार केळुसकर सव्वाशे वर्षांपूर्वीच ‘सध्याची शिक्षण पद्धती आयुष्य खुंटवणारी आहे’ या लेखात मांडतात हे विशेष. मुलांना उपयुक्त विषयाचे ज्ञान इंग्रजीद्वारे मिळवताना दुहेरी श्रम पडतात. एक भाषाज्ञानाचे व दुसरे विषय लक्षात ठेवण्याचे. हे मातृभाषेत झाल्यास व इंग्रजी भाषेचा स्वतंत्र अभ्यास ठेवल्यास मुलांना श्रम पडणार नाहीत हे त्यांनी शिक्षकी अनुभवातून सांगितले म्हणून महत्त्वाचे. ‘चरित्र लेखनाविषयी अनास्था’ या लेखात सत्यनिष्ठा, सत्त्वशीलता, सचोटी, कल्पकता, साहस, विद्याव्यासंग, विवेक संपन्नता, देशभक्ती इ. उज्ज्वल गुण अंगी असलेल्या पुरुषांची चरित्रे लिहिली जावीत, जेणेकरून तरुणांच्या बुद्धीचा विकास तसेच सद्वृत्तीचाही विकास होईल हे मत महत्त्वाचे आहे.
‘मिठावरील कराचा बोजा’, ‘शास्त्राrय ज्ञानाच्या प्रसारावाचून गती नाही’, ‘आमची शेती’ आणि ‘पाऊस पाडता येईल का?’ हे चार लेख तर लेखकाच्या दूरदृष्टीचे प्रत्यंतर घडवतात. महात्मा गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह सर्वश्रुत आहे. मात्र गांधीजींच्या सत्याग्रहाच्या 40 वर्षे अगोदर केळुसकरांनी विचार मांडले आहेत आणि ते मांडताना मीठ बनवण्यास अल्पसा खर्च येतो. मात्र सरकारी करामुळे पंचवीसपट किमतीत सगळ्यांना मीठ विकत घ्यावे लागते. अनेकांना परवडत नाही आणि गरीबांच्या अन्नात पुरेसे मीठ न मिळाल्यामुळे समाजात रोगराई व दुबळेपण पसरते हे सांगितले आहे. विज्ञानाचे महत्त्वही 125 वर्षांपूर्वी सांगितले आहे. आमची भौतिक संपत्ती जमिनीच्या पोटात आहे, ती हुडकून काढण्यात आम्हाला जी दृष्टी पाहिजे, ती भूगर्भशास्त्राने येईल आणि त्यासाठी या शास्त्राचा अभ्यास वाढायला हवा हा विचार समर्पक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे.
मुंबई इलाख्यातील शेती आणि कृत्रिम पाऊस याबाबत मांडलेले विचारही काळाच्या पलीकडचे आहेत. पाण्याची कमतरता नाहीशी करण्यासाठी पाटाने पाणी नेण्याची मोठी कामे चालू करणे हा उपाय सुचवला आहे. इथे सरकारच्या वैगुण्यावरही बोट ठेवले आहे. ते म्हणजे सरकार (ब्रिटिश) दुष्काळ पडल्यानंतर मोठी रक्कम दुष्काळ निवारणासाठी खर्च करते. मात्र तीच रक्कम दुष्काळाचे कारण म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष नष्ट करण्यात खर्च केली तर मोठे हित साधेल असा सुज्ञपणाचा सल्ला दिला आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबतचा एक अनोखा प्रयोग त्यांनी सांगितला आहे. कृत्रिम पावसाच्या या प्रयोगाला अमेरिकेतला संदर्भ आहे. यात उंच जागी डिनमाइट व रॅकेशॅक नामक पदार्थ पेटवून मोठाले आवाज काढले गेले. याला अनेक लढायांचाही संदर्भ होता. अशा लढाईनंतर थोडय़ा वेळाने पावसाची सर येत असे. अलीकडे कृत्रिम पावसासंदर्भात आपल्याकडे अनेकदा चर्चा होते. मात्र 1890 मध्ये असा प्रयोग मद्रास इलाख्यात एका कलेक्टरने केल्याचा दाखला देऊन लेखक असे प्रयोग आपल्याकडच्या शेतकी खात्याने करायला हवेत असे सुचवतो.
विविध विषयांवरील हे विचारप्रवर्तक लेख वाचताना आपण लेखकाच्या दूरदृष्टीने स्तिमित होतो आणि गुरुवर्य केळुसकरांची विचारसरणी आगरकरांसारखी सुधारकी बाण्याची होती हे म्हणणे पटते.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)