लेख – युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने चिनी सैनिक

>> सनत्कुमार कोल्हटकर, [email protected]

युक्रेन युद्धात एक मोठी गोष्ट घडली आहे ती म्हणजे चीनकडून 18 हजार सैनिक रशियामध्ये पाठविण्यात आलेले आहेत. हे सैनिक रशियाच्या बाजूने युक्रेनविरुद्ध लढू शकतील असे आता तरी वाटते आहे. अर्थात चीनच्या सैनिकांचे रशियातील आगमन गुप्त ठेवण्यात आलेले असले तरी समाज माध्यमातून याबद्दलचा तपशील देणारी अनेक छायाचित्रे पुढे आलेली आहेत. उत्तर कोरियाकडूनही काही सैनिक रशियाच्या बाजूने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियामध्ये आल्याचे सांगतात.

आंतरराष्ट्रीय राजकारणात गेली अडीच वर्षे रशिया आणि युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धात आता दोन्ही बाजूने ध्रुवीकरण होताना दिसते आहे. अमेरिका आणि नाटोमधील प्रामुख्याने युरोपियन देशांनी युक्रेनला चालू ठेवलेल्या शस्त्रास्त्रांच्या आधारावर युक्रेन रशियाच्या विरुद्ध लढताना दिसतो आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रांचा मुबलक पुरवठा होत असला तरी युद्धभूमीवर लढणाऱया प्रत्यक्ष सैनिकांची कमतरता त्या देशाला सध्या भेडसावत आहे. तीच समस्या रशियालाही भेडसावत आहे. आशियातील काही देशांतील लोक रोजगाराच्या आशेने या युद्धात सामील होण्यासाठी युक्रेन व रशिया या दोन्ही देशांकडे जाताना दिसत आहेत. भारतातूनही अनेक लोक रशियाच्या सैन्याला मदत करण्यासाठी रशियामध्ये पोहोचल्याचे जगाने बघितले. मध्यंतरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियामध्ये अध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली होती. त्या वेळी भारतातून रशियामध्ये युद्धात सामील होण्यासाठी गेलेल्या लोकांना भारतात परत पाठविण्याविषयीही बोलले गेले होते असे सांगतात. थोडक्यात, युद्धभूमीवर लढण्यासाठी दोन्ही बाजूंना सैनिकांची कमतरता जाणवते आहे.

युक्रेनकडे असणाऱया सैनिकांची कमतरता बघता काही महिन्यांपूर्वी फ्रान्सने त्यांचे स्वतःचे काही सैनिक युक्रेनमधील युद्धात उतरवले होते. फ्रान्सने नाटोमधील इतर देशांनाही त्यांचे सैनिक युक्रेनच्या युद्धात उतरवण्याचे आवाहन केले होते. रशियाकडून फ्रान्सच्या या पावित्र्याबद्दल खूपच कडक प्रतिक्रिया आलेली होती. नाटोमधील काही देशही हळूहळू युक्रेनच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे उतरू लागले आहेत, असे रशियाकडून वारंवार सांगितले जात आहे. फक्त अमेरिकेने त्यांचे स्वतःचे सैनिक अजूनपर्यंत तरी युक्रेन आणि रशियामध्ये चालू असलेल्या युद्धात उतरवलेले नाहीत.

आतापर्यंत युरोपियन देश आणि अमेरिका यांच्या बळावर युक्रेन रशियाच्या लढताना दिसतो आहे, तर दुसरीकडे रशियाच्या बाजूने एक बेलारूस सोडला तर दुसरा कोणताही देश प्रत्यक्ष सहभागी होताना दिसला नाही. इराणकडून रशियाला ‘ड्रोन्स’चा पुरवठा करण्यात आला होता आणि अजूनही हा पुरवठा चालू असल्याचे सांगतात, पण चीन अथवा उत्तर कोरिया या दोन्ही देशांकडून रशियाला कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष मदत होताना दिसली नव्हती. चीनकडून अप्रत्यक्षपणे काही शस्त्रास्त्रांचे सुटे भाग रशियाला दिले गेल्याचे बोलले गेले. एवढेच नव्हे तर अमेरिकेने याबद्दल चीनला हा पुरवठा थांबविण्यासाठी चीनला धमकावले होते. आता चीनवरही अमेरिकेने निर्बंध टाकावयास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. हे सर्व सांगावयाचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांत अमेरिकेने दक्षिण आशियातील श्रीलंका, बांगलादेश ते इंडोनेशियापर्यंत सर्व देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआड जे सत्ताबदल करण्याचे आरंभिले आहे ते बघता चीन व भारत हे दोन्ही देश अस्वस्थ झालेले आहेत. बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेने जी ढवळाढवळ चालविलेली आहे ती आता चीनच्या सीमेपर्यंत पोहोचलेली आहे. भारताने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात राजाश्रय देऊन एक भूमिका घेतलेली आहे.

चीनकडून अमेरिकेच्या या चीनभोवतालच्या देशांमधील ढवळाढवळीबद्दल अजूनपर्यंत कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली दिसली नव्हती. चीनने अंगीकारलेले हे मौन आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकणारे होते, पण त्याचा उलगडा आता हळूहळू का होईना, होताना दिसतो आहे.

नुकतेच भारताचे पंतप्रधान प्रथम पोलंडमध्ये अधिकृत भेट देण्यास गेले होते. पोलंडमधून रेल्वेमार्गे सुमारे आठ तासांचा प्रवास करून ते युक्रेनमध्ये पोहोचले होते. त्याच सुमारास चीनचे पंतप्रधान ली कियांग हे बेलारूसला पोहोचले होते. ली कियांग यांनी नंतर रशियामध्ये जाऊन व्रेमलिनमध्ये रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली होती. बेलारूस, युक्रेन, पोलंड आणि रशिया यांचा भौगोलिक नकाशा एकत्रितपणे बघितल्यास या भेटींमागचा उलगडा होतो.

ली कियांग यांच्या बेलारूस भेटीनंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे कमांडर जनरल ली कियाओमिंग यांनी रशियाच्या संरक्षण दलाचे उपप्रमुख कमांडर जनरल अलेक्झांडर पह्मीन यांची मॉस्को येथे भेट घेतली होती. या भेटीबद्दल रशियाच्या ‘स्पुटनिक’ या वार्तापत्रात बातमी आलेली आहे, पण चीनकडून त्याला पुष्टी देण्यासाठी काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

22 ऑगस्ट… याच दिवशी चीन आणि रशिया यांनी एक संयुक्त निवेदन जाहीर केले होते. त्या निवेदनात परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याच्या अमेरिका आणि युरोपातील काही देशांच्या पावित्र्याला आक्षेप घेत विरोध व्यक्त केला होता. अमेरिका आणि युरोपातील ‘नाटो’मधील देशांचे या संयुक्त निवेदनात स्पष्टपणे नाव घेतलेले गेले नसले तरी याच देशांनी रशियाच्या अमेरिका, जर्मनीमधील मालमत्तांवर टाच आणली होती.
युक्रेन युद्धात एक मोठी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे चीनकडून सुमारे 18 हजार सैनिक रशियामध्ये पाठविण्यात आलेले आहेत. हे सर्व सैनिक रशियाच्या बाजूने युक्रेनविरुद्ध लढू शकतील असे आता तरी वाटते आहे. अर्थात चीनच्या सैनिकांचे रशियातील आगमन गुप्त ठेवण्यात आलेले असले तरी समाज माध्यमातून याबद्दलचा तपशील देणारी अनेक छायाचित्रे पुढे आलेली आहेत. उत्तर कोरियाकडूनही काही सैनिक रशियाच्या बाजूने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियामध्ये आल्याचे सांगतात, पण त्याची खातरजमा करण्याचा कोणताही मार्ग तूर्तास उपलब्ध नाही.

रशिया – युक्रेन युद्धात आता स्पष्टपणे दोन्ही बाजूंकडून इतर देश समोरासमोर येताना दिसत आहेत. इराण आणि व्हेनेझुएला हे दोन्ही देश रशियाच्या बाजूने असले तरी या दोन्ही देशांचा या युद्धात अथवा युद्धभूमीवर प्रत्यक्ष सहभाग नाही. इराणकडून रशियाला ड्रोनचा पुरवठा फक्त करण्यात आला आहे. ‘युद्धस्य कथा रम्या…’ असे का म्हणतात हे माहीत नाही. या कथा दुरून ऐकण्यात रम्य वाटत असले तरी जे देश युद्धग्रस्त आहेत त्या देशांमधील अजाण बालके, स्त्रिया यांचा संहार अंगावर काटा आणतो.

एकेकाळी युक्रेनमधील व्यासपीठावरील आचरटपणासाठी प्रसिद्ध असणाऱया विनोदवीर झेलेन्स्कीला युक्रेनचा सर्वेसर्वा बनविण्यासाठी अमेरिकेने जिवाचे रान केले होते. हाच झेलेन्स्की आणि त्याच्या भोवतीचा मोठा गोतावळा हा अमेरिकेकडून मिळणाऱया प्रचंड आर्थिक मदतीतील पैशांवर ऐषारामी जीवन उपभोगताना दिसतो. एकीकडे युक्रेन – रशिया युद्धामध्ये असंख्य सैनिक मारले जात आहेत आणि दुसरीकडे झेलेन्स्की आणि त्याच्याभोवतीचा गोतावळा मौजमजा करताना दिसतो. या मौजमजेच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेला हे युद्ध चालू ठेवायचे आहे तोपर्यंत हे युद्ध चालू राहील हे स्पष्ट आहे.