
>> सुरेश वांदिले
ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत हे आपले पुस्तक कसे असावे, कसे दिसावे, यासाठी फार दक्ष आणि जागरूक असतात. त्यामुळे बालकुमारांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तके, मुखपृष्ठापासूनच मोहित करून जातात. त्यांचे नवे पुस्तक ‘मटकासुर आणि बिजली’ हे याचे ताजे उदाहरण. मुलांना शब्दांच्या दुनियेत रममाण होण्यासाठी त्या शब्दांच्या अवतीभवती सुंदर, देखणी, गुंतवून टाकणारी रंगसंगती असावी लागते हा सूर डॉ. सावंतांना अचूक गवसलाय. यातील सर्व कथा वेगवेगळ्या धर्तीच्या आणि प्रकारातील असल्या तरी त्यांचा गाभा मनात प्रेरणेची ज्योत पेटवणारा आहे.
‘धाकटी होळी’ या पहिल्या कथेपासूनच वाचक कथांमध्ये रंगून जातो. या कथेतून त्याला नव्या गोष्टीही कळतात. संक्रांतीला जी छोटी होळी पेटवतात, तिला ‘धाकटी होळी’ म्हणतात. ही बऱयाच वाचकांसाठी नवीन माहिती आहे. या धाकट्या होळीचा उपयोग गावातली मुलं पतंगाचा मांजा जाळून टाकण्यासाठी करतात. कारण संक्रांतीत उडवल्या जाणाऱया पतंगाच्या या मांज्यामुळे पक्ष्यांना त्रास होतो. बरेच पक्षी जखमी होतात. काही जिवाला मुकतात. आपला आनंद त्यांच्यासाठी वेदनादायी ठरतो. ही जाणीव मुलांना होऊन ते हा मांजाच धाकट्या होळीला समर्पित करतात आणि पर्यावरण संरक्षणाचा धडा गिरवतात.
‘मटकासुर आणि बिजली’ ही कथा घडते ताडोबाच्या जंगलात. बिजली ही अस्वल आई, मटकासुर नावाच्या वाघाला नमवते. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी ही अस्वल आई मोठ्या शौर्याने लढा देते. शत्रू कितीही बलवान असला तरी त्याच्याशी धैर्याने व युक्तीने सामना केल्यास त्याला पराभव पत्करावा लागतो, हा धडा अप्पू या प्रसंगातून शिकतो.
‘कबुतरांची शाळा’ ही कथा एका वेगळ्या सामाजिक प्रश्नाचा ऊहापोह करते. या कथेचा नायक शौर्य हा कबुतरांच्या प्रेमात पडलेला असतो. आपल्या घराच्या गच्चीवर त्याने अनेक कबुतरे पाळलेली असतात. त्याच्या या कबुतरप्रेमामुळे त्याच्या तब्येतीवरही परिणाम होत असल्याचे त्याच्या मामाच्या लक्षात येते. शौर्यचे हे कबुतरप्रेम मामा कसे अलगद दूर करतो, याची ही प्रत्ययकारी कथा डोळ्यांत अंजन घालणारी आहे.
नांदेड जिह्यातील किनवट येथे साने गुरुजी सेवाभावी दवाखाना, साने गुरुजी विद्यालय, गरीब मुलांसाठी ‘आपलं घर’ हे वसतिगृह चालवणाऱया डॉ. अशोक बेलखोडे यांच्या शाळेत, गोरमाटी या आदिवासी समाजातील अक्षता आडे ही मुलगी शिकते. परिस्थितीचा बाऊ न करता, कष्ट करून ती पुढे डॉक्टरही बनते. नववीत असतानाच तिच्या घरची मंडळी अक्षताच्या लग्नाचा घाट घालतात. पण ती मोठ्या हिकमतीने डॉ. बेलखोडेंच्या मदतीने यातून आपली सुटका करून घेते. डॉ. बेलखोडे तिला मानसकन्या मानतात. आपले आईवडील कधीही आपले लग्न लावून देतील म्हणून ती कोणत्याच सुट्ट्यांमध्ये घरी जात नाही. खूप अभ्यास करते. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकून ती डॉक्टर होते. या सत्यघटनेचा उपयोग करून डॉ. सावंतांनी, दुर्गम भागातील ‘नकोशा’ मुली या कशा ‘हव्याशा’ वाटाव्यात यासाठी प्रेरणा देणारी ही कथा रेखा राठोड या मुलीच्या रूपात जिवंत केली आहे.
‘बोटांचा बेबनाव’ ही गमतीशीर गोष्ट, ‘वीरबाला लक्ष्मी’ ही सत्यकथा, ‘परिसर अभ्यास आणि सौरभचा निबंध’ या संवादी कथा डॉ. सावंत यांनी खुबीने रंगवल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थांचे कार्य, त्याग आणि प्रेरणा सांगणारी ‘माळावरची बाग’ ही कथा अंतर्मुख करणारी आहे.
या कथासंग्रहासाठी नीलेश जाधव यांनी काढलेली चित्रे अगदी बोलकी आहेत. प्रत्येक पृष्ठावर एखादे तरी चित्र आहे. त्यामुळे कथांना दृश्यात्मकता प्राप्त झाली आहे. उत्कृष्ट मूल्यशिक्षण देणाऱया आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये असणारे असे हे पुस्तक आहे.
मटकासुर आणि बिजली
लेखक ः डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक ः दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 64 n मूल्य ः 200 रु.























































