जागर – कुपोषणाकडून सुपोषणाकडे

>> वर्षा आठवले

2018 साली पंतप्रधानांनी सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जाईल असे नमूद केले.   पोषण मूल्यांचं महत्त्व लोकांना समजावं यासाठी तसंच निरोगी आणि शाश्वत जीवनशैली लोकांनी अंगीकारावी यासाठी पोषण सप्ताहाची सुरुवात झाली. माता आणि बालके सुदृढ राहावी, असा प्रयत्न करणे हा या पोषण महिन्याचा उद्देश. अंगणवाडी ताया केवळ पोषण मासापुरतंच नाही तर सर्वकाळ गरोदर माता आणि बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करत असतात.

पालघर जिह्यातला अत्यंत दुर्गम भाग. कुपोषणाची समस्या पाचवीला पुजलेली. जगण्या-मरण्याच्या सीमेवर असलेली अनेक मुले. ऑगस्ट 2016 सालची ही घटना. दोन वर्षांची एक चिमुकली. लहान वयातील आई, तिची पाठोपाठची बाळंतपणे, घरात हातातोंडाची लढाई. साहजिकच मुलीचे भरण-पोषण शक्य नव्हते. कोपऱयात शून्यात बघत बसायची. हालचालींना मर्यादा होत्या. कुटुंब नुकतेच गावात स्थलांतरित झाले होते. या मुलीची आणि मातेची अवस्था बघून अंगणवाडी सेविकांनी तातडीने अधिकाऱयांना माहिती दिली. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र होते, मात्र रुग्णालयात पाठवण्यास घरच्या मंडळींनी नकार दिला. मग अंगणवाडी ताईंनी शिवधनुष्य पेलले. डॉक्टरांचे सल्ले बारकाईने समजून घेत या मुलीची काळजी घेतली. प्रसंगी पदरमोड करून तिचा आहार, पोषणमूल्य सांभाळली. आज जेव्हा ती मुलगी दप्तर पाठीला लावून शाळेत येते, तेव्हा कष्टाचे चीज झाल्याची भावना असते हे सांगताना अंगणवाडी सेविकांच्या डोळ्यात पाणी होते. ही घटना आमच्या संपर्क संस्थेने केलेल्या अंगणवाडी अहवालातील. तुम्ही अंगणवाडी तायांना भेटलात तर मुलांना, मातांना कुपोषणाकडून सुपोषणाकडे आणणाऱया असंख्य घटना, गोष्टी ऐकायला मिळतील. गेल्या जवळपास 40 वर्षांपासून अंगणवाडी ताई हे काम करत आहेत. सध्या सुरू असलेला पोषण मास म्हणजे काय हे या अंगणवाडी ताईंच्या कामातूनच स्पष्ट होतं.

सप्टेंबरचा पहिला आठवडा हा 1982 पासून हिंदुस्थानात पोषण सप्ताह म्हणून पाळला जातो. पोषण मूल्यांचं महत्त्व लोकांना समजावं यासाठी तसंच निरोगी आणि शाश्वत जीवनशैली लोकांनी अंगीकारावी यासाठी पोषण सप्ताहाची सुरुवात झाली. 2018 साली पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सप्टेंबर महिना हा महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल असं नमूद केलं. माता आणि बालके सुदृढ राहावी, असा प्रयत्न करणे हा या पोषण महिन्याचा उद्देश. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांमार्फत विविध स्तरावर प्रयत्न केले जातात. अंगणवाडी ताया केवळ पोषण मासापुरतंच नाही तर सर्वकाळ गरोदर माता आणि बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करत असतात.

मुलांना सुदृढ आरोग्य मिळावे यासाठी योग्य पोषणयुक्त आहार देणे, त्यांचं आरोग्य सांभाळणे, वैयक्तिक स्वच्छता, मातांना लसीकरणाविषयी योग्य माहिती देणे आणि माता-बालकांना पोषण आहार देणे हे केवळ पोषण मास म्हणूनच नाही तर कायमच गरजेचं आहे. ही माहिती देण्याचं कामच एकात्मिक बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी ताई करत असतात.

जगभरातील एकूण कुपोषित बालकांपैकी एक तृतीयांश मुले ही हिंदुस्थानातील आहेत. शरीराने कुपोषित असणाऱया मुलांमध्ये इतरही अनेक समस्या दिसतात. मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. मुलांचे शिक्षण आकलन शक्ती, कृती करण्याची क्षमता, शिकण्याची तयारी आणि पर्यायाने उदरनिर्वाहाच्या क्षमता मर्यादित होतात. अख्ख्या आयुष्यावर परिणाम करणारे हे कुपोषण म्हणूनच नियंत्रणात आणायला हवं. 2019-20 या काळात 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुटुंबस्वास्थ्य सर्वेक्षण (NFHS 5) अहवालातला चिंताजनक निष्कर्ष आहे  0 ते 5 या वयोगटातील बालकांची पोषणपातळी 2015-16 च्या राष्ट्रीय कुटुंबस्वास्थ्य सर्वेक्षणाच्या (NFHS 4) तुलनेत घसरली आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणतात, “अंगणवाडी सेविकांचे कुपोषण निर्मूलनातील काम अत्यंत मोलाचे आहे. मंत्रीपद मिळाल्यापासून दीड वर्षात मी अनेक ठिकाणी फिरले. अंगणवाडी सेविकांचे लहान लेकरांवर, प्रत्येक मुलाच्या स्थितीवर त्यांचे लक्ष असते. मुलांची काळजी घेण्याचे महत्त्वाचे काम त्या करत आहेत. कोविड काळातील त्यांचे योगदानही मोठे आहे. अंगणवाडी सेविका या काळात ठामपणे उभ्या राहिल्या. अंगणवाडी सेविका नसत्या तर घरोघरचे सर्वेक्षण आणि जनजागृती करणे कठीण झाले असते. अंगणवाडय़ा, सेविका आणि मदतनीस यांचे अधिक बळकटीकरण करण्याची गरज आहे. अंगणवाडय़ा आणि तेथील सेविका या केंद्र आणि राज्य सरकारच्या कणा आहेत.’’

अंगणवाडी ताई त्यांच्या परिसरातील गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान मुलं यांच्या पोषक आहाराची काळजी घेत असते. हा आहार जास्तीत जास्त पोषक व्हावा असा विचार आमच्या संपर्क संस्थेने केला आणि त्यातून ‘माता-बाल पोषणाची शिदोरी’ हा उपक्रम सुरू झाला. संपर्क, नवी उमेद आणि मुंबई स्वयंपाकघर हा फेसबुक ग्रुप आणि आयसीडीएसच्या माध्यमातून नुकताच हा उपक्रम सुरू झाला आहे. लोकांनी पाठवलेल्या पाककृती मुंबई स्वयंपाकघरवर प्रकाशित होतील. अंगणवाडी ताईंना या पाककृती पाठवल्या जातील तर त्यांच्याही पाककृती इथं प्रकाशित होतील. थोडक्यात पाककृतींचे आदानप्रदान होऊन मुलांसाठी, मातांसाठी योग्य पोषक घटक असणाऱया नवनवीन पदार्थांच्या रेसिपीज या ताईंना करणं शक्य होईल. पदार्थांत वापरल्या जाणाऱया घटक पदार्थांची पोषणमूल्यही त्यात सांगितली जातील. या सगळ्याची अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामात उत्तम होईल असं वाटतं.

थोडक्यात, पोषण मास केवळ एक महिन्यापुरता न पाळता तो कायमसाठीच पाळायला हवा.

(लेखिका नवी उमेदच्या संपादकपदी आहेत)

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या