
>> दिलीप जोशी
गेल्या आठवड्यात आपण एखाद्या धूमकेतूचे तुकडे कसे होतात ते जाणून घेतलं. ऍटलास नावाचा धूमकेतू नुकताच तुटला त्यानिमित्ताने पूर्वी असाच नष्ट झालेला शूमेकर-लेव्ही-9 या धूमकेतूची माहिती थोडक्यात घेतली. हॅलीचा धूमकेतू तर विज्ञानाच्या पाठय़पुस्तकातही असेल. तर आता केव्हातरी न येता नियमितपणे येणार्या धूमकेतूंची अधिक माहिती घेऊ. आताचा काळ घरी बसून आकाशाचं ‘सैद्धांतिक’ रूप जाणून घेण्याचा. याचा फायदा पुढच्या वर्षी आकाश न्याहाळताना होईल.
धूमकेतूंचे जे प्रकार आहेत त्यापैकी सन ठोझिंग तर सूर्यावर आदळतात. शॉर्ट टर्म (अल्पकालीन) धूमकेतू तीन ते पाच वर्षांनी येतात. त्यांची भ्रमणकक्षा तुलनेने लहान असते. ‘हॅली’सारखे 76 वर्षांनी येणारे धूमकेतू पॅरॅबोलिक किंवा अन्वस्त या कक्षेत येतात. त्यांचा प्रवास खूप मोठा असतो. लक्षावधी किलोमीटरचा प्रवास करताना त्यांचा शक्तीपातसुद्धा होतो. म्हणून 1910 मध्ये दिसलेला हॅलेचा धूमकेतू 1986 मध्ये अगदी क्षीण आणि ‘अशक्त’ झालेला दिसला. शिवाय त्याचं ‘मोठं’ दिसणं त्यावेळच्या फेरीत तो पृथ्वीच्या किती जवळून जातो. त्यावरही अवलंबून असतं. हॅलीनंतर दिसलेला ‘ह्याकुताके’ धूमकेतू खूपच स्पष्ट आणि मोठी शेपूट असलेला पहायला मिळाला. त्याची उत्तम छायाचित्रं घेता आली. त्याचप्रमाणे ‘हेल बॉप’ धूमकेतूही ठळकपणे दिसला होता. गेल्या तीन दशकात ‘छान’ दिसलेलं हे हे दोन धूमकेतू. आणखीही बरेच येऊन गेले. काहींनी ‘आधी चांगले दिसतील’ असं भाकित असतानाही नंतर हुलकावणी दिली.
धूमकेतू हा मुळात एक बर्फ आणि धुळीचा गोळा असतो. काही वेळा त्याच्या गाभ्यात एखादा महापाषणणही दडलेला असतो. तो जेव्हा आपल्या सूर्यमालेला भेट देतो तेव्हा त्या गाभातील बर्फ सूर्याच्या उष्णतेमुळे वितळतं. त्यातील काही वायू व धूळ बाहेर पडते आणि सूर्याच्या विरुद्ध दिशेला त्याचे ‘शेपूट’ दिसू लागते. ते धुरकट दिसते म्हणून तो धूमकेतू. मात्र धूमकेतूला एकच शेपूट असते असे नाही. धूळ, वायूच्या प्रमाणात त्याला दोन शेपट्या फुटतात. धुळीची शेपटी आणि आयनाइज्ड वायुंमुळे निर्माण झालेली आयन अथवा ‘प्लाझ्मा’ शेपूट. धूमकेतूच्या गाभ्याचा व्यास तीस किलोमीटर असेल तर या शेपट्या मोठय़ा दिसतात. ते धूमकेतूच्या वस्तुमानावर (त्यातील द्रव्यावर) अवलंबून असतं.
धूमकेतू त्याच्या सूर्यमालेतील भ्रमणकाळात विविध ठाहांच्या जवळून जातो. गुरू-शनि यांच्यासारख्या प्रचंड गुरुत्वाकर्षण असलेल्या ठाहांमुळे त्याच्या शेपटीमधील द्रव्य खेचून घेतले जाते अथवा विलग होऊन मागे राहते. अशाच एका धूमकेतूच्या उर्वरित द्रव्यामुळे सिंह राशीतला तेजस्वी उल्कावर्षाव दरवषी नोव्हेंबर महिन्यात दिसतो. काही धूमकेतूंचे अंतराळात रेंगाळणारे द्रव्य बराच काळ टिकते. 20 एप्रिल 2007 रोजी ‘सोहो’ प्रकल्पाने ‘एन्के’च्या धूमकेतूचे तुटलेले शेपूट नोंदले.
काही लाख वर्षांत महापाषाण (अशनी) किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळल्याचा धोका नाकारता येत नाही. डायनॉसॉर नष्ट झाले ते अशाच विपरित आघातातून. त्यानंतर 65 कोटी वर्षांत एवढा उत्पात पृथ्वीवर झालेला नाही.
प्राचीन काळच्या सर्वच संस्कृतींनी धूमकेतूंची नोंद केली असली तरी त्यांचे उगमस्थान निश्चित ठाऊक नव्हते. 1932 मध्ये इस्तोनियातील खगोल अभ्यासक अर्नेस्ट ओपिक यांनी आपल्या सूर्यमालेबाहेर दोन ते पाच हजार ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढय़ा अंतरावरून धूमकेतू येतात असा कयास व्यक्त केला. एक ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे सूर्य ते पृथ्वी हे 15 कोटी किलोमीटरचे अंतर या गणिताने हिशेब करायचा. असाच सिद्धांत 1950 मध्ये डच खगोलविद जॅन उर्ट यांनीही मांडला. सूर्यमालेच्या सभोवती लक्षावधी धूमकेतू सूर्यमालेच्या जन्मकाळातच तयार झाले आणि त्यांचं कवच सूर्यमालेभोवती कोटय़वधी किलोमीटर पसरलेलं आहे. धूमकेतूच्या वेष्टनातच आपली सूर्यमाला आहे म्हणा ना!
जॅन उर्ट यांचं संशोधन अधिक सखोल असल्याने या धूमकेतूंच्या कवचाला त्यांच्या हयातीतच त्यांचं नाव लाभलं. धूमकेतूंचं हे कवच आता उर्ट क्लाऊड किंवा ‘उर्ट’चा ढग असं म्हटलं जातं. खगोल अभ्यासक डॉ. जे. जे. रावळ यांनी काही वर्षांपूर्वी उर्ट यांची भेट घेतली होती. आणि त्याची माहिती ‘खगोल मंडळा’तील व्याख्यानात सांगितली होती. 1900 ते 1992 असा जॅन उर्ट यांचा जीवनकाळ. ते नेदरलॅण्डमधील लेडन येथे राहत होते. त्यांच्या खगोलीय संशोधनाचा गौरव करण्यासाठी ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’ने त्यांना विसाव्या शतकातील एक महान खगोलशाŒाज्ञ असं म्हटलं. ‘लाइफ’ मासिकाने 1955 मध्ये त्यांचा ‘जगातील सर्वात प्रसिद्ध 100 जणांमध्ये समावेश केला. खगोलीय घटनांविषयी वैज्ञानिक शिस्तीने विचार करत राहिलं तरच संशोधन घडतं. त्यासाठी शुभाशुभाचे भय मनातून घालवावं लागतं. आपल्याकडच्या ‘वेणू बापू’ यांच्या नावे एका धूमकेतूची नोंद आहे. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.


























































